न्या. महादेव गोविंद रानडे

Parent Category: मराठी उद्योग Category: स्वदेशी उद्योग प्रेरक Written by सौ. शुभांगी रानडे

 मराठी माणूस उद्योगापेक्षा साीहित्य संस्कृतीत जास्त रमतो. कारण नोकरी हेच त्याचे ध्येय असते. पण त्याने उद्योगात मनापासून लक्ष घातले तर तो महाराष्ट्राला समृद्धीच्या शिखरावर नेऊ शकेल. या संकल्पनेच्या पुष्टीकरता मी इतिहासाचा शोध घेतला तेव्हा न्या. म. गो. रानडे यांनी १५० वर्षांपूर्वी मांडलेल्या उद्योगविषयक  विचारांची माहिती झाली. त्या काळापासूनच आपण उद्योगाकडे  लक्ष द्यायला हवे होते असे वाटले. त्यांचे उद्योगविषयक विचार यांची आजही तसेच लागू पडतात.


 थोर नेमस्त समाजसुधारक आणि स्वदेशी उद्योगाचे पुरस्कर्ते


न्या. महादेव गोविंद रानडे

 (जन्म : १८ जानेवारी १८४२; मृत्यू : १६ जानेवारी १९०१),

 न्या. रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. १८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ होते.

न्या.रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले.

भारतीय समाज, भारतीय व पाश्चात्य परंपरा, भारतीय व पाश्चात्य ग्रंथ आणि भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या सर्वांच्या सखोल अभ्यासातून त्यांच्या विचारांना खोली प्राप्त झाली होती. एकीकडे येथील संतपरंपरा आणि दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवाद या दोन्हींचा समन्वय येथील सुधारणेसाठी त्यांनी योग्य मानला.

सार्वजनिक कार्य
ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. ‘अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला,’ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्रयाच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्ऱ्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले.

मराठी भाषेसाठी प्रयत्न
ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी त्या त्या प्रांतातील शिक्षणाची व्यवस्था लावण्यासाठी १८४०मध्ये प्रांतनिहाय शिक्षणमंडळे (बोर्ड ऑफ एज्युकेशन) स्थापन केली.मराठी भाषा वगळता अन्य सर्व विषय मातृभाषेऐवजी इंग्लिशमधून शिकवण्यात येऊ लागले. १८५७ ह्या वर्षी मुंबई विद्यापीठ स्थापन झाले तेव्हा मराठी हा विषय मॅट्रिक ते एम. ए.पर्यंतच्या सर्व परीक्षांना वैकल्पिक म्हणून घेण्याची सोय होती. १८६३मध्ये मॅट्रिक ते एम. ए. ह्या सर्व स्तरावर मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन बंद झाले. १८७० ते १८८७ ह्या काळात मराठीला विद्यापीठात स्थान मिळावे ह्यासाठी रानडे ह्यांनी प्रयत्न केले.इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. २९ जानेवारी १९०१ ह्या दिवशी (रानडे ह्यांच्या मृत्यूनंतरच्या १३ व्या दिवशी) सिनेटच्या बैठकीत मॅट्रिकप्रमाणे एम.ए.च्या परीक्षेतही मराठी हा विषय विकल्पाने उपलब्ध करून देण्यात आला. मात्र मराठीची प्रश्न पत्रिका इंग्लिशमधून काढण्यात येणार होती.

न्या. रानडेंच्या मते, समाज हा एखाद्या सजीवाप्रमाणे असतो. समाजाची धर्म, राजकारण, अर्थकारण ही विविध अंगे एकमेकांशी संलग्न असून, एकमेकांना पूरक असतात. एका शरीराचे काही अवयव दुबळे आणि काही शक्तीमान असे असू शकत नाहीत. तसेच मानवी समूहाचे काही भाग सुधारलेले आणि काही भाग मागासलेले असू शकत नाहीत. समाजातील विविध भागांची एकत्रित प्रगती होणे हे न्या. रानडेंनी आवश्यक मानले.

येथील समाजातील दोष - उदा. कुपमंडूक वृत्ती, तुटकपणा, ग्रंथप्रामाण्य, जातीभेद, चुकीच्या रुढी-परंपरांना चिकटून राहणे, दैववाद, इतिहासाबद्दलची अनास्था या सर्वांना दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मांडले. कोणत्याही समाजामध्ये बदल सहजासहजी होत नाहीत, तसेच ते अचानकही होत नाहीत; यावर न्या. रानडेंचा विश्वास होता.

समाजात वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक असतात आणि या सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा करावयाची असल्याने सुधारणेचे तीन मार्ग त्यांनी सुचवले. समाजातील काही बदल परंपरेचा, धर्माचा आधार घेऊन केले पाहिजेत; काही बदल बुद्धीला पटेल अशा तर्कशुद्ध विवेचनाने घडवून आणले पाहिजेत; तर काही बदलांसाठी प्रसंगी कायद्याची मदत घेतली पाहिजे असे न्या. रानडे मानत.

समाजव्यवस्थेतील बदल ताबदतोब साध्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. सामाजिक सुधारणेसाठी विविध प्रवृत्तीच्या लोकांना आणि विविध संस्थांना एकत्र आणून सुधारणेस योग्य अशा वातावरण निर्मितीसाठी न्या. रानडेंनी प्रयत्न केले.

उद्योगीकरणाला प्रोत्साहन
ब्रिटिश राज्यकर्ते हिंदुस्थानामध्ये राहून राज्य करीत नसल्याने येथील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला. महसूल, इतर कर, अधिकार्‍यांचे पगार, कर्जाचे व्याज इ. मार्फत हिंदुस्थानातील पैसा इंग्लंडमध्ये जात होता. याला न्या. रानडेंनी 'खंडणी' मानले. ब्रिटिश काळात व्यापाराच्या स्वरूपात बदल झाला. कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात वाढली. त्यामुळे येथे येणार्‍या पैशापेक्षा येथून बाहेर जाणार्‍या पैशामध्ये वाढ झाली. आकडेवारीच्या सहाय्याने न्या. रानडेंनी हे सिद्ध केले. येथील लोकांची बचत न करण्याची वृत्ती आणि उद्योगाप्रति असलेली उदासीनता यांमुळे येथील पैशाच्या वाढीला चालना मिळाली नाही, असे मत त्यांनी मांडले. येथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालणे, उद्योगीकरणाला प्रोत्साहन देणे, उद्योग व शेतीवर सरकारचे नियंत्रण असणे, व्यापारात समतोल राखणे इ. मार्ग त्यांनी सुचवले. तत्कालीन विविध आर्थिक विचारप्रणालींच्या सखोल अभ्यासातून त्यांनी, 'हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती आणि त्यावरचे उपाय' यावर विवेचन केले.

राजकीय संदर्भात विचार मांडताना कायद्याचे राज्य, कायद्याची अंमलबजावणी, जनतेचे हक्क आणि कर्तव्ये, समानता, संसदेतील प्रतिनिधित्व यांचे महत्व त्यांनी विशद केले. या सर्व गोष्टी प्राप्त करावयाच्या तर जनतेने आवश्यक तर सनदशीर मार्गांनी चळवळ उभी केली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. मात्र ही चळवळ टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे असे मतही त्यांनी मांडले. 'स्वाभाविक विकासक्रमाच्या अनुषंगाने जे नजिकचे उद्दिष्ट्य आपल्या दृष्टिपंथात येईल त्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आणि औचित्य व व्यासबुद्धी यांच्याशी सुसंगत अशा तडजोडीच्या वृत्तीने ते प्राप्त करून घायचे' असे धोरण ठेवण्याकडे न्या. रानडेंचा कल होता. म्हणूनच, सार्वजनिक सभेच्या मार्फत लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता.

न्या. रानडे हे स्वभावाने नेमस्त व संयमी होते. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश व अतिरेकीपणा हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हते, तसेच परंपरेचा धागाही त्यांनी तोडून टाकला नाही. न्या. रानडे यांच्यावरील पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव, त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर त्यांचा असणारा विश्वास यांमुळे त्यांचे सुधारणेबाबतचे विचार आणि कृती ह्या नेमस्तवादी होत्या. कोणत्याही टोकाला न जाता, जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन, कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले. लोकापवाद वा व्यक्ती दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले. कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले.

एकोणिसावे शतक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. मध्ययुगीन परंपरा ते आधुनिक मूल्ये यांच्यातील तो संक्रमणकाळ होता. एकीकडे ब्रिटिश राजवटीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशपूर्व परंपरेची ओढ आणि दुसरीकडे मध्ययुगीन जीवनपद्धतीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशकालीन मूल्यांची ओढ अशी दोलायमान स्थिती त्या काळात होती. ब्रिटिश राज्याचे दोष दिसत होते; पण त्यामार्फत येणार्‍या आधुनिक मूल्यांचा स्वीकार आवश्यक वाटत होता. अन परंपरेतील दोष दिसत होते; पण आपल्या स्वराज्याचा उच्चार-आचार आवश्यक वाटत होता. या दोन्हींचा योग्य समन्वय न्या. रानडेंनी आपल्या विचार व कार्यात साधला होता.

ब्रिटिश राज्यातली राजकीय धोरणे, आर्थिक धोरणे, शेतकर्‍यांवरील अन्याय, पाश्चात्य आर्थिक विचारप्रणाली यांविरुद्ध त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट मांडणी केली. आणि त्याच बरोबर पाश्चात्य उदारमतवाद, उद्योगशीलता, व्यक्तीवाद त्यांनी तितक्याच स्वच्छ आणि स्पष्टपणे उचलून धरला. येथील चुकीच्या रुढी-परंपरा, ग्रंथप्रामाण्य यांवर बोट ठेवले. आणि येथील मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत संयमित असे परिशीलनही केले. पाश्चात्य संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये स्वीकारताना आपल्या संतपरंपरेचे श्रेष्ठत्वही त्यांनी अधोरेखित केले.

तत्कालिन समाजाची नस त्यांनी बरोब्बर ओळखली होती. त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्या. रानडेंनी पाडला. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांचा उपयोग त्यांच्या मतपरिवर्तनासाठी केला, तर समाजपरिवर्तनासाठी ते अत्यंत उपयोगी साधन ठरेल, असे ते मानत.

एकविसाव्या शतकात, आज भारतासमोर पुन्हा पूर्वीसारखी दुही उभी आहे. एकीकडे पाश्चात्यांचे आर्थिक वर्चस्व व त्यातून उदभवणारे तोटे दिसताहेत. परंतु त्यामार्फत येणार्‍या माहिती-तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे. दुसरीकडे येथील 'विकसनशील' परिस्थितीतील अपूर्णता व दोष दिसताहेत. परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची ऊर्मीही आहे. या नव्या संक्रमणावस्थेत न्या. रानडेंचे समन्वयवादी, संयमित परंतु अचूक व नि:संदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत. भारतीय संस्कृतीतील सातत्य आणि पाश्चात्य संस्कृतीतील बदल या दोन्हींचा मिलाफ आपण कसा साधू यावर आपला भावी इतिहास अवलंबून राहील.


Hits: 183
X

Right Click

No right click