डॉ..धनंजय गाडगीळ

Parent Category: मराठी उद्योग Category: स्वदेशी उद्योग प्रेरक Written by सौ. शुभांगी रानडे


गाडगीळ, धनंजय रामचंद्र : (१० एप्रिल १९०१–३ मे १९७१). भारताचे नामवंत अर्थशास्त्रज्ञ व थोर विचारवंत. जन्म नागपूर येथे. शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात व केंब्रिजच्या क्वीन्स कॉलेजात झाले. इंग्‍लंडमध्ये एम्‌.ए. आणि डी. लिट्‍. पदव्या संपादन केल्यावर मुंबई सरकारच्या अर्थखात्यात त्यांनी १९२४-२५ मध्ये एक वर्ष नोकरी केली. सुरत येथील एम्‌. टी. बी. महाविद्यालयाचे प्राचार्यपद पाच वर्षे सांभाळल्यानंतर १९३० पासून ते पुण्याच्या ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’ च्या संचालकपदी रुजू झाले. वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंत तेथे निष्ठापूर्वक काम करून त्यांनी तेथे निष्ठापूर्वक काम करून त्यांनी ती संस्था नावारूपाला आणली. १९६६-६७ साली ते पुणे विद्यापीठाचे कलागुरू होते. काही वर्षे ते राज्यसभेचे सभासद होते. सप्टेंबर १९६७ मध्ये त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद स्वीकारले.

डॉ. गाडगीळ भारतातील सहकारी चळवळीचे आद्य प्रणेते मानले जातात. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने व सहकारी बँका वाढीस लावण्याचे श्रेय त्यांना आहे. भारताच्या अर्थकारणाचा, विशेषतः कृषिविषयक जटिल समस्यांचा, सखोल अभ्यास करून त्यांनी आपले मूलग्राही विचार अनेक ग्रंथांतून व लेखांतून मांडले. सरकारने नेमलेल्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. अनेक आर्थिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांनी लिहिलेली पंचविसांहून अधिक पुस्तके प्रसिद्ध असून द इंडस्ट्रियल ईव्हलूशन इन इंडिया (१९२८), द फेडरल प्रॉब्लम इन इंडिया (१९४४), रेग्युलेशन ऑफ वेजिस (१९५४), प्लॅनिंग इन इंडिया अँड इकॉनॉमिक पॉलिसी (१९६१) यांसारख्या ग्रंथांतून त्यांच्या तर्कशुद्ध व साक्षेपी दृष्टिकोनाचा प्रत्यय येतो. निव्वळ आर्थिक सिद्धांतांचे विश्लेषण करण्यावर भर न देता त्यांचा व्यावहारिक उपयोग करण्यावर गाडगीळांचा कटाक्ष असे. आर्थिक विकास लोकाभिमुख असावा, असे मत ते आग्रहाने मांडीत.

नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर पुण्याकडे परतताना आगगाडीत हृदयविकाराचा झटका येऊन ते निधन पावले. गोखले अर्थशास्त्र संस्थेने गाडगीळांचे मराठीतील समग्र लिखाण ध. रा. गाडगीळ लेखसंग्रहनामक दोन खंडांत (१९७३ -१९७४) प्रकाशित केले आहे.

भेण्डे, सुभाष स्रोत- मराठी विश्वकोश

Hits: 174
X

Right Click

No right click