लोकहितवादी

Parent Category: मराठी उद्योग Category: स्वदेशी उद्योग प्रेरक Written by सौ. शुभांगी रानडे

लोकहितवादी : (१८ फेब्रुवारी १८२३-९ ऑक्टोबर १८९२). अव्वल इंग्रजीतील थोर समाजचिंतक.
मूळ नाव गोपाळ हरी देशमुख. जुने आडनाव सिद्धये. यांचे घराणे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे. गोपाळरांवांचे निपणजे विश्वनाथ ह्यांच्याकडे बारा गावांची देशमुखी असल्यामुळे ‘देशमुख’ हे नवे आडनाव ह्या घराण्याला मिळाले. १७५४ साली गोपाळरावांचे आजोबा गोविंदराव हे आपल्या तीन बंधूंसह पुण्यास आले आणि पेशव्यांच्या सेवेत राहिले. गोविंदरावांचे पुत्र आणि गोपाळरावांचे वडिल हरिपंत हे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले ह्यांच्याकडे फडणीस होते. बापू गोखले अष्टीच्या लढाईत पतन पावल्यानंतर हरिपंत हे दुसरे बाजीराव पेशवे ह्यांचे वकील म्हणून पुण्यात राहिले.

थोर समाजचिंतक म्हणून गोपाळरावांनी कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्यांनी ‘शतपत्रे’ म्हणून लिहिलेल्या निबंधांवर. ‘लोकहितवादी’ हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही ‘शतपत्रे’ लिहिली. ⇨ भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर नामक पत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात प्रसिद्ध झाली. ही ‘शतपत्रे’ वस्तुतः १०८ आहेत. समारोपाचे शंभरावे पत्र (निबंध) लिहिल्यानंतर आणखी शंभर निबंध लिहिण्याचा त्यांचा उद्देश होता. तथापि हे निबंध प्रभाकरातून प्रसिद्ध होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी पहिल्या शंभर पत्रांत आठ निबंधांची भर घालून ‘अष्टोत्तरशतपत्रे’ पूर्ण केलेली दिसतात. १८६६ साली जो लोकहितवादीकृत निबंधसंग्रह प्रसिद्ध झाला, त्यात ह्या ‘अष्टोत्तरशतपत्रां’ खेरीज त्यांनी लिहिलेल्या अन्य निबंधांचाही समावेश करून एकूण १९५ निबंध प्रसिद्ध करण्यात आले होते. ह्या ग्रंथाची शतसांवत्सरिक द्वितीयावृत्ती (१९६७) अ. का. प्रियोळकर ह्यांनी संपादिली आहे. त्या निबंधांतून लोकहितवादींनी आपली राजकीय मते, तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्ट चाली, समाजसुधारणा इ. विषयांवरील विचार स्पष्ट केले आहेत. ह्या विचारांनी एकोणिसाव्या शतकातील वैचारिक प्रबोधनाचा पाया घातला, असे यथार्थपणे म्हटले जाते.

पेशवाईचा अस्त होऊन इंग्रजांचा अंमल सुरु झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांनी लोकहितवादींचा जन्म झाला. इंग्रजांची सत्ता ह्या देशावर प्रस्थापित झाल्यामुळे येथल्या पराभूत समाजाची गाठ एका आधुनिक समाजाशी पडलेली होती. ऐहिकता, विज्ञाननिष्ठा, विद्याविस्तार, उदारमतवाद, उद्यमशीलता ह्यांचे महत्त्व मुरलेल्या एका सर्जनशील संस्कृतीतून नवे इंग्रज राज्यकर्ते आले होते आणि अशा संस्कृतीला आधार देणारी एक शिस्तही त्यांच्या ठायी होती. ह्या शिस्तीचे प्रत्यंतर त्यांच्या प्रगत आणि सुनियंत्रित प्रशासनातून येत होते. त्यामुळे इंग्रजी राज्य ह्या देशावर आले, ते ईश्वरी योजनेचा एक भाग म्हणून असे आपल्या ‘शतपत्रां’ तून अनेकदा स्पष्टपणे लिहिणाऱ्या लोकहितवादींना असा विश्वास वाटत होता, की इंग्रजांच्या सहवासामुळे आपला समाज विविधविद्यासंपन्न होऊन त्याचे आधुनिकीकरण होईल. आपले लोक राज्य करण्यास लायक झाल्यानंतरही इंग्रजांनी येथील सत्ता न सोडल्यास अमेरिकेत झाली, तशी येथे क्रांती होईल आणि इंग्रजांना येथून जावे लागेल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली होती. येथील सर्व गरीब-श्रीमंतांनी एकत्र होऊन विलायतेतील राणीसाहेबांस अर्ज करावा आणि ह्या देशांसाठी ‘पार्लमेंट’ मागून घ्यावे, असेही त्यांनी त्यांच्या एका पत्रात म्हटले आहे.

इंग्रजी सत्तेपासून आपल्या देशाला काही महत्त्वाचे लाभ आहेत, ह्याची स्पष्ट कल्पना जशी लोकहितवादींना होती, तशीच इंग्रजांच्या शोषक अर्थनीतीचीही होती. ज्यांना मूर्ख आणि टोणपे म्हणता येईल, असे इंग्रज अधिकारीही येथे हजारो रुपये पगार घेतात तसेच इंग्रजांच्या राज्यात ह्या देशातली संपत्ती देशाबाहेर जाते आणि ह्या देशाला दारिद्र्य येते, असे लोकहितवादींनी म्हटले आहे. ह्या देशावर मुसलमानांनीही राज्य केले परंतु मुस्लिम राज्यकर्त्यांनी कमावलेली संपत्ती ह्या देशाबाहेर गेली नाही कारण मुसलमान आले, ते इकडेच राहिले त्यांचा ‘परकी भाव’ गेला, असा एक महत्त्वाचा भेद इंग्रज आणि मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये लोकहितवादींनी दाखवून दिला.

इंग्रज राज्यकर्ते हिंदूस्थानातील लोकांना मोठी अधिकारपदे देत नाहीत, अशी तक्रार होती. मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकराण्याची पात्रता येथील लोकांत आली, की इंग्रज सरकार ह्या धोरणात निश्चितपणे बदल करील, अशी आशा लोकहितवादींना वाटत होती पण पुढे त्यांची ही धारणा बदलली. इंग्रजांच्या राज्याचा एक गंभीर दोष म्हणून ते त्या धोरणाकडे पाहू लागले. विद्यापीठांची स्थापना होऊन त्यांतून उच्चविद्याविभूषित तरूण बाहेर पडू लागल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली. तिच्या संदर्भात ह्या धोरणाचा विचार ते करीत असावेत. पण नुसत्या नोकऱ्यांच्याच मागे न लागता, आपल्या लोकांनी व्यापार-उद्योगातही मनःपूर्वक लक्ष घातले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. आळशीपणामुळे देश भिकारी झाला, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा एक भाग म्हणून येथे स्वदेशीची चळवळ झाली परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आला. परंतु स्वदेशीचा विचार लोकहितवादींनी त्यांच्या ‘शतपत्रां’त कितीतरी आधी मांडून ठेवलेला आढळतो. ‘… आपले लोक कापडे जाडी, वाईट करतात परंतु तीच नेसावी. इकडे छत्र्या करितात, त्याच घ्याव्या म्हणजे ह्या लोकांत व्यापार राहून इकडे सुख होईल परंतु हे लोक असे करीत नाहीत आणि थोडी किंमत म्हणून लोकांचा जिन्नस विकत घेतात’, असे त्यांनी म्हटले आहे. विलायतेत प्रचंड शक्तीची वाफेची एंजिने असल्यामुळे अत्यंत कमी खर्चात फार मोठ्या प्रमाणावर सूत आणि कापड निर्माण होते. इंग्लंडच्या ह्या यंत्रसामर्थ्याने आपल्यावर खरे आक्रमण केलेले आहे आणि आपण भिकारी होऊन लुटले गेलो आहोत शिकंदर, गझनीचा महमूद, तैमूरलंग आणि नादिरशही ह्यांची चढाई त्या मानाने काहीच नव्हे ह्या चढाईमुळे सर्व हिंदुस्थानची मजुरी विलायतेस गेल्यासारखी आहे, हे त्यांचे अचूक निरीक्षण होते.

एक जित, पराभूत समाजाच्या दारूण पराजयाची अत्यंत कठोर, चिकित्सक समीक्षा करण्यासाठी लोकहितवादी उभे ठाकले होते. आपल्याला गुलाम करून टाकणाऱ्या ह्या सत्तांतरामागे राजकीय कारणांबरोबरच आपल्या एकूण मनोवृत्तीतील काही आत्मघातक दोष, तसेच गंभीर सांस्कृतिक न्यूनेही आहेत, हे त्यांना स्पष्ट दिसत होते. इतिहासाचे भान ठेवून त्यांची चर्चा -चिकित्सा झाली, आत्मपरीक्षण झाले, तरच आपल्या प्रबोधनाचा आणि विकासाचा मार्ग खुला होईल, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच ह्या पराभवाचा विचार केवळ राजकीय अंगाने न करता विद्या, धर्म, समाजकारण, अर्थकारण अशा विविध अंगांनी त्यांनी तो केला.

विद्या हा समाजपरिवर्तनाचा मूलाधार आहे, अशी लोकहितवादींची धारणा होती. तथापि येथे विद्येचे क्षेत्र मर्यादित ठेवले गेल्यामुळे विद्याप्रसार होऊ शकला नाही. विद्या वाढविलीही गेली नाही. ‘विद्या म्हणजे केवळ धर्माचे ज्ञान’ असा विद्येचा अर्थही काळाच्या ओघात संकुचित झाला. ही विद्याही ग्रंथार्थ समजून न घेता केवळ पाठांतराच्या आधारे रक्षिली गेली. ह्यामुळे धर्मविषयीचे अज्ञान आणि कर्मकांडांचे स्तोम अतोनात वाढले. प्राचीन ग्रंथांचे लेखक देव किंवा ऋषी होते, असा समज दृढ करण्यात आल्यामुळे नव्या ग्रंथरचनेला उत्तेजन मिळणे अवघड होऊन बसले. विद्येच्या क्षेत्रात साचलेपणा आला. ज्ञानसंपादनाच्या मार्गात इतरही काही अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या. परदेशगमन निषिद्ध मानल्यामुळे भूगोलाबद्दल व जगातील विविध स्थळांबद्दल अज्ञान निर्माण झाले. काळाची जाणीव ठेवून परंपरेची चिकित्सा करीत राहिल्याखेरीज नवी विद्या, नवे विचार आणि नव्या कल्पनांबाबत कोणताही समाज स्वागतशील राहात नाही परंतु येथे प्राचीन काळाची आणि परंपरांची चिकित्सा करणे हाच अधर्म मानला गेल्यामुळे स्थळाबरोबरच काळाचीही जाणीव नष्ट झाली. आपल्या देशात येऊन येथील ज्ञान मिळविण्यात, तसेच येथे व्यापार नोकरी करण्यात इंग्रजांना कोणतीच अडचण नव्हती. चुकीच्या निर्बंधांमुळे आपणाला मात्र त्यांच्या देशातही जाणे शक्य होत नाही शिवाय आपल्या ज्या प्राचीन विद्या आहेत, त्याच श्रेष्ठ असून त्या पूर्णत्वाला पोचलेल्या आहेत अशी भूमिका घेऊन नव्या विद्यांना विरोध केला जातो, हे लोकहितवादींना दिसत होते. आपण नवनव्या विद्या आणि भाषा शिकाव्यात, इंग्रजी भाषा शिकण्याची, इंगजी राज्यामुळे मिळालेली संधी घेऊन, आपण इंग्रजी ग्रंथांमधले ज्ञान आत्मसात केले पाहिजे कारण इंग्रजी विद्या फआर सुधारलेली आहे. नवे ज्ञान तिच्यात आहे आणि ती विद्या सतत विकास पावत आहे, हे त्यांनी वारंवार सांगितले आहे.

विद्यावृद्धी आणि ग्रंथनिर्मिती ह्यांच्यातील नाते अतूट आहे म्हणूनच उत्तम शिक्षक आणि दर्जेदार ग्रंथ निर्माण व्हायला पाहिजेत, हे सांगून ‘मराठी पंतोजी तयार करण्याची येक शाळा केली पाहिजे व चांगले ग्रंथ तयार करण्याकरिता तर्जुमे करणाऱ्यांची एक मंडळी बसविली पाहिजे’, असे लोकहितवादींनी कित्येक वर्षांपूर्वी सुचविले. परंतु भारतासारख्या बहुभाषी देशात सर्वत्र विद्याप्रसार व्हावयाचा असेल, तर विविध प्रादेशिक भाषांतून ग्रंथनिर्मिती होणे आवश्यक आहे. ह्या सर्व भाषांत ग्रंथ तयार होऊन विद्यावृद्धी होणार कशी, हा त्यांना पडलेला प्रश्न होता. त्या त्या प्रादेशिक भाषेत लोक लिहायला लागले पाहिजेत विद्या वाढविणारी मूळ ग्रंथनिर्मिती होण्याइतकी भाषेची सुधारणा होऊन तिची ताकद वाढली पाहिजे. ह्या महत्त्वाच्याबाबीकडे लोकहितवादींनी लक्ष वेधले आहे. शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या बोधभाषेचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

जातिभेदाने ह्या देशाच्या समृद्धीच्या मार्गात फार मोठा अडथळा निर्माण करून ठेवला आहे, ह्याती जाणीव लोकहितवादींना होती. तथापि शिक्षणाच्या प्रसारामुळे आणि प्रभावामुळे जातिव्यवस्था नाहीशी होईल, असा विश्वास त्यांना वाटत होता. मात्र, जोपर्यंत जाती अस्तित्वात आहेत, तोपर्यंत त्यांच्यांत द्वेषमत्सर तरी असू नये, असे त्यांना वाटत होते. तसेच जातच ठरवायची तर ती गुणकर्मानुसार ठरवावी, असेही त्यांचे मत होते. ‘वास्तविक पाहिले, तर कैकाडी लोक हे सुधारल्याच्या अंगी ब्राह्मणांसारखे शहाणे होतील, हे खचित आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. विवाहाच्या संदर्भात त्यांनी केलेला ‘स्वयंवर’ पद्धतीचा पुरस्कार त्यांच्या जातिविषयक भूमिकेवर प्रकाश टाकतो. ‘स्वयंवर हे उत्तम’ असून ‘विवाह हा ऐच्छिक विषय’ आहे. याबाबत कोणावर कसलीच सक्ती करू नये. ‘स्वयंवर होऊ लागले, म्हणजे बाकीच्या अडचणी सर्व आपल्या आपण जातील’, असे त्यांनी म्हणून ठेविले आहे. लोकांनी एकमेकांशी नम्रतेने वागावे. ‘माहारासदेखील नमस्कार करावा. त्यांत आहे काय ?’ अशी त्यांची विचारसरणी होती. अन्य जातींतील लोकांत, ब्राह्मणांना आदर्श मानून ‘ब्राह्मण’ होण्याची वृत्ती आढळते, असे स्वतःचे निरीक्षण नमूद करून लोकहितवादींनी म्हटले आहे, की आता ब्राह्मण आणि अन्य जातींचे लोक सारखेच झाले आहेत. कारण गुलामगिरीत सारेच एका पातळीवर येतात. आता हिंदुस्थानात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तिन्ही वर्णांचे काम इंग्रज लोक चालवितात हिंदुस्थानातील सर्व लोकांकडे त्यामुळे शूद्रत्व आलेले आहे, हेही ते स्पष्टपणे सांगत होते.

उपर्युक्त स्वयंवराच्या कल्पनेत लोकहितवादींनी स्त्री-पुरुषांचीसमानता आणि व्यक्तिस्वातंत्र्य ह्यांचाच पुरस्कार केलेला आहे. तसेच स्वयंवरात स्वतचा वर किंवा स्वत:ची वधू सुजाणपणे निवडण्याची प्रगल्भता येईल, इतके वराचे किंवा वधूचे वय गृहीत धरावे लागते. साहजिकत वालविवाहांना लोकहितवादींनी विरोध केला आहे. म्हतारपणी लग्न करणाऱ्यांचाही त्यांनी निषेध केला. ‘पुनर्विवाह’ ह्या विषयावर त्यांनी अनेक निबंध लिहिले आहेत. पुनर्विवाहसारख्या विषयांना धर्मशास्त्रात आधार शोधण्याचा खटाटोप करीत बसण्यापेक्षा धर्मशास्त्र बाजूला ठेवून जे समाजहिताचे आहे ते बेलाशक करावे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. विधवा स्त्रीच्या केसांचे वपन करण्याच्या चालीवर त्यांनी आघात केले. समाजातल्या अशाच अन्य अनिष्ट चालींना बळी पडलेल्या स्त्रियांची दु:खे तळमळीने मांडली. स्त्रीयांनाही शिकवून शहाणे केले पाहिजे आणि जोवर ह्या देशातल्या स्त्रिया शहाण्या होत नाहीत, तोवर आम्ही मूर्ख राहू, हे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. मुलांवर आईकडून होणाऱ्या संस्काराचे, बालमानसशास्त्रात सांगितले जाणारे महत्त्व त्या काळी त्यांच्या लक्षात आले होते. खरे म्हणजे अनेक अनिष्ट, खुळ्या आणि अन्यायकारक चालीरीती धर्माच्या नावाने चालू राहतात त्यामुळे प्रथम धर्माचे क्षेत्र मर्यादित झाले पाहिजे धर्मशआस्त्र आणि पारमार्थिक धर्म ह्यांचा तत्त्वत: काहीही संबंध नाही संसार आणि परमार्थ ही दोन कामे पृथक् आहेत त्यामुळे कालमानानुसार धर्मशास्त्र आणि चालीरीती बदलल्याच पाहिजेत, ही लोकहितवादींनी समाजाला दिलेली शिकवण कायम प्रेरक ठरण्यासारखी आहे. त्यांनी धर्मसुधारणेची म्हणून जी सोळा कलमे सांगितली, ती ह्या संदर्भात लक्षणीय ठरतात (ईश्वरभक्ती मनःपूर्वक करावी आपल्या जीवासारखा दुसऱ्याचा जीव मानावा भजनपूजन संस्कार स्वभाषेत करावे संस्कृत भाषेचा आग्रह नको आचारापेक्षा नीती प्रमुख असावी एका माणसाने दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखू नये जातीचा अभिमान नसावा कोणीही कोणताही रोजगार करावा, इत्यादी). ह्या कलमांत मुख्य विचार आहे, तो नीतीचा आणि स्वच्छ सामाजिक वर्तनाचा.

लोकहितवादींनी ब्राह्मणांवर कठोर टीका केलेली आढळते. ब्राह्मण हे पराभूत नेतृत्वाचे प्रतीक होते पण आपल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी आणि पुढले पराभव टाळण्यासाठी चिकित्सक आत्मनिरीक्षणाची जी वृत्ती लागते, तिचा अभाव त्यांना ब्राह्मणांत दिसत होता. त्याचप्रमाणे पराभव झाल्यानंतरही चातुर्वर्ण्य आणि जातिव्यवस्था पक्कीच राहिलेली असल्यामुळे ब्राह्मणांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला नव्हता आणि ही स्थिती ब्राह्मणांना आत्मनिरीक्षणापासून परावृत्त करणारी होती. तथापि ब्राह्मणांमध्ये जे चांगले, त्याची त्यांनी प्रशंसाही केली. त्यांचे विद्याप्रेम आणि पाठांतराच्या आधारे त्यांनी केलेले प्राचीन विद्येचे रक्षण हे लोकहितवादींना कौतुकास्पद वाटत होते. तथापि प्राचीन विद्येचा त्यांचा दुरभिमान, अर्थ न जाणता केले जाणारे पाठांतर, विद्याप्रसाराला त्यांनी घातलेल्या मर्यादा त्यांना टीकार्ह वाटत होत्या. धर्मशास्त्राधिष्ठित अर्थहीन आणि जाचक रुढींची चर्चा करतानाही त्यांना ब्राह्मणांवर टीका करणे भाग पडले. तथापि मुखत्यारामार्फत धर्म सांभाळण्याची आपली पद्धत असल्यामुळे इतरांना धर्मासंबंधी काही करावेसे वाटत नाही आणि ब्राह्मणांकडे धर्मासंबंधीची मक्तेदारी आपोआप जाते. जशी सुताराकडे सर्व सुतारकी, लोहाराकडे सगळी लोखंडाची कामे, तशी ब्राह्मणाकडे धर्माची सर्व कामे दिली जातात, हेही लोकहितवादींनी नमूद करून ठेवले आहे. जातिव्यवस्था आणि चातुर्वर्ण्यव्यवस्था ह्याच प्रवृत्तीतून भक्कम होत जाते.

लोकहितवादींनी मुख्यत: लिहिले, ते हिंदू समाजाबद्दल. तथापि अन्य धर्मीयांतील त्यांना अनुचित वाटणाऱ्या काही अपप्रवृत्तींवरही त्यांनी टीका केली आहे. तसेच इंग्रजही त्यांच्या टीकेतून सुटले नाहीत कारण त्यांची सर्व टीका एका व्यापक सामाजिक चिकित्सेचे लक्ष्य ठेवून, पूर्णत: विधायक वृत्तीनेच त्यांनी केली आहे.

इतिहास आणि भूगोल ह्या दोन्ही विषयांच्या संदर्भात हिंदूंनी आस्था दाखविली नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. लोकहितवादींच्या काळापूर्वीच्या इतिहासाचा विचार केला, तर आपला इतिहास हा मुख्यतः पौराणिक स्वरुपाचा. काळाचे अनेक विभाग करून त्याचे चक्र निर्मावयाचे आणि त्यात अनेक अद्‌भुत कथा भरावयाच्या, अशी रीत. परंतु खऱ्या इतिहासाचे भान ठेवले, तर समाजातील स्थितिगतीचा अर्थ लावता येतो. परिवर्तनांचे अन्वय समजतात. इतिहासाकडे पाठ फिरविणे म्हणजे परिवर्तनाबाबत नकारात्मक वृत्ती ठेवणे. लोकहितवादींचे स्वतःचे पहिले आणि नंतरचेही बरेचसे लेखन इतिहासविषयक आहे, हे अर्थपूर्ण आहे. सत्तांतराचा अर्थ लावताना हिंदू चक्रनेमिक्रमाची जी कल्पना मांडतात, ती पुढे जाणाऱ्या रथचक्रासारखी नसून एकाच जागी फिरणाऱ्या रहाटगाडग्यासारखी आहे असा विचारही लोकहितवादींनी आपल्या लेखनातून सूचित केला आहे. ज्याने त्याने स्वतःपुरतेच पाहणे, अन्याय मुकाट्याने सोसत राहणे, पराभव हा केवळ दैवाची खेळ आहे असे मानणे, आक्रमकांची संस्कृती आणि धोरणांची माहिती करून घेण्याबाबत उदासीन राहणे, आळशीपणा, खऱ्या हिताच्या उद्योगाऐवजी तुळशीची लाख पाने गोळा करण्यासारख्या कृतींत वेळ घालवणे, निरुपयोगी वस्तू बनविणे, असे हिंदूंचे अनेक दोष त्यांनी दाखविले आहेत. शिमग्यासारख्या सणांत चालणारा दुराचार, शाक्तपंथ ह्यांवरही त्यांनी टीका केली आहे.

सर्व धर्मीयांना सारखेच कायदे असावेत, असे लोकहितवादींचे मत होते. ‘सुखदुःख देणारे कायदे सर्व जातींत व सर्व धर्मास एकसारखे असावे. कारण सर्व मनुष्ये राज्यरक्षणाचे समानाधिकारी आहेत, त्याअर्थी न्यांयांत भेद नसावा’, असे त्यांनी म्हटले आहे. ‘कोणाचा ईश्वरावर कसा भाव आहे, हे मनुष्याने पाहण्याचे मुळीच कारण नाही. धर्मावरून कोणी कोणाची अदावत करू नये ..’ हे सांगून लोकहितवादी म्हणतात, ‘आमचा धर्म खरा, असे म्हणणारे आग्रही हे इंग्रज असते, तर लोकांस मोठीच पीडा झाली असती.’

आपल्या देशाच्या आर्थिक प्रश्नांचाही लोकहितवादी खोलवर जाऊन विचार करीत होते. १८४९ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ मराठीतील अगदी आरंभीच्या अर्थशास्त्रीय ग्रंथांपैकी एक आहे (हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तेव्हा ‘अर्थशास्त्र’ हा शब्द रुढ झालेला नव्हता). ‘क्लिफ्टसाहेबाच्या इंग्रजी ग्रंथाचे आधाराने’ हा ग्रंथ केल्याचे लोकहितवादींनी म्हटले आहे. तथापि क्लिफ्टकृत मूळ ग्रंथ अनुपलब्ध असल्यामुळे क्लिफ्टच्या विचारांचा आधार त्यांनी किती घेतला, हे समजणे शक्य नाही. परंतु हा ग्रंथ त्यांनी स्वतंत्रपणेच लिहिला असावा आणि क्लिफ्टच्या ग्रंथांप्रमाणे केवळ प्रकरणांचा व प्रतिपादनाचा क्रम राखला असावा, असे काही अभ्यासकांचे अनुमान आहे. तथापि ह्या ग्रंथांचे शेवटचे प्रकरण तर अगदी स्वतंत्र आहे, अशी खात्री काही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. ‘हिंदुस्थानाविषयी विचार’ असे ह्या प्रकारणाचे शीर्षक आहे. संपत्तीच्या उत्पादनाचे एकमेव कारण श्रम हेच आहे, हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचे मत त्यांनी स्वीकारल्याचे दिसते. या दृष्टीतून ब्रिटिशांच्या अर्थशोषणाकडे त्यांनी पाहिले आणि सत्ताधारी अनुत्पादक वर्गाने केलेले हे शोषण आहे, हे आपले मत नोंदविले. ह्या शोषणापासून हिंदुस्थानची अर्थव्यवस्था मुक्त होण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. भारतासाठी त्यांनी यंत्राधिष्ठित, औद्योगिक भांडवलदारी विकासाचा मार्ग पुरस्कारिला अर्थशास्त्रीय विवेचनाची त्यांची शैली अत्यंत सुबोध आहे.

‘हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे ?’ ह्या शीर्षकाने त्यांनी इंदुप्रकाशात लिहिलेले (१८७६) आठ लेखनही महत्त्वाचे आहेत. भारताच्या दारिद्र्याची चिकित्सा लोकहितवादींनी त्यांच्या अन्य लेखनातूनही केली आहे. ब्रिटिशांनी ह्या देशाचे अर्थशोषण केले असले, तरी ‘द्रव्याचे ढीग हातांत, पायांत गळ्यात’ घालणारे श्रीमंतही उत्पादक कार्यासाठी संपत्ती खर्च करण्याचे मनात आणीत नाहीत, ह्याचा त्यांनी निषेध केला आहे. दागिने जमवत राहणे, ही ‘दुष्टपणाची व अधर्माची’ चाल आहे, असे ते म्हणतात. शेती, व्यापार, कारागिरी ह्यांत वाढ झाली पाहिजे तंत्रविद्या वाढवली पाहिजे, हे त्यांनी सांगितले. ‘आता लोक फार वृद्धिंगत जहाले, व त्यांस खावयास मिळत नाही…’ असे सांगून वाढत्या लोकसंख्येवरही त्यांनी बोट ठेवल्याचे दिसते. भारतातील दारिद्र्याची मीमांसा करताना दादाभाई नवरोजी ह्यांनी जो खंडणीचा सिद्धांत मांडला, त्याचे पूर्वसूचन त्यांच्या अर्थशास्त्रीय लेखनात फार पूर्वीच झालेले दिसते.

लोकहितवादींचे अन्य काही ग्रंथ असे : महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४९), यंत्रज्ञान (१८५०), खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये याविषयी लोकांशी संभाषण (१८५१), निगमप्रकाश (गुजराती, १८७४), जातिभेद (१८७७), गीतातत्त्व (१८७८). सार्थ आश्वलायन गृह्यसूत्र (१८८०), ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था आणि त्यांची हल्लींची स्थिती (१८८३), स्थानिक स्वराज्य संस्था (१८८३), पंडितस्वामी श्रीमद्‌द्‌‌‌‌‌यानंद सरस्वती (१८८३), ऐतिहासिक गोष्टी (२ भाग, १८८४, १८८५), गुजराथचा इतिहास (१८८५).

लोकहितवादींचे खरे नाव ज्यात दिले आहे, असा त्यांनी लिहिलेला ग्रंथ उपलब्ध नाही. टोपण नावांनी त्यांनी लेखन केले.

लोकहितवादींच्या अध्ययनकाळी विद्यापीठांची स्थापना झालेली नव्हती. इंग्रजी घेण्यातही लोकांच्या सनातनीपणाचा अडथळा होता. लोकहितवादींना ज्ञान मिळविले, ते मुख्यतः स्वप्रयत्नांनी. विविध विषयांमध्ये त्यांना स्वारस्य होते आणि त्यांची माहिती त्यांनी परिश्रमपूर्वक करून घेतलेली होती. परिणामतः त्यांचा व्यासंग एखाद्या विश्वकोशासारखा झालेला दिसतो. लोकहिताच्या दृष्टीने कोणत्याही लाभाची अपेक्षा न धरता त्यांनी जे लेखन केले, त्यातून ह्या व्यासंगाचा आणि विशेषतः त्यांच्या द्रष्टेपणाचा प्रत्यय येतो. त्यांच्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी जे विचार मांडले, ते आजही आपणास अंतर्मुख करतात आणि लोकहितवादी स्वतःच्या काळाच्या किती पुढे होते ह्याचा प्रत्यय देतात. आशिया खंडातील लोक अज्ञानी व सुस्त असून यूरोपीय लोक त्यांना जिंकतील आणि ह्या जेत्यांपासूनच त्यांना ज्ञानप्राप्ती होऊ शकेल, असे भाकित त्यांनी वर्तविले होते.

त्यांचे सामाजिक कार्यही त्यांचे लोकहितवादी पण सार्थ ठरविणारे आहे. नोकरीच्या निमित्ताने ते जेथे जेथे गेले, तेथे त्यांनी समाजोपयोगी संस्था निर्माण केल्या. वाई येथे फर्स्ट क्लास मुन्सफ म्हणून काम करीत असताना त्यांनी एक वाचनालय स्थापन केले होते. पुण्याच्या ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ च्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. पुण्यात तेलुगू वाचकांसाठीही त्यांनी एक ग्रंथालय सुरू केले होते. ज्ञानप्रकाश ह्या महत्त्वाच्या वृत्तपत्राच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. मुंबईहून निघणाऱ्या इंदुप्रकाश ह्या पत्राच्या स्थापनेतही ते होतेच. लोकहितवादी ह्या नावाचे एक नियतकालिक ते स्वतःही काळ चालवीत होते. अहमदाबाद येथे असताना गुजराती प्रार्थना समाज, गुजराती पुनर्विवाहमंडळ इत्यादींची उभारणी करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. हितेच्छू हे इंग्रजी पत्र काढण्यामागेही त्यांची प्रेरणा होती, असे म्हणतात. गुजराती कवी मोहनलाल दलपतराम ह्यांनी लोकहितवादींच्या गुणवर्णनपर एक काव्य लिहिले, ही बाब लोकहितवादींची गुजरातेतील लोकप्रियता स्पष्टपणे दर्शविणारी आहे. प्रसिद्ध क्रांतिकारक श्यामजी कृष्णवर्मा ह्यांना विलायतेत शिक्षण घेता यावे, म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले होते आणि पुढे श्यामजींचे नाव त्यांनी रतलाम संस्थानच्या दिवाणपदासाठी सुचवले व त्याला मान्यता मिळविली. हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या भूमिकेतून स्थापन झालेल्या ‘आर्य समाज’ आणि ‘प्रार्थना समाज’ ह्या दोन्ही पंथांशी त्यांचा निकटचा संबंध आलेला होता. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती ह्यांच्याविषयी लोकहितवादींना मोठा आदर होता. मुंबई आर्य समाजाचे प्रमुखपदही काही काळ त्यांच्याकडे होते. अहमदाबाद येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता. तथापि ह्या दोन्ही पंथांच्या ते आहारी गेले नव्हते. वेदांतील मंत्रभाग हा ईश्वरप्रणीत होय, आर्य समाजाची भूमिका लोकहितवादींना मान्य नव्हती. वेदांना ते मानवप्रणीत मानीत होते. त्याचप्रमाणे त्यांचा ओढा ज्ञानमार्गकडे असल्यामुळे पुढे भक्तिमार्गाकडे वळलेल्या प्रार्थना समाजाशी ते एकरुप होऊ शकले नाहीत.

लोकहितवादींच्या विचारांकडे दीर्घ काळ उपेक्षेने पाहिले गेले, त्यांचे समकालीन विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी तर त्यांच्यावर अत्यंत कडवड टीका केली. लोकहितवादींसारखे विद्वान इंग्रजांच्या विद्येने दिपून गेलेले असून स्वदेश व स्वधर्म ह्यांच्यावर टीका करून आमचा तेजोभंग करीत आहेत अशी विष्णुशास्त्र्यांची भूमिका होती. तथापि ‘आमच्या व चिपळूणकर ह्यांच्या लेखांतील सत्यासत्यविवेचनाची शक्ती व बुद्धि ज्या विचारी लोकांकडे आहे, त्यांनीच विष्णुशास्त्र्यांना उत्तर द्यावे’ , असे लोकहितवादींनी म्हटले होते. स्वदेश आणि स्वधर्म ह्यांबद्दल लोकहितवादींना निश्चितच अभिमान होता परंतु तत्संबंधीच्या विधायक चिकित्सेला पारखे करणारे अंधत्व त्या अभिमानाला आलेले नव्हते. लोकहितवादींनी मांडलेल्या विचारांचे औचित्य काळानेच दाखवून दिले आहे.

… ‘ Hits: 206
X

Right Click

No right click