१३. नाशिकच्या कारावासात - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१३. नाशिकच्या कारावासात - २
नाशिकच्या तुझुंगात गुरुजींना स्वामी आनंद यांचा सहवास लाभला. स्वामी आनंद हे गांधीजींच्या परिवारामधले. गांधोजींच्या वर्तमानपत्रांचे मुद्रक-प्रकाशक व व्यवस्थापक स्वामी आनंद यांच्या आग्रहावरूनच गांधीजींनी 'सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा' लिहिली. स्वामींनी गुरुजींवर 'भावनामूर्ती' नावाचा लेख गुरुजी गेल्यानंतर १९५० साली लिहिला होता. त्या लेखात त्यांनी गुरुजींच्या नाशिक जेलमधील हृद्य आठवणी लिहिल्या आहेत. स्वामी आनंद लिहितात,“एक दिवस
सकाळी अंमलदाराची फेरी पुरी झाली होती. इतक्यात दोन वॉर्डर एका कैद्याला घेऊन आले. दंडा बेडी ठोकलेला तो कैदी नुसत्या बेड्यांच्या घर्षणाने सोलल्या गेलेल्या घोट्यावर आणखी त्रास होऊ नये म्हणून दोन्ही हातांनी बेड्या वर सारण्याचा प्रयत्न करीत होता. जड पावलांनी मोठ्या कष्टाने तो चालला होता. माझ्यासमोर येताच आपल्या त्या सर्व साजशृंगारासह त्याने माझ्यापुढे साष्टांग नमस्कार घातला. मला संकोचल्यासारखे झाले. मी त्याचे बाहू धरून त्याला उठवले. म्हणालो, 'हे काय? या, फार छान झाले तुम्ही आलात. येथे कोणी नाही. सगळे शांत आहे आणि मी तर तुमचा मित्र आहे.'

“माझी नजर इतका वेळ दंडा बेडीमुळे सोलल्या गेलेल्या त्याच्या घोट्यावर खिळली होती. मी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहिले. ३०-३२ वर्षांचे वय. ठेंगणा मराठी बांधा. केविलवाणा चेहरा. त्यावर वैष्णव स्रियांची विव्हलता. पण डोळे मात्र तेजाचे दोन पुंज! वेधक बुद्धिमत्ता डोळ्यांत जणू मावत नव्हती. मी त्यांच्याकडे पहातच राहिलो. डोळ्यांत नि चेहऱ्यात एवढा फरक! मनात आले, हा कोटीतला पुरुष असावा! ह्या प्राण्याचे नाव साने गुरुजी!”

जेलमध्ये शिस्तभंग केल्यामुळे ज्याला शिक्षा झाली आहे अशा कैद्यांच्या पत्रलेखन, वाचन, भेटीगाठी इत्यादी सवलती काढून घेतल्या जात. गुरुजी असे रोचच्या दृष्टीने शिस्तभंगाची शिक्षा झालेले कैदी होते. म्हणून त्यांना लिहायला,
वाचायला जेलकडून काही मिळत नसे. पण स्वामी आनंद आपल्याजवळील पुस्तके, वह्या, पेन त्यांना देत असत. स्वामीजी लिहितात,

संध्याकाळी आम्हाला कोठड्यात बंद करीत. त्यापूर्वी ते १२० पृष्ठांची वही मागून घेत. सकाळी मी विचारी, 'काय लिहिलेत' ते सासरहून परतलेल्या एखाद्या नववधूभ्रमाणे लाजून एकशे वीस पाने भरलेली वही माझ्या हाती ठेवीत. अक्षरे म्हणजे मोती. प्रत्येक ओळ म्हणजे एकेक मोत्याचा सर! सारी पाने उलटून पाहिली तर एखाद्या ठिकाणी एखादा शब्द की अक्षरही खोडलेले आढळायचे नाही. हिमालयातून बेभान होऊन सहस्रधारांनी बाहेर पडणाऱ्या गंगेप्रमाणे सरस्वती जणू त्यांच्या लेखणीतून वाहू लागे. अक्षरांचा मागोवा घेताना अर्थ, उपमा, काव्य आणि सुभाषिते थकून जात. पाचवीच्या दिवशी त्यांचा प्रारब्ध लेख लिहायला विधात्री आली तो ती काय लिहिते ते पाहण्यासाठी कुतूहलाने सरस्वतीही आली आणि विधात्रीने लिहिलेले वाचून ती इतकी खूष झाली की गुरुजींच्या बोटांवरच कायमचा ठिय्या तिने दिला. या बोटांतून जे जे काही लिहिले जाई ते ते मराठी वाङ्मयात चिरंजीव होण्याची सनद घेऊनच जणू येत असे.

नाशिकच्या तुरुंगात असताना गुरुजींनी पुष्कळ साहित्यानिर्मिती केली. त्यांच्या ठायीच्या साहित्यसृजनतेला या वेळी भरतीच आली होती!

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 424
X

Right Click

No right click