विठूराया
आषाढी व कार्तिकी एकादशीची पंढरपूरची वारी कोणाला बरे ठाऊक नाही ? संसाराच्या रहाटगाडग्यातून थोडेसे बाजूला होऊन पंढरीच्या विठोबाला भेटायला चालत प्रवास करणारी वारकरी मंडळी साऱ्यांच्या परिचयाची आहेत. अशाच एका वारकऱ्याने वारीला येण्याबद्दल मला विचारले. त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल केलेली ही कविता आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळच्या प्रत्येक कामात मला विठूरायाचेच दर्शन कसे घडते हे सांगितले आहे.
विठूराया भेटे मजला
पंढरीला गेल्याविना
येई स्वये भेटायाला
रूपे घेऊनिया नाना
रूपे घेऊनिया नाना - - - १
रामाच्या त्या पाराला गे
झुंजुमंजु होऊ लागे
कोंबड्याच्या आरवणी
भेटे मज चक्रपाणी
भेटे मज चक्रपाणी - - - २
दिनराज येता गगनी
संपुनी ती जाई रजनी
पक्षी गाताती भूपाळी
भेटे मज वनमाळी
भेटे मज वनमाळी - - - ३
गोठ्यामध्ये बोलाविते
हंबरूनी गाय जेंव्हा
वाटे मज कृष्णसखा
वाजवीत येई पावा
वाजवीत येई पावा - - - ४
भर दुपारी उन्हात
वृक्षराज दे साऊली
भेटे मज निसर्गात
पंढरीची विठुमाऊली
पंढरीची विठुमाऊली - - - ५
उन्हे होता ती कलती
झाकाळुनी जाती नभा
भेटे मज कृष्णसखा
गोड हासत तो उभा
गोड हासत तो उभा - - - ६
सूर्य जाता परदेशी
आकाशी तो येई शशी
अवस्था ती लागे कैसी
विठू राही मम मानसी
विठू राही मम मानसी - - - ७
Hits: 192