शारदास्तवन

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

देवी महा शारदे ऽऽऽ
देवी महा शारदे .. .

शुभ्रवस्त्र परिधान करोनी
मणिमोत्यांची माळ घेऊनी
पद्मासनी तू सुखे बैसुनी
कृपा वर्षविसी नयनामधुनी
सद्बुद्धि तू सकला दे ऽऽऽ
सद्बुद्धि तू सकला दे

देवी महा शारदे ऽऽऽ
देवी महा शारदे... १

प्रथम वंदना तुजला करितो
पाटीपुस्तक घेऊनी बसतो
मनापासुनी शाळा शिकतो
दीर्घ साधना करूनी पूजितो
यत्नासी फळ आम्हा दे ऽऽऽ
यत्नासी फळ आम्हा दे

देवी महा शारदे ऽऽऽ
देवी महा शारदे... २

विद्यादेवी तू गे देसी
सकल जना आधार नि स्फूर्ती
तव स्फूर्तीने मिळे आम्हासी
नवसंजीवनी या गीती ती
चरणी तुझ्या लागू दे ऽऽऽ
चरणी तुझ्या लागू दे

देवी महा शारदे ऽऽऽ
देवी महा शारदे... ३

सकलकला ह्या जन्मा येती
तव वीणाझंकारामधुनी
तुझी लेकरे म्हणुनी गाती
अखंड तव कीर्ती अन्‌ भक्ती
करुणा तुला येऊ दे ऽऽऽ
करुणा तुला येऊ दे

देवी महा शारदे ऽऽऽ
देवी महा शारदे... ४

दुष्टराक्षसा निर्दालत तू
संतजना वरदान देत तू
ब्रह्माविष्णुमहेशमात तू
सकलजगा आधारभूत तू
आशीष तुझा लाभू दे ऽऽऽ

देवी महा शारदे ऽऽऽ
देवी महा शारदे...५

Hits: 84
X

Right Click

No right click