स्वागत

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

स्वागत

खूप खूप दिवसांनी माहेरी येणाऱ्या लाडक्या लेकीचे स्वागत करायला सारे घरदार आतुर झालेले असते. घरातल्या माणसांप्रमाणेच घराभोवतालच्या बागेतली झाडेझुडपेही पानाफुलांनी नटूनथटून अतिथीस्वागतास तयार आहेत. कोकिळ, मैना, मोर, चातक इत्यादी मनरूपी पक्ष्यांनीही सुवासिक फुलांची संगत धरलेली आहे. या साऱ्या गोष्टींचे वर्णन कवितेत केले आहे.

स्वागताला तुझ्या मोगरा फुलतो
मोगरा फुलता मनमयूर नाचतो . . . १

स्वागताला तुझ्या जाई फुलारते
जाई फुलारता मनमैना मंजूळते . . . २

स्वागताला तुझ्या पारिजात बहरतो
पारिजात बहरता मनरावा हिंदोळतो . . . ३

स्वागताला तुझ्या जुई उमलते
जुई उमलता मनमयूरी डोलते . . . ४

स्वागताला तुझ्या गुलाब खुलतो
गुलाब खुलता मनबुलबुल बोलतो . . . ५

स्वागताला तुझ्या रातराणी गंधाळते
रातराणी गंधाळता मनचकोरी नाहते . . . ६

स्वागताला तुझ्या कुंद डवरतो
कुंद डवरता मनचातक भिजतो . . . ७

स्वागताला तुझ्या आंबा मोहोरतो
आंबा मोहोरता मनकोकिळ कूजतो . . . ८

स्वागताला तुझ्या घरदारही सजते
घरदारही सजता मन चिंबचिंब होते . . . ९

Hits: 149
X

Right Click

No right click