भेटीचा योग

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

भेटीचा योग

नातवंडे परदेशी अमेरिकेत. त्यातून पहिला विमानप्रवास ! तोही ३० तासांचा ! विमानतळावरचे सर्व सोपस्कार यथासांग पार पाडल्याने मन थोडे हलके झालेले. उतरवून घ्यायला आलेल्या लेक नातवंडांशी झालेली पहिली भेट. अशावेळी शब्दांच्याऐवजी डोळयातील गंगायमुनांचा पूरच सारे काही सांगून जातो.

आजकालची बरीच मंडळी परदेशाला जाती
उच्च शिक्षणा,नोकरी करण्या धरूनी हेतु मनी ती . . १

भिन्न जरीही असल्या तेथील भाषा रीतीभाती
थोडेही ना अडून बसती तज्ञ परि ती होती . . . २

पाण्यामध्ये राहात असता माशाशी त्या दोस्ती
केल्याविण ना जळात जैसे कोणी राहू शकती . . . ३

अशी एकदा सुवर्णसंधी आली अमुच्या हाती
स्वये राहण्या सायीसंगे दुग्धावरल्या प्रीती . . . ४

आनंदाने मातपित्यांचे नेत्रही भरूनी जाती
कौतुक करण्या पुढील पिढीचे परदेशाला जाती . . . ५

प्रथमविमानप्रवासभीती मनामधे ती होती
परि भेटीची ती अधिक माझिया ओढ मनामधि होती .६

तीसही घंटे प्रवास करिता भेट जेधवा झाली
भेटीचा त्या योग पाहण्या नयनी आसवे आली . . . ७

Hits: 147
X

Right Click

No right click