आरसा

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

आरसा

माणसाचे मन हे आरशासारखे निर्मळ असते. सुख, दु:ख, राग, लोभ, समाधान इत्यादी साऱ्या भावना त्या त्यावेळी माणसाच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालेल्या दिसतात.

आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे
मनातल्या त्या भावभावना सकला दावितसे
तो सकला दावितसे . . . ध्रु. ।।

आंनदचि तो होता त्याच्या वदनी विलसतसे
मुक्तपणाने आंनदाची उधळण करीतसे
आनंदाचे अमृतकण तो सकला देतसे
स्वर्गसुखाच्या लाभाने तो मोहरून येतसे
तो मोहरून येतसे
आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे . . . १

दु:खाचे ते डोंगर सहजी पचवू शकतसे
संकटावरी मात करोनि मार्ग क्रमीतसे
विपत्तिच्या त्या लाटांवरती स्वार होतसे
कधीमधी परि मनिची खळबळ वदनी दिसतसे
त्याच्या वदनी दिसतसे
आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे . . . २

गोष्टी घडता नावडत्या मनि राग येतसे
दुर्वासचि तो मनात त्याच्या जन्मा येतसे
संतापाने चेहरा लालीलाल होतसे
प्रतिबिंबचि जे मनातले ते वदनी अवतरसे
त्याच्या वदनी अवतरसे
आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे . . . ३

सर्वजनांच्या कल्याणस्तव सदैव प्रयतावे
प्रसाधनापरि दोन गोड शब्द ओठी लावावे
चंदनापरि झिजवुनी देहा सूखचि उधळावे
चांदणे मग चित्तामधले वदनी उतरसे
त्याच्या वदनी उतरसे
आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे . . . ४

Hits: 152
X

Right Click

No right click