वृद्धत्व

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

वृद्धत्व

बालपण, तरूणपण व म्हातारपण या तीन नैसर्गिक अवस्था आहेत. प्रत्येक माणसाला त्या तीनही अवस्थातून जावे लागते. बालपण व तरूणपणातील दिवस भरभर सरकतात. पण म्हातारपणातील दिवस मात्र मुंगीच्या पावलांनी सरकत असतात. या काळात बालपणीच्या आठवणी पुन्हा पुन्हा मनात डोकावू लागतात. वृद्धत्वाची सावली शरीरावर पडू लागली तरी खचून न जाता हसतमुखाने तिचे स्वागत करावे हे या कवितालेखनाचे तात्पर्य.

कोडे ना उलगडले
झणी वृद्धत्वचि ते आले . . .

बाळपणीचे खेळही स्मरती
लपाछपी अन् पळापळी ती
हुतुतू कधी तर कधी लगोरी
आठवणी मज करिती बावरी
चित्र हळू ते सरले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ।।१।।

इवल्या इवल्या चिंचा कैऱ्या
गोड तेधवा गमती साऱ्या
आंबट चिंबट दातही होती
सानवयी त्या तरि आवडती
दृश्य कसे विरघळले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ।।२।।

भुरूभुरू उडती केस रूपेरी
ना ना म्हणते मान ही खरी
काठी झाली सखी जिवाची
मनात दाटी भूतकाळाची
गाली क्षण ओघळले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ।।३।।

वेळेचे ना बंधन उरले
जे जे होते हरवून गेले
करण्याचे वा राहुन गेले
अखेर मजला परि गवसले
कळले देवा कळले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ।।४।।

उतरणीस ती गाडी लागली
मतीस ठेवी सदा चांगली
परमेशाच्या परी पदकमली
विनती माझी एकचि इवली
हसूनि स्वागत केले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ।।५।।

Hits: 155
X

Right Click

No right click