विनती

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

विनती

जगात जेंव्हा जेंव्हा महायुद्धे झाली तेंव्हा त्यात सामान्य जनता भरडली गेली. अगदी परवा परवा झालेल्या अमेरिका व इराकमधील युद्धाच्या वेळीही हेच घडले. दुसऱ्याच्या घरात डोकावून न बघता माणूस आपापल्या घरात जर सुखाने राहिला तर ही वेळच याणार नाही. जॉर्ज बुश व सद्दाम हुसेन या दोघांनाही देवाने समजूतदारपणा द्यावा अशी विनंती येशू व अल्लाकडे केली आहे.

इतिहासाच्या पानोपानी
रक्त रंजित पडती सडे
युध्दाच्या त्या खाईमध्ये
देश अडकती बडे बडे . . . १

दो हत्तींच्या लढतीमध्ये
चिरडुनी जाती सान किडे
तैसे जाई प्रजाजनांचे
मोडुनी मग ते कंबरडे . . . २

जगात सगळे जुलुस काढती
युध्द नको मज शांती हवी
परि आर्त स्वरांनी पुकारलेली
कानी हाक त्या कशी जावी . . . ३

पैशाच्या त्या जोरावरती
शिकवू नये कुणी कुणा धडे
परस्परातील वैरापायी
सदैव जगती युध्द घडे . . . ४

सुखी रहा तू तुझ्या घरी
अन् मीही राहतो सुखी इकडे
सुमती ऐसी जरी ठेवता
नांदे शांती चोहीकडे . . . ५

हुसेन आणखी बुश दोघांना
सौजन्यचि ते दे थोडे
विनती माझी एकचि इवली
अल्ला आणि येशुकडे

Hits: 174
X

Right Click

No right click