आळस

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

आळस

माणसाच्या शरीरात आळस, कंटाळा हा अनाहूतपणे नकळत घरात घुसणाऱ्या मांजरासारखा वस्तीला आलेला असतो. त्या आळसाशी एक शब्दही न बोलता, त्याची अजिबात सरबराई न करता त्याला घरातून म्हणजे शरीरातून दूर हाकलून देण्यासाठी मनाला केलेला उपदेश आहे. आळस गेल्यावर केलेल्या प्रयत्नातूनच यशप्राप्ती होते.

आळस असे हा शत्रु आपुला
कधी न ठाऊक येई घरी
गुपचूप येई चोरपाऊली
लबाड जैसी मनीमांजरी --- १

चेहरामोहरा दिसे न याचा
हातपाय ना दिसती जरी
भल्याभल्यांना दावी वाकुल्या
करणी याची अजब खरी --- २

तळ ठोकुनी बसे आळस हा
काही केल्या हालत नसे
कळे न मजला हाकलुनी देऊ
या रिपुराजा कुठे कसे --- ३

आळस सोडुनी देई मना बा
उद्योगाची कास धरी
दोन शब्द ना बोल त्याजशी
काम उद्याचे आज करी --- ४

पुन्हा पुन्हा रे कथिते तुजला
विचार थोडा तरी करी
झटकुनी देई बळेचि आळसा
दिसे तेधवा खरा हरी -- ५

Hits: 136
X

Right Click

No right click