निसर्गशोभा
जंगलझाडीत, वाट काढीत
आगीनगाडी ही, जाई ऐटीत
कोणी रमती, चहापाण्यात
इतर कोणी, निद्रादेवीत
बसती सारे , जरी खिडकीत
निसर्गगमती, न्याहाळीत
निसर्गगमती, न्याहाळीत ... १
घनदाटशी , झाडी ही रानी
हिरवी माया, पानोपानी
पक्षी मंजूळ, गाती गाणी
मनुष्यवाणी, येत ना कर्णी
सुखात खेळे, वनाची राणी
देवरायाची, अजब करणी
देवरायाची, अजब करणी .. . २
पळसाला येई, मोहोर भारी
सोनेरी पदर, डोईच्या वरी
हिरवी साडी, जणू जरतारी
नेसूनि येई, नवी नवरी
वरूणराजाची, कृपा ही सारी
सृष्टीत वृष्टीने, किमया करी
सृष्टीत वृष्टीने, किमया करी... ३
नारळी पोफळी, चवेणी केळी
साऱ्यांना येई, नवी झळाळी
ठायी ठायी, साठती तळी
लाल पांढरी, कमळे जळी
बदके बगळे, तळ्याच्या पाळी
चंगळ साऱ्यांची, होई आगळी
चंगळ साऱ्यांची, होई आगळी . . . ४
डोंगरमाथेही, बुडूनी जाती
भल्याथोरल्या, झाडांची दाटी
सूर्याची किरणे ना, येऊ शकती
खोलखालती, धरणीवरती
मखमली शालू ,लेऊनी अंगी
समाधानी परि, दिसे धरती
समाधानी परि, दिसे धरती... ५
असूनी डोळे, काही आंधळे
निसर्गशोभा, त्यासी ना कळे
पाहाया सृष्टीचे , निसर्गमळे
उघडे ठेवावे, लागती डोळे
परमेशाचे, रूप आगळे
याहूनी मज ना, वाटे निराळे
याहूनी मज ना, वाटे निराळे .. . ६
Hits: 131