पायीची वीट
युगे अठ्ठावीस त्याचा लाभे तुला संग
पूर्वजन्मी केलेसी तू पुण्य शिगोशीग
आनंदे गे एके ठायी तरी नाही खंत
पायीची तू वीट त्याच्या होसी भाग्यवंत . . . १
ज्ञानदेव तुकया नामा होती किती संत
गणती ती त्यांची करण्या नसे हो महंत
स्वर्गसुखप्राप्ती तुजला मिळे ही अनंत
पायीची तू वीट त्याच्या होसी भाग्यवंत . . . २
परिसाच्या स्पर्शे जैसे लोहाचे हो सोने
तैसे तुला लाभले गे भाग्य हे देखणे
जगी वाटे एकचि तू गे खरी पुण्यवंत
पायीची तू वीट त्याच्या होसी भाग्यवंत . .. ३
दैववशे जे जे लाभे त्यात समाधान
कायावाचामने त्याला करिसी अर्पण
शिरपेचाचा ना हेवा करिसी मनात
पायीची तू वीट त्याच्या होसी भाग्यवंत . . . ४
Hits: 124