हिशोब
आयुष्याच्या अधिक-उण्याचा
तर्क मनी मी मांडियला
द्यावे तेंव्हा घ्यावे ऐसा
हिशोब हाती ये पहिला... १
कष्ट अगोदर फळ ये नंतर
नियम असे हा ठरलेला
सुखदु:खाचे मिश्रित आसू
येती दोन्ही नयनाला ... २
पैसा-अडका जमीन-जुमला
इतुके नच ये कामाला
शरीरसंपदा हाती असता
व्यर्थचि करणे चिंतेला ... ३
दिवसभराचे काम करोनी
सूर्य जातसे अस्ताला
प्रखर प्रकाशानंतर वाटे
शीतल मग तीचंद्रकला ... ४
आयुष्याच्या प्रथम वयातील
कष्टचि येती मदतीला
उतारवयीही आनंदी मन
हरितपालवी शरीराला ... ५
सदासर्वदा खरे बोलता
तेज चढे मग वाणीला
विनाकष्ट त्या मूर्तीमधल्या
नये आळवू देवाला... ६
लोभमोह अन् मदमत्सरा
दूर् सारता रागाला
आनंदचि मग दिसेल आपणा
गगनी व्यापूनी उरलेला . . . ७
Hits: 112