उणीव
जग हे सोडूनी गेला आपण
त्याला आजि हे तप झाले
बापुडवाण्या मने माझिया
कधी न मुळी ते मानियले - - - १
सांजसकाळी वंदन करूनी
आशीष अपुले मिळवियले
नाते अपुले माय-लेकीचे
सदैव ते मी मनी जपले - - - २
संस्कारचि जे केले आपण
सांभाळूनी त्या ठेवियले
पुढील पिढीच्या ओंजळीमधी
अलगद सारे सोपविले -- - 3
बकुळफुलापरि सदा सुगंधित
स्मृतिसुमने हृदयी जपली
माला त्यांची नयनमनोहर
चरणी आपुल्या अर्पियली - - - -४
आपुल्याच त्या शुभाशीषाने
घर हे सारे सुखी असे
परि उणीव आपणा उभयजनांची
गगना व्यापूनी उरलीसे -- - ५
Hits: 74