वृद्धत्व

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

कोडे ना उलगडले
झणी वृद्धत्वचि ते आले . . .

बाळपणीचे खेळही स्मरती
लपाछपी अन्‌ पळापळी ती
हुतूतू कधी तर कधी लगोरी
आठवणी मज करिती बावरी

चित्र हळू ते सरले
झणी वृद्धत्वचि ते आले . . .॥१॥

इवल्या इवल्या चिंचा कैऱ्या
गोड तेधवा गमती साऱ्या
आंबट चिंबट दातही होती
सानवयी त्या तरि आवडती
दृश्य कसे विरघळले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ॥२॥

भुरूभुरू उडती केस रूपेरी
ना ना म्हणते मान ही खरी
काठी झाली सखी जिवाची
मनात दाटी भूतकाळाची

गाली क्षण ओघळले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ।।३॥।
वेळेचे ना बंधन उरले
जे जे होते हरवून गेले
करण्याचे वा राहून गेले
अखेर मजला परि गवसले
कळले देवा कळले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ॥४॥

उतरणीस ती गाडी लागली
मतीस ठेवी सदा चांगली
परमेशाच्या परी पदकमली
विनती माझी एकचि इवली

हसूनि स्वागत केले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ॥५॥

Hits: 91
X

Right Click

No right click