उपोद्धात - २
मराठ्यांच्या कर्तबगारीमुळें महाराष्ट्र जरी एका काळी महत्तर बनलें होते, तरी हे मराठे लोक एका काळी सर्व हिंदुस्थानाला अजिंक्य भासत होते, तरी त्यांनासुद्धा
इंग्रजांनीं जिंकलें, यावरून इंग्रजांच्या अंगी नसणारे कांही विशेष राजकीय दुर्गुण मराठ्यांच्या अंगी जन्मसिद्ध असले पाहिजेत, काही विशेष गैरसोईच्या परिस्थितीने
त्यांचे हातपाय जखडले गेले असले पाहिजेत, आणि अशा दुर्गुणांचा व परिस्थितीचा फायदा इंग्रजांस मिळाला असला पाहिजे हे त्पष्ट आहे. तर असे हे मराठ्यांचे
दुर्गुण कोणते होते ब त्यांच्या परिस्थितींत कोणत्या गैरसोई होत्या याचा आपण विचार करू.
मराठ्यांमधला प्रमुख दुर्गुण म्हटला तर देशाभिमानाचा बहुतांशी अभाव हा होय. या सद्गुणाची पैदासच जर मुळी हिंदुस्थानांत अत्यल्प होते, तर महाराष्ट्राच्या वांटणीस त्यांतला कितीसा अंश येणार. आम्ही लोक गरीब भाबडे असल्याचें सर्व जगाला प्राचीन काळापासून माहीत आहें. कोणीही परके लोक आम्हांवर स्वाऱ्या करत आणि आमची राज्यें बळकावीत, आमच्या ग्रामसंस्था भ्रमसमजुती, रीतिरिवाज, वतनहक्क, यांत राज्यकर्ते जेथपर्यत हात घालत नाहीत तेथपर्यंत ते लोक कोण आहेत, काय करतात, याची पंवाईत आम्ही करीत नाही. धार्मिक बाबतींत परमतासहिष्णुता ह्वा दुर्गुण आहे. हे आम्हांस ठाऊक आहे; पण राजकीय बाबतींत परचक्रासहिष्णुता हा अमोलिक सद्गुण आहे हे आम्हांला ठाऊक नाही ! शिवाजीपासून शाहूच्या कारकीर्दीसस सुरुवात होईपर्यंत मराठे लोकांत देशाभिमानाचें वारे खेळत होतें असे पुष्कळांस वाटतें; पण त्या वृत्तीला देशाभिमान हें नांव देण्यापेक्षा राज्याभिमान हेंच नांव देणें अधिक योग्य आहे. कारण की, महाराजांच्या फौजेतले मराठे जर मुसलमानांशी एकनिष्ठेने लढत होते तर त्यांचेच आणखी भाऊबंद मुसलमानी फौजांत होते तेहि तितक्याच एकनिष्ठेनें महाराजांच्या फौजांशी लढत होते ! शाहूच्या कारकीर्दींत राज्याच्या दोन वाटण्या झाल्याबरोबर या राज्याभिमानाचेही दोन तुकडे होऊन पेशवे भोसले गायकवाड आंग्रे प्रतिनिधी सचिव कोल्हापूरकर इत्यादि संस्थानें झाली, आणि त्याही संस्थानांतून शिंदे होळकर पटवर्धन रास्ते इत्यांदी आणखी सरंजाम निर्माण झाले; त्याबरोबर वर सांगितलेल्या राज्याभिमानाचेहि आणखी बारीक तुकडे होत होत. शेवटी तो अस्त झाला ! पेशवाईच्या काळांत राज्याभिमान अस्तित्वात होता म्हणावें तर त्या राज्याचे शत्रू निजामअली व हैदरअली यांच्या पदरी हजारों मराठे शिलेदार व सरदार होते; आणि ते पेशव्यांशी लढतांना त्यांचें नुकसान करण्यास बिलकूल कसूर करीत नव्हते. पेशवाईबद्दल ब्राह्यणांना तरी अभिमान होता
म्हणावें तर तेही पेशव्यांशी वैरभाव धरणाऱ्या जाट रोहिले रजपूत इंग्रज फ्रेंच -इत्यादी लोकांच्या पदरी राहून पेशवाईचे अकल्याण करण्यास प्रवृत्त होतच होते.
ईस्ट इंडिया कंपनीची मुंबईखात्याची पायदळ पलटण पेशवाईची रयत असलेल्या मराठ्यांचीच होती आणि यांपैकी हजारो लोक इंग्रजांच्या वतीने समरांगणांत पेशवाई
फौजांशी लढतांना मृत्यू पावले आहेत.
याच्या उलट इंग्रजांचा देशाभिमान कसा प्रखर व शाबूत होता हें सुप्रसिद्धच आहे. एका इंग्रज डॉक्टरानें बादशहाच्या मुलाला औषध देऊन बरे केलें तेव्हां बादशाह खुषीनें त्या डॉक्टराला लाख पन्नास हजार रुपये देता; परंतु डॉक्टराने दुसरें कांही बक्षीस न घेतां बादशाहास अर्ज केला की, माझ्या देशाच्या लोकांस तुमच्या राज्यांत व्यापाराची सवलत द्या म्हणजे मला बक्षीस पोचले. मीर जाफरच्या मृत्युपत्रामुळें क्लाइव्हला मिळालेल्या पैश्याचा विनियोग त्यानें आपल्या देशाच्या लष्करी अंमलदारांच्य़ा उपयोगार्थ केला आणि खर्ड्याच्या लढाईनंतरवा तह ठरवितेवेळी निजामअलीनें नाना फडणवीस यास वीस इजार रुपये उत्पन्नाचे गांव दिलें तें त्याने स्वतःकरितां खुशाल ठेवून घेतले. चारचौघांनीं मिळून एखादी संस्था चालविण्याची अगर एखादा कारभार पार पाडण्याची आम्हांला संवय नाही; यामुळें तसें कार्य आमच्या अंगावर पडलेच तर तें एकचित्तानें चालवणे आमच्या हातून निभत नाही. मतभेद व तट पहून शेवटी तंटे होतात, पुष्कळ वेळां ते तंटे विकोपास जाऊन भलताच अनर्थ ओढवतो, हें आपण नेहमी पहातो. जी गोष्ट हांच्या व्यवहारांत तीच पूर्वीच्या राज्यकारभारांत घडून येत होती.
Hits: 110