उपोद्धात - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर Written by सौ. शुभांगी रानडे

शिवाजी दिल्लीस गेला तेव्हां मोरोपंत पेशवे व अण्णाजी दत्तो सचिव यांजवर राज्याचा कुलमुखत्यार सोंपवून गेला होता. पण त्या दोघांत मत्सर व द्वेष उत्पन्न झाल्यामुळें राज्यकारभार सुरळीतपणे चालेनासा झाला ! शिवाजी लौकरच परत आल्यामुळें त्या वेळी वाईट परिणाम झाला नाही, तरी पुढें तो संभाजीच्या कारकीर्दीत झालाच ! राजारामानें संताजीस मुख्य व धनाजीस दुय्यम सेनापति नेमून त्यांवर सैन्याचा सर्व कारभार सोंपविला असतां त्या दोघांत चुरस वाढून संताजी मारला गेला! शाहूच्या कारकीर्दींत सेनाकर्ते व सेनापति यांची एका मोहिमेवर रवानगी झाली असतां भांडण होऊन सेनाकर्त्यांवर मोठाच संकटाचा प्रसंग ओढवला होता ! प्रत्येक स्वारीतला पत्रव्यवहार पहा, हाताखालच्या सरदारांनी मुख्य सरदारासी बांकून वागावे, कुचरपणा करावा, फंद्फितुर करावा, असें कधी घडून आलें नाही असा प्रसंग फारच विरळा. बारभाईंच्या कारस्थानाचा कसा बोजवारा झाला ! नाना, बापू, मोरोबा व चिंतो विठ्ठल कसे भांडले, आणि शेंवटच्या दोघांनी आपल्या सोबत्यांवर सूड उगवण्याच्या हट्टास पडून पेशवाई इंग्रजांच्या घशात घालण्याचा कसा घाट घातला होता, हें प्रसिद्धच आहे. इंग्रज लोकांत असे तंटे होत नाहींत असें नाही; नेहमी होतात. परंतु समूहस्वरूपाची कामे करण्याचें त्यांच्या अंगवळणी पडलें असल्यामुळें त्यांचे तंटे विकोपास जाऊन उद्दिष्ट कार्यांचा घात होण्याचें भय नसतें.

समूहस्वरूपानें आम्ही केलेली कार्ये यशस्वी होत नसल्यामुळें आमचें राज्यतंत्र पाश्चात्यांप्रमाणे संस्थाप्रधान असू शकत नाही; तर तें व्यक्तिप्रधानच असावे लागतें- म्हणजे बुद्धिमान उत्साही निग्रही अशा एखाद्या प्रबळ व्यक्तीने पुढें सरून मुख्याधिकारी व्हावें आणि इतरांना त्याच्या प्रेरणेनें कामें करावी असेच आमच्या प्रकृतीला मानवते. पण जेव्हां अशी एखादी प्रबळ व्यक्ति अधिकारारूढ होते तेव्हां आधी प्रथम ती अधिकार आपल्या घराण्यांत कायमचा राहील असाच बंदोबस्त करून टाकते! असे एका कुळांतले अधिकारी एकामागून एक चांगले निपजले तर राज्यतंत्र उत्तमच चालते. पण तसें घडलें नाही, एखादी व्यक्ति वाईट निघाली, तर ते एकदम कोसळते. शिवाजाीने माणसें तयार केली, किल्ले बांधले, सेना व आरमार निर्माण केलें, प्रत्येक खात्याच्या शिस्ती बांधून दिल्या, सर्व कांही केले; पण मागून संभाजी गादीवर येताच मागची पंचवीस-तीस वर्षांची मेहनत मातीमोल झाली. बाळाजीपंत नाना-आसूच माधवरावापर्यंत एकामागून एक चार पेशवे चांगले निर्माण झाले यामुळें पेशवाईचे राज्यतंत्र ठीक चाललें. पण त्यांमागून राघोबाची उत्सवमूर्ति पुढें येतांच तंटा-भांडणांचा सुकाळ होऊन राज्यास कायमची उतरती कळा लागली ! नाना फडणवीस हे मराठ्यांतील अद्वितीय कारस्थानी पुरुष होते, महादजी शिंदे मराठ्यांतले अद्वितीय सेनानायक होते, हें खरे; पण ते मेल्यावर पुढें काय १ पुढे सारा अंधार ! त्यांची अक्कल व खांबी करामत त्यांच्याबरोबर गेली ती गेलीच ईस्ट इंडिया कंपनीसारख्या संस्थेत असा प्रकार कधी होऊ शकत नाही.

तिचा प्रमुख अधिकार आधी अयोग्य माणसाच्या हाती जातच नाही; आणि गेलाच तरी तो माणूस संस्थेच्या कायद्यांनी चोहोकहून जखडून गेला असल्यामुळें संभाजी अगर बाजीराव यांप्रमाणे स्वच्छंदानें वागू शकत नाही. संस्थेच्या कारभारांत कालभानाप्रमाणे नेहमी नवें जुने दोत असते. त्यांत नवा उत्साह, नव्या कल्पना, नवे मार्गे, यांची भर पडत असते. त्यामुळे तिचा जोम व व्याप कायम राहून क्रियासातत्य अविच्छिन्न राहते. एकसत्ताक राज्य चांगलें की अनेकसत्ताक राज्य चांगलें, या वादाशी येथें कांही कर्तव्य नाही. पेशवाईचे राज्यतंत्र अव्यवस्थित व व्यक्तिप्रधान होते, आणि ईस्ट इंडिया कंपनीचे राज्यतंत्र सुव्यवस्थित व संस्थाप्रधान होतें. पहिल्याचा उत्साह मावळत चालला होता, तर दुसऱ्याचा अधिकाधिक वर्धमान होत होता, एवढेंच आम्हांला सांगावयार्चे आहे.

आमच्या लोकांत ज्ञाना्र्जनाची हौस नाही. नवीन कल्पना बसवावी, नवीन शोध लावावे, हा हव्यास आम्हांला नाही. कोणी कल्पक अगर शोधक मनुष्य निघालाच तर पडेल तो पैका खर्च करून त्या मनुष्यास उत्तेजन देऊन त्याची नवी कल्पना अगर शोध व्यवहारांत आणावा याची जरूरीच आम्हांला भासत नाही दुसऱ्याचे नुसते अनुकरण करण्याची बुद्धि मात्र आम्हांस आहे एवढें खरे,

Hits: 117
X

Right Click

No right click