११. रयत शिक्षण संस्थेची अर्थव्यवस्था - १
प्रकरण अकरावे
११. रयत शिक्षण संस्थेची अर्थव्यवस्था - १
रयत शिक्षण संस्थेच्या कार्याने प्रभावित झालेल्या कोणाही जिज्ञासूला पहिला प्रश्न पडतो की संत्था आपल्या वैविध्यपूर्व कार्यासाठी पैसा कसा उभा करते?
सुरवातीस भाऊरावांनी हितचिंतकांच्या देणग्या व उभय पतिपत्नीच्या आर्थिक त्यागावर भर दिलेला दिसून येतो. सत्यशोधक समाजाचा प्रचारक म्हणून हिंडताना त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. सन १९१९ व १९२१ साली काले व नेर्ल या ठिकाणी पहिली वसतिगृहे रयत शिक्षण संस्थेमार्फत सुरू करताना ग्रामीण जनतेचा भाऊरावांच्या नि:स्वार्थी व निरिच्छ वृत्तीवर पूर्ण विश्वास होता. लोकांनी वसतिगृहे चालविण्यास धान्य, इमारत व पैसेरूपाने मदत केली. साताऱ्यास सन १९२४ साली छत्रपती शाहू वसतिगृह चालविताना मात्र भाऊरावांना मोठ्या प्रमाणावर पदरमोड करावी लागली. स्वत:च्या प्राप्तीपैकी किर्लोस्कर कंपनीचे सहभाग, विम्यातून मिळालेली रक्कम, पत्नीच्या - सौ. लक्ष्मीबाई पाटलांच्या - अंगावरील मंगळसूत्रासह दागिने यांचा त्यात समावेश होता.
या त्यागात त्यांच्या निरिच्छपणाने परिसीमा गाठल्याचे दिसून येते. त्यागीवृत्तीने भारावून जाई व वसतिगृहासाठी लहानमोठे आर्थिक साहाय्य करीत असें. याची प्रमुख उदाहरणे म्हणजे बडोद्याचे सयाजीराव महाराज, फलटणचे राजे मालोजीराव नाईक निंबाळकर व कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराज आणि ग्वाल्हेरचे महाराज जिवाजीराव शिंदे. या उलट नेर्ल्याच्या लंगोटीबहाद्दर शेतकर्याने आपल्या फाटक्या मुंडाशात बांधलेले चार आणे भाऊरावांना दिले. ग्रॅंटबंदीच्या काळात पायली-अधोलीने शेतकऱ्यांनी धान्य दिले. सारांश, लोकसंग्रहातून जनतेचा फार मोठा आधार रयत शिक्षण संस्था चालविण्यास भाऊरावांना त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत मिळत राहिला. हे कसे घडले? तर भाऊराव दाखवून देत की, गरीब व हुशार मुलांच्या शिक्षणात गुंतविलेले हे जनतेचे भांडवल आहे.
३) संस्थेच्या अर्थव्यवस्थेस त्रिकोणाची संज्ञा देता येते. श्री. भाऊरावांचा वैयक्तिक त्याग हा पाया आहे. वरील आर्थिक त्रिकोणाची जनसहाय्य ही एक भक्कम बाजू आहे. दुसरी बाजू आहे संस्थेच्या आजीव सेवकांनी, शिक्षकांनी व मुलांनी स्वावलंबन व आत्मनिर्भरतेच्या तत्त्वानुसार केलेला त्याग. शिक्षकांनी कमी पगारावर कामे करून संस्थेच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घातली, तर विद्यार्थ्यांनी स्वावलंबन व स्वकष्टातून वसतिगृहाचा खर्च कमीतकमी ठेवण्यासाठी अंतर्गत काटकसर अवलंबिली होती. या भक्कम पायाभूत त्रिकोणावर इमारत उभी करण्याचे कामं शासनाकडून वेळोवेळी मिळालेल्या अनुदानातून झाले आहे.
Hits: 119