१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - ६

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - ६

विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत महाराष्ट्रात शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीत एक प्रकारची कोंडी झाली होती. ती फोडण्यासाठी कोणते धाडस करावयाचे ? परिस्थितीस कसे वळण द्यावयाचे वा तिचा कसा उपयोग करावयाचा ? यासाठी जाणकारांची आवश्यकता होती. भाऊरावांजवळ ती जाण व कौशल्य होते. भाऊराव म्हणत, “माझ्याकडे रयत शिक्षण संस्थेच्या वाढीचा निश्‍चित आराखडा नव्हता. अंधारात हातात बॅटरी घेऊन चालणार्‍याप्रमाणे माझे काम होते. बॅटरीच्या प्रकाशात दिसेल तेवढा मार्ग आक्रमावयाचा. वाटेतील खड्डे, अडथळे टाळावयाचे, पुन्हा बँटरीचा प्रकाश टाकावयाचा व पुढचा दिसणारा मार्ग तुडवावयाचा, वाटेत येणारे विषारी सर्प व प्राणी टाळावयाचे !” भाऊरावांचे हे वागणे सुरवातीच्या अमेरिकन वसाहतवाल्यासारखे होते. जंगल तोडत, वसाहत करीत, जमीन पादाक्रांत करावयाची. अशा अमेरिकनांच्या या वृत्तीस इंग्रजीत प्रॅग्मटिझम हा शब्द प्रथम वापरण्यात आला. मराठीत प्रागतिक व्यवहारवाद किंवा प्रायोगिक पद्धती म्हटले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अज्ञानाचे जंगल, प्रायोगिक पद्धतीने साफ करण्याचे काम भाऊरावांना करावयाचे होते.

अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ डॉ. जॉन ड्युई यांनी शिक्षणक्षेत्रातील कूटप्रश्‍न प्रयोगाद्वारे सोडविण्याच्या प्रायोगिक पद्धतीस वा प्रागतिक प्रायोगिक शिक्षणपद्धतीस प्रॅग्मेटिझम हे नाव दिले. भाऊरावांनीही प्रयोगाद्वारे आपले शैक्षणिक तत्त्वज्ञान सांगितळे आहे. त्यास आपण भारतीय प्रॅम्मेटिझम हे नाव देणेच योग्य ठरेल. डॉ. जॉन ड्युईनी प्रथम प्रश्‍न अंदाजून त्यास प्रयोगाद्वारे उत्तरे शोधली. भाऊरावांपुढे प्रथम प्रश्‍नच उभे राहिले व त्यास उत्तरे कष्टसाध्य प्रयोगातून आपोआप मिळत गेली. असा फरक डॉ. जॉन ड्थुई व भाऊरावांच्या प्रायोगिक शिक्षण पद्धतीत आहे. मात्र भारतातील निरक्षरांस साक्षर करण्याचा व त्यावर माध्यमिक व उच्च शिक्षणाचा इमला उभारण्याचा अवाढव्य प्रश्‍न भाऊरावापुढे होता. डॉ. जॉन ड्युई पुढे मूळात साक्ष असलेल्या जनतेच्या उच्चतर शिक्षणात सुधारणा करण्याचा प्रश्‍न होता. हा मूलभूत फरक दोघांत होता. भाऊरावांनी भारतीय शिक्षणसंस्थांच्या पुढे या प्रागतिक प्रायोगिक शिक्षणपद्धतीचा एंक वेगळाच आकृतिबंध आपल्या प्रयोगातून व त्यासोबतच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानातून अनुकरणासाठी ठेवला.

Hits: 129
X

Right Click

No right click