१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - २
१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - २
४) भाऊरावांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान त्यांनी शाळा, महाविद्यालये व वसतिगृहे यांत केलेल्या प्रयोगांतून निर्माण झालेले आहे. त्यांना व्यावहारिक असामान्य बुद्धी होती व तिला औपचारिक संशोधनाची बैठक नव्हती हे मान्य कसनही त्यांनी शिक्षणक्षेत्रात मौलिक भर टाकली हे मान्यच करावे लागते. अशी काही उदाहरणे भूतकाळात घडली आहेत. पहिले उदाहरण आहे ते अकबर बादशहाचे. अकबर जवळ जवळ निरक्षर होता, पण नैसर्गिक बुद्धिमत्ता असल्याने त्याने शिक्षणात भर घातली. त्याने शिक्षणाच्या पद्धती व अभ्यासक्रम यात सुधारणा केल्या. मुलांच्या स्वाध्यायावर त्याने भर तर दिलाच, पण शेती, हिशेब, प्रशासन यासारखे विषय अभ्यासक्रमात घातले. हिंदूंनाही मदरसा व मक्तबमधून अभ्यासाची सोय करून धार्मिक शिक्षणावरील जोर कमी केला. अपदवीधर स्वामी रामकृष्ण परमहंसाचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान त्यांचे परमशिष्य स्वामी विवेकानंदाने सुसंगत मांडले, हे दुसरे उदाहरण आहे.
बडोद्याचे सयाजीराव गायकवाड (तिसरे) महाराजांना औपचारिक शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मिळाळे नाही तरी उपजत अलौकिक बुद्धिमत्तेमुळे, स्वाध्यायाने ते पट्टीचे राजकारणी, अर्थतज्ज्ञ व सामाजिक व शैक्षणिक सुधारक झाले. त्यांनी भाऊरावांच्या प्रयोगाची स्तुती केली होतीच. महाराजा सयाजीराव हे तिसरे उदाहरण; तर चौथे उदाहरण महात्मा फुल्यांचे आहे. त्यांना महाविद्यालयीन औपचारिक शिक्षण मिळण्याची सोयच १८४० ते १८४८ दरम्यान नव्हती. मुंबई विद्यापीठ १८५७ मध्ये सुरू झाले. नैसर्गिक अलौकिक बुद्धिमत्ता असल्याने ते पट्टीचे समाजसुधारक झाले व सत्यधर्मासारखे तत्त्वज्ञान त्यांनी सामान्य जनांसाठी सांगितले व ग्रंथरूपाने सिद्ध केले, पण चिपळूणकरशास्त्र्यांसारख्या पदवीने विभूषित असलेल्या व्यक्तीने त्यांचा उपहास केला. एवढेच काय, महात्मा गांधींनी मूलोद्योगी शिक्षणाची व्याख्या करताच काही विद्यापीठीय कुलगुरूसह अनेक पुस्तकपंडितांनी त्यांचा उपहास केला. परंतु कालांतराने 'कार्यानुभव' सारख्या नावाने कम्युनिटी स्कूल शिक्षण पद्धतीतून 'मूलद्योगाची' कल्पनाच निराळ्या स्वरूपात आता स्वीकारलेली दिसते. तेव्हा “भाऊरावांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान काय असणार !” असा उपहास करणारे करोत. मी भाऊरावांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा आढावा येथे घेत आहे.
Hits: 120