१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - १
प्रकरण दहावे
१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - १
१) 'तत्त्वज्ञान' शब्द उच्चारताच वाचकांची अशी कल्पना होते की आत्म्याच्या ऐहिक किंवा पारलौकिक जीवनाविषयी सांगितलेली काही तरी धीरगंभीर क्लिष्ट विचारधारा. भाऊरावांनी असले विचार काही सांगितलेले नाहीत. त्यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान म्हणजे शिक्षणाकडे पाहण्याची त्यांची एक जीवनदृष्टी आहे. सर्वसामान्यांना समजेल, पेलवेल अशी व्यवहारी, आचरणात आणण्याजोगी एक शैक्षणिक पद्धती त्यांची आहे. तिचा येथे विचार करावयाचा आहे.
२) शिक्षणामध्येही तात्त्विक व उपयोजित पद्धती असतात. पहिल्या पद्धतीत मूलभूत सिद्धांत मांडण्याचा प्रयास असतो. दुसर्या प्रकारांत कृतींवर भर असतो. भाऊरावांनी आपल्या शिक्षणप्रसाराच्या व सामाजिक उत्थानाच्या चळवळीत कृतीवर जास्त भर दिलेला दिसून येतो. या कृतीतून इतरांना अनुकरणासाठी जे निष्कर्ष निघाले ते भाऊरावांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान होय. सर्वसामान्य सुशिक्षित माणसांची कल्पना असते की, शैक्षणिक तत्त्वज्ञान सांगणारा मनुष्य विद्यापीठाच्या पदव्यांनी युक्त विद्दान असला पाहिजे. विद्यापीठ पदव्यांनी विभूषित 'उच्चभ्रू' लोकांचा हा गैरसमज आहे. असे लोक नाके मुरडून तुच्छतेने म्हणतात, “भाऊराव आणि तत्त्वज्ञान सांगणार!” हा त्यांचा बौद्धिक अहंकार भाऊरावांच्याबाबतीत अप्रस्तुत आहे.
३) सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेला व सभोवतालच्या सामाजिक व्यवहाराचा चिंतन करणारा मनुष्य जीवनाविषयी, मानवी व्यवहाराविषयी
जे विचार करतो ते त्याचे तत्त्वज्ञान होऊ शकते. फरक एवढाच असतो की विद्यापीठीय शिक्षणाच्या अभ्यासातून पदवीधर विद्वान मनुष्य एकाद्या
विषयावर सखोल, सुसंगत व शास्त्रीय पद्धतीने विचार मांडू शकतो, तेव्हा पदवीचा आणि जीवनाविषयी किंवा एखाद्या विषयाविषयी तत्त्वज्ञान सांगण्याचा तसा संबंध कमीच. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाने बुद्धीला विशिष्ट दिशेने अभ्यास करण्याची किंवा संशोधन करण्याची सवय लागते
हे खरे ! अशी सवय हे साधन आहे. तत्त्वज्ञान शोधणे हे साध्य आहे. बुद्धीची देणगी असलेला, पण संशोधनाचे औपचारिक शिक्षण नसलेला मनुष्यही
सुसंगत तत्त्वज्ञान देऊ वा सांगू शकतो. भाऊरावांच्याबाबतीत हे घडले आहे.