१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - ३
१०. भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान - ३
५) हेही लक्षात घेतले पाहिजे, की पुस्तकी औपचारिक शिक्षण म्हणजे सुसंस्कृतपणा नव्हे. डेन्मार्कच्या जनता कॉलेजचे प्रवर्तक डॉ. ग्रंडीग
म्हणतात, “विषयांतील बौद्धिक प्रभुत्वे म्हणजे सुसंस्कृतपणा नव्हे, बुद्धिमान लोक सुसंस्कृत असतीलच असे नाही. मात्र दोहोत विरोध नाही.
कांहींच्या ठिकाणी बुद्धिमत्ता व सुसंस्कृतपणाही एकत्र असू शकेल.” हे डॉ. राधाकृष्णन समितीच्या उच्च शिक्षणावरील अहवालात (१९४८-४९ )
म्हटले आहे. याशिवाय “सर्व संशोधनापैकी काहीसाठी पदव्या किंवा प्रयोगशाळा लागतातच असे नाही. फक्त संशोधकांत जिज्ञासू वृत्ती हवी.
सामाजिक व शैक्षणिक संशोधनाच्या बाबतीत हे प्रामुख्याने खरे आहे.” हे वरील अहवालातील विचार (प. ५६१ - ८३) भाऊरावांना लागू पडतात.
थॉमस रीड नावाच्या लेखकास सामान्य व्यवहारी तत्त्वज्ञानाच्या शाखेचा प्रवर्तक मानले जाते. त्या सामान्य व्यवहारी तत्त्ववेत्त्यांत भाऊरावांची
गणना करावी लागते व त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानास सामान्य व्यवहारी शैक्षणिक तत्त्वज्ञान म्हणावे लागते.
६) प्रा. हुमायून कबीर शिक्षणाचे भारतीय तत्त्वज्ञान या आपल्या ग्रंथात म्हणतात, “शिक्षणाचे तत्त्वज्ञान लोकांच्या तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीशी निगडित पाहिजे आणि त्या आधारेच देशाचे शैक्षणिक धोरण ठरले पाहिजे.” असे दिसून येते की विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत महाराष्ट्रात जी सामाजिक स्थिती होती ती पाहूनच भाऊराव लोकशिक्षणाकडे वळले. या लोकशिक्षणाच्या दिशेने वाटचाल करताना भाऊरावांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानावर पौर्वात्य व पाश्चिमात्य शिक्षणाचा परिणाम निश्चितच झाला. डॉ. रवींद्रनाथ टागोर किंवा महर्षी अरविंद यांच्यासारखी त्यांची समन्वयाची विचारसरणी होती, पण भाऊरावांनी आत्मा, मोक्ष आणि आत्म्याचे परमात्म्याशी मीलन यावर जोर दिला नाही. भाऊरावांनी जनतेच्या ऐहिक गरजा भागवून राजकीय, सामाजिक आणि भौतिक जोखडातून त्यांना मुक्त करण्याकडे लक्ष दिले. त्यातूनही मुलांच्या चारित्र्यसंवर्धनाकडे व सर्वांगीण उन्नतीकडे अधिक लक्ष दिले की जेणेकडून ते समाजाचे आदर्श सेवक होतील. हाच त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. आध्यात्मिक मुक्तीची कल्पना त्यांनी ऐहिक पातळीवर राबविली. त्यामुळे प्राचीन धार्मिक बाबीस त्यांच्या प्रयोगात वाव नव्हता. शिक्षण हे परकोयांच्या गुलामगिरीतून व स्वकीयांच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचे प्रभावी साधन आहे हे सांगत असतानाच पाश्चात्य शिक्षणातील सामाजिक समता, न्याय व संधीची समानता या तत्त्वांची त्यांनी पौर्वात्य आध्यात्मिक मुक्तीच्या कल्पनेशी ऐहिक मुक्तीच्या पातळीवर सांगड घातली.
७) व्यक्तीच्या सर्वांगीण प्रगतीची आशमीय पद्धत त्यांनी वसतिगृहाच्या स्तरावर राबविली. मुलांनी स्वत:च्या प्रगती व उपजीविकेसाठी शेती करणे, जनावरांची निगा राखणे, सरपण फोडणे, शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे, स्वत:साठी झोपड्या बांधणे, स्वतःचा स्वयंपाक करणे व इतर अनुषंगिक आश्रमीय कामे करणे यावर त्यांचा भर असे. दुधगावच्या पहिल्या वसतिगृहास त्यांनी विद्यार्थी आश्रम असेच नाव दिले होते. भाऊराव हायस्कूलच्या मुलांच्या अभ्यासावर तर ही मुले प्राथमिक शाळेतीळ मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवीत. या वसतिगृहातील दिनचर्येमुळे उद्योगप्रियता, आत्मनिर्भरता, साधी राहणी व उच्च विचारसरणी, समाजसेवा व दुसऱ्याच्या दु:खाची कदर करणे, दुसऱ्याच्या श्रमांचा गैरफायदा न उचलणे व श्रमाची महती जपणे या गुणांचा मुलांत परिपोष होई व त्यांची सन्मार्गी राहण्याकडे प्रवृत्ती तयार करण्याचा हेतू असे. हाताने श्रम करण्याची, 'कमवा व शिका' ही योजना ऐहिक उन्नती व मोफत शिक्षणाचा पाया होता.
Hits: 115