९. शिक्षणातील प्रयोग - ६
९. शिक्षणातील प्रयोग - ६
१६) भाऊरावांनी ठरविले को, सातार्यातील एका माध्यमिक शाळेत खेड्यातील मुळे आणण्यापेक्षा माध्यमिक शाळाच खेड्यातील मुळांच्या दारात नेणे रास्त. त्यास कारणे होती दोन. वसतिगृहातून शिकून तयार झालेली सुमारे १५ मुले पदवीधर होऊन संस्थेच्या कामाची जबाबदारी पेलीत असल्याने भाऊरावांना उसंत होती. मॅट्रिक परीक्षा पास झालेल्या वरील मुलांनाही कामास लावणे जरूर होते. सन १९४५ च्या जून महिन्यात तत्कालीन सातारा जिल्ह्यातील (१) कुसूर, (२) उंबज,(३) डांबरखडी (४) सावर्डे (५) खानापूर - माहुली या ठिकाणी पाच माध्यमिक विद्यालये सुरू केली. सयाजीराव विद्यालयातील मॅट्रिक पास झालेल्या मुलांवर त्यांची जबाबदारी सोपविली. यापूर्वीच लोणंद येथील ग्रामस्थांनी आपली माध्यमिक शाळा संस्थेकडे १९४४ मध्ये दिली होती, तर त्याच साली संस्थेचे एक आजीव सभासद रामकृष्ण वेताळ खैरमोडे यांनी अष्टे गावी हायस्कूल सुरू केले होते. जून १९४६ मध्ये रामानंदनगर व भवानीनगर येथे दोन विद्यालये सुरू केली आणि ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षण नेण्याची चळवळ सुरू झाली. या शाळांना जोडून वसतिगृहेही सुरू करण्यात आली आणि शेतकऱ्यांच्या दारात माध्यमिक शिक्षण नेण्यात आले. या शाळा सुरू करताना भाऊराव स्थानिक शेतकर्यांना मुलांच्या “कमवा व शिका” योजनेसाठी जमिनी मागत आणि माळराने मिळत, त्यांची मुलांतर्फे मशागत करून ती पिकाऊ बनविली जात आणि शासनाच्या “अधिक धान्य पिकवा” मोहिमेसही मदत करीत.
१७) या माध्यमिक शाळा सुरू करीत असतानाच महाविद्यालय सुरू करण्याचे भाऊराव योजीत होते. हे स्वप्न भाऊराव १९४० सालापासूनच पाहत होते. या साली १० ऑक्टोबर रोजी मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू श्री. आर. पी. मसानी यांच्या इस्ते सौ. लक्ष्मीबाई पाटील फिरते वाचनालय व ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. दूरदर्शीपणाने भाऊराव कुलगुरूंची सहानुभूती मिळवून होते; पण त्याप्रसंगी महाविद्यालयाची वाच्यता भाऊरावांनी केली नाही.
१८) सन १९४४ साली मराठा मंदिर, मुंबई येथे श्री. भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखालील सभेमध्ये भाऊरावांनी सातारला छत्रपती शिवाजी कॉलेज काढण्याची घोषणा केली होती. त्यासही कारणे होती :
(१) सातारच्या छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस शाखा नं. १ व सयाजीराव हायस्कूलमधून दरसाल सुमारे २५ विद्यार्थी मॅट्रिक पास होणार. त्यांची महाविद्यालयीन शिक्षणाची सोय करणे गरजेचे होते.
(२) परगावी या मुलांना ठेवणे संस्थेस परवडण्यासारखे नव्हते. कारण १९४६-४७ साली सिंधखेरीज मुंबई इलाख्यातील १५ शहरातच बी. ए., बी. एस्सी. ची फक्त २२ महाविद्यालये होती. पैकी ११ मुंबईत व ६ पुण्यात होती.
(३ ) दुसर्या महायुद्धात सामील झालेल्यांच्या पाल्यांसाठी किंवा मुक्त जवानांसाठी कांही जागा राखीव होत्या. त्यामुळे या महाविद्यालयांत गरीबांना प्रवेश मिळणे अवघड होते.
(४) संस्थेचे कांही हितचिंतक व विद्यार्थी भाऊरावांना १९४५ साली ते मुंबईत के. ई. एम. इत्पितळात रक्तदाबाने आजारी असताना भेटावयास गेले. त्यांनी साताऱ्यात गरीब मुलांच्यासाठी शास्त्र महाविद्यालय सुरू करण्यास विनविले. कारण अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणे अतिकठीण झाले होते.
(५) सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसने १९४५ साली मे महिन्याच्या १२ व १३ तारखेस भाऊरावांना १ लाखाची थैली अर्पण करण्याचा ठराव केला व तो महाराष्ट्र विद्यार्थी कॉँग्रेसने मान्य केला.
(६) मुंबईचे खोक्याचे व्यापारी शी. धोंडोजी पाटलोजी भोसले नागज्ञिरीकर (सातारा) भाऊरावांना भेटण्यास के. ई. एम. इस्पितळात गेले होते. भाऊराव शिवाजी महाराजांचे नावे महाविद्यालय काढीत असल्याचे ऐकून आपल्या मुंबईतील घरी त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले. आणि भाऊराव बरे होऊन त्यांच्या घरी गेल्यावर रु. ५,०००/- ची देणगी दिली. त्यांनी एकूण रु. ३०, ०००/- दिले. त्यांच्या अवेळी निधनाने त्यांना रु. ७५,०००/- चे लक्ष्य पुरे करता आले नाही व संस्थेचा विशेषत: शिवाजी महाविद्यालयाचा मोठा आधारस्तंभ उन्मळून पडला.