९. शिक्षणातील प्रयोग - ५

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

९. शिक्षणातील प्रयोग - ५

१३) या हायस्कूलमध्ये शारीरिक श्रमाच्या मोबदल्यात शिक्षणशुल्क माफ करण्याच्या विचाराचे मूळ भाऊरावांच्या खेड्यातील परिसराच्या अभ्यासात सापडते. मात्र डी. ई. सोसायटीने न्यू इंग्लिश स्कूल, पुणेची स्थापना करताना (Facilitating and cheapening of education) शिक्षणाची संधी व स्वस्ताई हे जे ध्येय स्वीकारले होते त्यामुळे ही चालना मिळाली. भाऊरावांना माहीत होते को खेड्यांत पालकांच्या तुटपुंज्या प्राप्तीत भर घालण्यासाठी, शाळेत जाण्यायोग्य मुले, शेळ्या व गुरामागे हिंडतात. शेण्या गोळा करतात, काडीफाटा गोळा करतात. किंवा हलकी सलकी कामे करतात. खेड्यातील मुलांचा हा वेळ वसतिगृहातील शारीरिक श्रमात लावल्यास त्यातून शाळेच्या शिक्षण शुल्काइतकी प्राप्ती खासच होऊ शकते. त्यातून “कमवा व शिका” ही शैक्षणिक कल्पना भाऊरावांनी आपल्या मोफत शिक्षणाच्या प्रकल्पात मध्यवर्ती ठेवली, आणि पालकांची मने मुलांना माध्यमिक शिक्षण देण्याकडे वळविली. अशिक्षित पालक व शैक्षणिक अर्थशास्त्रज्ञही मुलांच्या ठिकाणी विद्यार्थिदशेत असलेली अर्थाजनक्षमता आता मान्य करतात. सन १९६० सालापासून “शैक्षणिक अर्थशास्त्र” ही अर्थशास्त्राची वेगळी शाखा मानतात. (प्रा. टी. डब्ल्यू. शुल्झ , प्रा. डेनिसन, प्रा. गॅलब्रेथ इ.) श्रीमंत पालक मात्र मुलांच्या ठिकाणची ही उत्पादनक्षमता उपयोगात न आणता आपल्या उत्पन्नातील अधिकाचा पैसा मुलांवर भांडवल म्हणून खर्च करतात. मुलांच्या उपयोगात न आणलेल्या उत्पादनक्षमतेस त्यागलेले उत्पादन (forgone income) म्हणतात.

१४) प्राचीन भारतीय आश्रमीय शिक्षण पद्धतीत मुलांच्या ठिकाणची ही उत्पादनक्षमता शिक्षण शुल्क म्हणून उपयोगात आणली जात असे. गुरूच्या आश्रमात राहाणाऱ्या मुलांना शारीरिक श्रम करावे लागत. सांदीपनीच्या आश्रमात श्रीकृष्ण व सुदामा आदी रानातून लाकडे गोळा करून आणीत. आश्रमीय शिक्षण शब्दाचा अर्थच श्रमाकडे नेणारे शिक्षण. भाऊरावांनी मोठ्या व्यावहारिक दृष्टीने या प्राचीन प्रथेचा अर्वाचीन काळातही खेड्यातील परिसराच्या अभ्यासातून शिक्षणात उपयोग केलेला दिसून येतो.

१५) सन १९४५ साली या महाराजा सयाजीराव विद्यालयातून १२ विद्यार्थी मॅट्रिक पास झाले होते. दुसरे महायुद्ध संपण्याचा सुमार होता. या साली सयाजीराव हायस्कूल व सातारच्या शासकीय व इतर हायस्कूल्समधून संस्थेच्या बोर्डिंगचे मॅट्रिक पास होणारे सुमारे २० विद्यार्थी होते, तर २८ विद्यार्थी निरनिराळ्या महाविद्यालयात शिकत होते. महायुद्धाच्या काळात (सन १९४०-१९४५) महागाई चौपटीने वाढली होती. वसतिगृहातील भोजन बील दरमहा २ रुपयांवरून १२ रुपयांवर गेले होते. अशा समयास या वीस मुलांना बाहेरगावी शिकण्यास पाठविणे अवघड होते. रेशनमुळे धान्य खुल्या बाजारात मिळत नव्हते. युद्धामुळे वसतिगृहास मिळणारी (रु. १२०८ ) ग्रॅट बंद झाली होती. मग दुय्यम शिक्षण मोफत कसे करावयाचे ? भाऊरावांपुढे मोठे आव्हान होते. तशात वसतिगृहातील मुले भूमिगत होऊन “चले जाव' चळवळीत सामील होत होती. शासनाची वक्रदृष्टी होण्याचे संकटही उभे होते. अशा परिस्थितीचे आव्हान न स्वीकारतील ते भाऊराव कर्मवीर कसले !

Hits: 96
X

Right Click

No right click