९. शिक्षणातील प्रयोग - ७
९. शिक्षणातील प्रयोग - ७
१९) या पार्श्वभूमीवर ता. ५-११-१९४५ रोजी संस्थेच्या सचिवाकडून हे महाविद्यालय काढण्याची भूमिका एका पत्रकाद्वारे प्रसृत करण्यात आली. त्यातील महत्त्वाचा भाग असा,
“जातीभेद, धर्मभेद, प्रांतभेद, भाषाभेद, संस्कृतिभेद इत्यादी भेदामुळे आमच्या देशाची हानी झाली आहे. यापुढे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करता यावी व समाज एकजिनसी करता यावा म्हणून विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची आवश्यकता आहे. याकरिता संस्थेने सातारा येथे वसतिगृहयुक्त महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविले आहे. या वसतिगुहयुक्त महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे चारित्र्य व शीलसंवर्धन या दोन महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष पुरविता येईल.”
“लोकशाहीच्या न्यायाने व्यक्तिगत विकासाची संधी राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला सारख्या प्रमाणात मिळणे जरूर आहे. सुधारलेल्या राष्ट्रांत सर्व शिक्षण शक्यतो सर्वांना मोफत देण्याची सोय आहे. म्हणूनच आम्ही आपले महाविद्यालय मोफत करण्याचे ठरविले आहे.”
“ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीसारखा जगप्रसिद्ध स्वराज्यसंस्थापक निपजला त्या महाराष्ट्रात वरील तर्हेच्या नवध्येयाने प्रेरित झालेले हे पहिलेच महाविद्यालय निघणार असल्याने सदर महाविद्यालय त्यांच्या स्मरणार्थ काढण्याचे नक्की केले असून त्यास छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा असे नाव देण्याचे योजिले आहे. आमची खात्री आहे व आम्हाला दृढ आशा आहे, की सदर महाविद्यालयामधून त्यागी, ध्येयवादी व कर्तृत्ववान रयतसेवक निर्माण होतील.”
(र. शि. संस्था अहवाल, १९६६-६९, पू. ७०-७१) हे पत्रक खानदेशच्या एका मारवाडी धनिकाच्या पाहण्यात आले. त्यांनी आपले नाव महाविद्यालयास दिल्यास रु. दोन लाख देण्याचे आमिष दाखविले. भाऊरावांनी सांगितले, “एखादे वेळी मी माझ्या बापाचे नाव बदलीन; पण या कॉलेजचे नाव बदलणार नाही.” आणि ही देणगी नाकारण्यात आली.
२०) ह्या महाविद्यालयात शिक्षण शुल्क आकारले जाणार नव्हते. स्वावलंबन व आत्मनिर्भरतेची अम्मलबजावणी “कमवा व शिका" या तत्त्वानुसार केली जाणार होती. भाऊरावांना महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुले आपल्या भोजनखर्चासाठी पालकावर भारभूत होऊ नयेत असे वाटे. या मुलांनी दररोज चार ते दोन तास शारीरिक श्रम करून हा खर्च परस्पर मिळवावा ही त्यांची भावना होती. या महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांस कारकुनांच्या तांड्यात सामील न होता, बेकार न रहाता स्वत:च्या हिम्मतीवर कष्ट करून स्वतःस व कुटुंबास पोसणारा निघेल असे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार होता.
२१) छत्रपती शाहू बोर्डिग हाऊस व महाराजा सयाजीराव विद्यालयात स्वावलंबन, श्रममाहात्म्य व जातपात, धर्मभेदविरहित शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने तो महाविद्यालयीन स्तरावर अंमलात आणणे ओघानेच आले आणि तो वयस्कर असलेल्या विद्यार्थ्यांकडून. उदारमतवादी, उच्च शिक्षण व शारीरिक श्रम एकत्र राहू शकत नाहीत, हा त्यांच्या मनातील न्यूनगंड काढून टाकण्याचा प्रमुख हेतू होता.
२२) ग्रीक व रोमन संस्कृतीतून इंग्लंडमध्ये, उच्चभ्रू सरदार-दरकदारांसाठी उदारमतवादी शिक्षण व कनिष्ठ मोलमजुरी करणार्या कामगारांसाठी हाताने करण्याचे श्रमयुक्त शिक्षण देण्याची प्रथा १४ते १६ व्या शतकात आली आणि तीच प्रथा इंग्रजांनी हिंदुस्थान काबीज केल्यावर भारतात सुरू केली. आणि भारतातील श्रमावर आधारलेली प्राचीन शिक्षण पद्धती' बंद झाली. भाऊरावांनी आपल्या संस्थेत तिचे पुनरुज्जीवन केले 'अँबट आणि वुड' आयोगाने (१९३७) पहिल्याने श्रमाचे माहात्म्य पटविण्याचा प्रयास आधुनिक काळात केला.
२३) योजिल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाविद्यालय जून १९४६ मध्ये सुरू होऊ शकले नाही. कारण दुसर्या युद्धोत्तर काळात शास्त्रीय साहित्य व प्रयोगशाळा साहित्य मिळू शकत नव्हते. म्हणून १९ ४७ साली जून महिन्यात शास्त्र महाविद्यालयाऐवजी कला महाविद्यालय सुरू करण्यात आले. ५० वर्षांपूर्वी सातार््यासारख्या अर्धग्रामीण शहरात महाविद्यालय काढणे म्हणजे कपिलाषष्ठीचा योग होता. तरी देखील मूळ योजनेत पुढील चार वर्षांत अनेक बदल करावे लागले. त्यास काही कारणे होती : पहिले कारण म्हणजे, या मोफत शिक्षणाच्या प्रयोगास तत्कालीन शिक्षण खात्याकडून एक पैसाही मदत मिळत नव्हती. हे महाविद्यालय सुरुवातीस लहान असले तरी सन १९५१ पर्यंतर शि. संस्थेने सुमारे दोन लाख रुपये त्यावर खर्च केले होते. हा प्रयोग पांढर्या हत्तीच्या स्वरूपाचा संस्थेस न परवडणारा ठरू लागला. संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाने सदर महाविद्यालय इतर महाविद्यालयाप्रमाणे शिक्षण शुल्क घेऊन चालवावे असे ठरविले. भाऊरावांची त्यास सम्मती नव्हती. म्हणून 'कमवा व शिका योजना' वसतिगृहात राहाणार््यांनाच लागू करण्याचे ठरले.
Hits: 94