७. अक्रोडाची फळे - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

७. अक्रोडाची फळे - ३

८) सन १९२४ साली सप्टेंबरमध्ये दिल्लीत हिंदू-मुस्लिम दंगे झाले. त्यांच्या निषेधार्थ म. गांधींनी २१ दिवसांचे उपोषण केले. त्या सप्टेंबर महिन्यात भाऊरावांनी रावबहादूर कूपरशी संबंध तोडले आणि घोर प्रतिज्ञा केली को, “माझे वसतिगृह छ. शाहू महाजारांचे नावे काढीन आणि त्या वसतिगृहात माझ्या दाढीतील केसाइतकी मुले होईपर्यंत दाढी काढणार नाही व पायात वहाणाही घालणार नाही.” कूपरला व तेथे हजर असणाऱ्यांना भाऊरावांची ही प्रतिज्ञा वेड्याचे स्वप्नरंजन वाटले असेल. 'सत्य संकल्पाचा दाता” परमेश्वर असतो ! पण हेही खरे की, भाऊरावांची ही प्रतिज्ञा म्हणजे त्यांच्या स्वत:च्या कर्तृत्वशक्‍तीस आव्हान व रयतेच्या दातृत्वशक्तीवर असलेल्या विश्‍वासाचे प्रतीक होते. त्यांच्या वाचेमागून कार्याचा अर्थ धावत होता. जणू भाऊरावांना नियती सांगत होती, “अरे वेड्या, तुझा संकल्प खरा आहे, स्तुत्य आहे, तेव्हा वाढव ना तुझे कार्यकर्ते तूच !”

९) मागील प्रकरणात शिक्षणशास्त्र्यापुढील द्विविध आव्हानांचे स्वरूप मी सांगितले आहेच. त्यातल्या दुसऱ्या आव्हानास सामोरे जाण्यास सन १९२४ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर भाऊरावांनी सुरुवात केली. भाऊरावांनी आपल्या र. शि. संस्थेच्या स्थापनेस हाच मुहूर्त निवडला होता. साताऱ्यास आल्यावर आपल्या घरातच चार मुलांना घेऊन हे वसतिगृह सुरू केले. दोघे मानेबंधू-नाना व तुकाराम मराठा होते. शंकर संभाजी कांबळे -महार; तर स्वत:चा भाऊ बंडेंद्र जैन होता. या चार मुलांसह हे सातारचे वसतिगृह सुरू झाले. या चौघांना आपल्या घरीच भाऊराव जेवू घालीत असत. त्यांची नावे सातारच्या शासकीय माध्यमिक शाळेत घातली. जून १९२५ साली काल्याचे वसतिगृह अडचणीमुळे बंद करून तेथील मुलांना साताऱ्यास येण्यास सांगितले. एकूण १३ मुळे जून १९२५ मध्ये आली. त्यात नेर्ळे व दुधगावचीही मुठे आली. या सर्वांची निवासव्यवस्था भाड्याच्या इमारतीत व जेवणाची व्यवस्था खानावळीत करण्यात आली.

१०) जून १९२६ साली या वसतिगृहात मुळे झाली चौतीस. भाड्याच्या इमारतीपैकी एक होती अंबुबाई मुद्रावळ्यांची. पुढे शाहू बोर्डिंग हाऊससाठी ती विकत घेण्यात आली व त्या इमारतीपुढील बखळीत बांधकाम करून सुमारे १५ ते २० मुले राहण्याची सोय करण्यात आली. सुरुवातीस खानावळवाले पंगतीप्रपंच करीत. अस्पृश्यांना खानावळीच्या बाहेर मोकळ्या जागेत जेवावयास वाढीत. भाऊरावांना ते पसंत नसल्याने त्यांनी प्रेस नावाने ओळखल्या जाणार्‍या इमारतीत जून १९२७ पासूनच दोन स्वयंपाकी बाया नेमून सर्व मुलांची एकत्र जेवण्याची सोय केली. तेथेच वसतिगृहाचे कार्यालयही थाटले. स्पृश्यास्पृश्यतेच्या चक्रातून जेथे विद्याविभूषित ब्राह्मण बाहेर पडू शकत नव्हते, तेथे या अडाणी खानावळवाल्यांना दोष देण्यापेक्षा व्यवहारी भाऊरावांनी वरीलप्रमाणे व्यवस्था केली. मुलेच पाळीपाळीने सर्व मुलांच्या पंगतीस जेवण वाढीत.

काही मुलांना स्वयंपाक करण्यातही तरबेज करण्यात आले. त्यातूनच पुढे वसतिगृहाची 'क्लब' पद्धती सुरू झाली. त्याची माहिती पुढे येईलच.

Hits: 95
X

Right Click

No right click