२. जन्म, बाळपण, परंपरा व संस्कार - २
शिकावयास घातले. याच साली महात्मा फुल्यांनी पुण्यात शैक्षणिक व
सामाजिक सुधारणेसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. योगायोग
आहे. या पायगौंडाच्या पोटी जन्मास आलेल्या भाऊरावांनी महात्मा
फुल्यांच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणेचा वारसा अत्यंत प्रभावीपणे पुढे
चालविला.
४) पायगौंडा पाटील वयाच्या एकविसाव्या वर्षी मुलकी (सातवी)
परीक्षा पास झाले. सुदैवाने तत्कालीन इंग्रजी राज्याच्या महसूल खात्यात
कारकून म्हणून कामास लागले. ऐतवडे बुद्रुक गावच्या चतुर्थ जैन शेतकरी
समाजातून मुलकी परीक्षा पास होणारे ते पहिले गृहस्थ होते. या नोकरीतून
सन १९१४ साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती पत्करली. त्यासही कारण घडले ते
त्यांच्या निर्लाभी व स्वाभिमानी स्वभावाचे द्योतक आहे. वयोमानाप्रमाणे
पायगौंडा पाटलांना किंचित कमी ऐकू येऊ लागले होते. कोरेगावी
असताना त्यांचे अधिकारी होते काळे नावाचे मामलेदार. एके दिवशी
मामलेदारांनी काही कागद मागितले. पायगौंडा पाटलांना ते नीट ऐकू गेले
नाही. तेव्हा मामलेदार चिडून पायगोंडांना म्हणाठे, “पायगौंडा पाटील,
तुम्हांस कमी ऐकू येते. तुम्ही अनफीट आहात. तात्काळ निवृत्त व्हा!”
पायगौंडा पाटील अतिशय कामसू, प्रामाणिक व पक्क्या इराद्याचे गृहस्थ
होते. त्यांनी लगेच सेवानिवृत्तीचा अर्ज दिला. काळे मामलेदर चकित झाले.
पायगौंडा पाटलांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून त्यांनी प्रयत्न केळे. पण व्यर्थ !.
निवृत्तीनंतर काही काळ पायगौंडा पाटील कोरेगावलाच थांबले. नव्हे
कोल्हापुरातील डांबर प्रकरणामुळे त्यांना थांबावे लागले.
५) श्रमण परंपरेतील जनसेवेत रत असलेल्या जैन घराण्यात
पायगौंडाचा जन्म झाठेला. जैन समाजातील मुलकी परीक्षा पास झालेले ते
पहिले तरुण, त्यातून सरकारी नोकरीत. कुंभोजच्या जिनगौंडा पाटलास
गंगाबाई नावाची एकुलती एक सुंदर, शरीराने दणकट व धाडसी अशी
मुलगी होती. तिच्यासाठी वर म्हणून या पायगौंडा पाटलांस पसंत करण्यात
आले. यथाकाल लग्न झाल्यानंतर सौ. गंगाबाईंच्या पोटी २२ सप्टेंबर
१८८७ रोजी भाऊरावांचा जन्म झाला. वयाच्या आठ वर्षापर्यंतचे भाऊरावांचे बालपण कुंभोजलाच आजोळी गेले. त्यास मुख्य कारण दिसते
ते हे की, पिलिवच्या घाटात रोड कारकून म्हणून पायगौंडा पाटलांना काम
करीत असताना झोपडीत राहावे लागे. भाऊराव या बालकास झोपडीत
सुरक्षितता नसे. रात्रीच्या वेळी लांडगे व कोल्हे या रानटी जनावरांचा
झोपडीभोवती उपद्रव होत असे. सौ. गंगाबाई अतिशय धीट व धाडसी असल्याने या रानटी जनावरांना त्या हुसकून लावीत. बाल भाऊरावाच्या
सुरक्षिततेच्या दृष्टीने आजोळीच त्यास ठेवणे सौ. गंगाबाईने पसंत केलेले
दिसते. या बालवयात भाऊरावावर आजोळी काही अति महत्त्वाचे संस्कार
झाले ते असे :
६) भाऊराव आजोळी अति लाडका असल्याने त्याच्या
खेळण्याहुंदडण्यास प्रतिबंध नसे. वयाच्या आठव्या वर्षी भाऊरावास
दहीवडीच्या मराठी शाळा नं. १ मध्ये बिगरीत दाखल केल्याचे दिसते. कारण
ता. १०-२-१८९६ रोजी भाऊराव पहिलीत गेल्याचे या शाळेच्या दप्तरी
नोंद आढळते. पुढील शिक्षणासाठी भाऊरावास आपल्या वडिलांच्या
बदलीबरोबर विटे, कराड, इस्लामपूर इत्यादी तालुक्यांच्या गावी हिंडावे
लागले. लाडावलेला असल्याने त्याच्या अभ्यासावर फारसे लक्ष दिलेले
दिसत नाही. भाऊरावाचे लक्ष अभ्यासापेक्षा खेळण्यात व हुंदडण्यात
अधिक होते. सुट्टीत आजोळी आल्यावर भाऊराव मित्रांना जमवून नदीत
पोहण्यास किंवा जवळच्या बाहुबलीच्या डोंगरावर भटकण्यास जात असे.
नदीतील सुसरीची किंवा डोंगरावरील जनावरांची त्यास भीती नसे. वयाच्या
मानाने भाऊराव अंगापेराने इतर मुलांपेक्षा मोठा व दणकट दिसत
असल्याने मुलांचा तो नैसर्गिक म्होरक्या असे. भाऊरावाचे चौघे मामा -
अण्णा, अप्पा, बाळगोंडा व पारिसा ऊर्फ पार्श्वगोंडा व आजोबा जिनगोंडा
धीट, धाडसी व बंडखोर होते. विशेषत: चौगुल्यांचा मुजोरपणा त्यांना खपत
नसे. या मामांच्या शेतावर एक सत्याप्पा भोसे आश्रयास येत असे. त्या
सत्याप्पाने या चौगुल्यास कुऱ्हाडीने तोडले व फरारी झाला. कारण घडले
को, एका गरोदर महार स्त्रीने चौगुल्याच्या कुंपणाच्या चार काटक्या घेतल्या.
' या चौगुल्याने या गरोदर स्त्रीस बेदम मार दिला. सत्याप्पास ते सहन झाले नाही. गोरगरीबांचा कैवारी, अस्पृश्य समाजाचा सहाय्यकर्ता अशी त्याची
ख्याती होती. फरारी असताना हा वारणेचा वाघ भाऊरावाच्या मामांच्या
आश्रयास रात्री शेतावर येत असे. सत्याप्पा आपल्या पराक्रमाच्या व
धाडसाच्या गोष्टी बाळ भाऊरावास सांगत असे. नकळत भाऊरावावर
सत्याप्पाच्या धाडसाचे, गोरगरीबांविषयी त्यास असलेल्या सहानुभूतीचे व
विशेषत: अस्पृश्य लोकांवरील श्रीमंताच्या अन्यायाची त्यास असलेल्या
चिडीचा भाऊरावावर परिणाम होई. मूळात भाऊरावाच्या ठिकाणी
असलेल्या निर्भय वृत्तीस व धाडसास खतपाणी मिळत गेले. मामांच्या
ठिकाणी असलेली बंडखोर वृत्ती व सत्याप्पा भोसलेची गरीबांविषयीची
कणव बालवयातच भाऊरावात झिरपत होती.
७) मोठेपणी भाऊराव स्वत:विषयी म्हणत, “माझ्या मानसिक घडणीस, लौकिकास व यशास माझ्या पूर्वजांकडून मिळालेल्या दोन गुणांचा वारसा कारणीभूत आहे. ते गुण म्हणजे संन्यस्त निरिच्छ वृत्ती व बंडखोरपणा.” आपल्या विद्यार्थ्यांना ते म्हणत, “डोळ्यादेखत अन्याय दिसत असताना त्यास अन्याय म्हणत नाही व त्याचा प्रतिकार करीत नाही
तो माझा विद्यार्थी नव्हे.” हे मात्र खरे, की त्यांचे सारे जीवन या दोन गुणांचा आविष्कार आहे. या गुणांत भर पडली ती त्यांच्या अव्यभिचारी_ ध्येयनिष्ठेची. त्यासाठी केढाही मोठा त्याग करण्याची त्यांच्या मनाची तयारी होती. भाऊरावांच्या संन्यस्त वृत्तीस झालर आहे ती प्रेमाची, स्वार्थत्यागाची, हिशेबीपणाची, साधेपणाची आणि दीनदलिताविषयी करुणेची.
८) त्यांचा संन्यस्त निरिच्छपणा स्वत:च्या आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा स्वत:च्या पारलौकिक सुखासाठी नव्हता. त्यांचा निरिच्छ स्वार्थत्याग समाजाच्या कल्याणासाठी होता. मूळ जैन धर्मांत असलेल्या सत्य आणि अहिंसेची जाण त्यांच्या घराण्यातील आचार्य परंपरेतून त्यांच्या ठिकाणी आली होती. साधेपणाचे, करुणेचा व चतुर्विध दानाचा उगमही तेथेच आहे.
| ९) जैन समाज अतिशय कर्मठ, अस्पृश्यांच्या संसर्गातून शिवाशिव किंवा विटाळाच्या रूढी पाळणारा. खुद्द मातोश्री सौ. गंगाबाई सोवळेओवळे पाळीत. बालवयात कुंभोजला शेतीवर काम करणाऱ्या महारांच्या मुलांना खेळण्यास घेण्यास भाऊरावांना संकोच वाटत नसे. कारण अस्पृश्यांना शिवलेल्या सत्याप्पा भोसलेचा मामांना विटाळ वाटत नसे. प्रौढ वयात याची जाण भाऊरावांना असल्याने सन १९०८ साली इस्लामपुरात धुवनाथ धोलप या मराठी शाळेतील महार विद्यार्थ्यास
शिक्षकाने वर्गाचे बाहेर बसून अभ्यास करण्यास लावलेले पाहून भाऊरावाने त्या शिक्षकाची हजेरी घेतली. या मुलास कोल्हापूरला मिस
क्लार्क या अस्पृश्यासाठी नव्याने सुरू केलेल्या वसतिगृहात नेण्याचे ठरविले. कोल्हापूरला जाण्यापूर्वी या घोळपास भाऊरावांनी आपल्यासोबत
स्वयंपाकघरात जेवणास बसविले. जेवणानंतर हा महाराचा मुलगा होता हे गंगाबाईस कळल्यानंतर, त्यांनी भाऊरावास स्वयंपाकघर विटाळल्याबद्दल
लोखंडी फुंकणीने मार दिला. भाऊरावांनी आईच्या फुंकणीचा मार खाल्ला;
पण आपले अस्पृश्योद्धाराचे व्रत सोडले नाही. उलट आपल्या वर्तनाने यथाकाली मातोश्री गंगाबाई, पत्नी सौ. लक्ष्मीबाई व सारे जवळचे आप्तेष्ट,
नातेवाईक व मित्रमंडळी यांना अस्पृश्यांच्या स्पर्शाचा विटाळ मानण्याच्या
भावनेपासून व रूढीपासून मुक्त केले. भाऊरावांनी मुलींसाठी स्वत:ची
. वसतिगृहे सुरू केल्यानंतर तर मातोश्री गंगाबाई अस्पृश्य मुलींच्या
सान्निध्यात राहण्यास, त्यांच्या हातचे जेवण घेण्यास विटाळ मानीत नसत.
त्यास भाऊरावांवरील कोल्हापुरातले व आजोळचे संस्कार कारणीभूत होते.