सामाजिक स्थिती - ३
९) लोकहितवादी गोपाळराव देशमुख, न्यायमूर्ती रानडे, प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर आदी सुधारक दिवंगत झाल्यानंतर नामदार गो. कृ. गोखले, नामदार फेरोजशहा मेहता यांच्या हाती राष्ट्रीय सभा आल्यानंतर काही काळ सनदशीर राजकारण व समाजकारण चालले. सुरत कॉंग्रेसनंतर लोकमान्य टिळक आदी जहालांच्या हाती राष्ट्रीय सभेची सूत्रे गेल्यानंतर सामाजिक परिषदा भरविण्याचे थांबले. तत्पूर्वी सन १८९० साली महात्मा फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे काम थांबले. १८९५ ते १८९७ मधील पुण्यातील प्लेगही त्यास कारणीभूत आहे. सत्यशोधक समाज अनुयायांना एकत्र बांधून ठेवणारा प्रभावी नेताच महात्मा फुल्यानंतर नव्हता.
१०) दक्षिणेतील, विशेषत: महाराष्ट्रातील संस्थानी जनताच नव्हे
तर संस्थानिकही त्यांच्या संस्थानातील सनातनी ब्राह्मण व पुरोहितवर्गाच्या
वर्चस्वापुढे हतबल होते. त्यातूनच सन १८९९ च्या सुमारास कोल्हापूर
संस्थानात वेदोक्त प्रकरण उपस्थित झाले. संस्थानातील राजोपाध्यांनी व
त्यांच्या नोकर पुरोहिताने छत्रपती शाहू महाराजांना पंचगंगा नदीवर स्नान
करताना शूद्र संबोधून वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला. राजघराण्यातील
देवदेवतांच्या पूजाविधी वेदोक्त पद्धतीने करण्याचे राजोपाध्यांनी नाकारिले.
राजोपाध्ये हे महाराजांचे खाजगी नोकर. त्यांचा उद्धटपणा महाराजांना
झोंबला, आणि कोल्हापूर संस्थानात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादास सुरुवात
झाली. त्यानंतर १९०२ साली शाहू महाराजांनी संस्थानी नोकऱ्यांत
मागासलेल्या संस्थानी लोकांसाठी ५०% जागा राखीव ठेवल्याचे फर्मान
इंग्लंडमधूनच काढले. त्यामुळे पुरोहितासह ब्राह्मणमंडळी व ब्राह्मणी वृत्तपत्र
छत्रपती शाहू महाराजांवर कठोर टीका करू लागली. बडोद्यातही यापूर्वी
वेदोक्त प्रकरण झाले होते; पण सयाजीराव महाराजांनी त्यास फार महत्त्व
दिले नाही. शाहू महाराजांनी राजोपाध्यास स्वतःची चूक सुधारण्याची संधी
देऊनही ते ताठ राहिल्यावर शाहू महाराजांनी राजोपाध्ये या वृत्तीसाठी
दिलेल्या जमिनी जप्त केल्या.