सामाजिक स्थिती - २
६) ख्रिश्चन मिशनऱर्यांच्या शाळेत शिक्षण घेऊन शुद्र, अतिशूद्र,अस्पृश्य आदी ग्रामीण व शहरी जनतेत शिक्षणाचा प्रसार करण्याचे महात्मा जोतीराव फुल्यांनी १८४८ साली ठरविले. शिक्षणाबरोबरच इतर सुधारणा करण्याचे योजिले. याच साली ब्राह्मण मित्राच्या लग्नात सनातनी ब्राह्मणांनी त्यांचा शूद्र म्हणून अपमान केल्याने साऱ्या हिंदू धर्मग्रंथांच्या अभ्यासाकडे त्यांचे लक्ष वळले. ब्राह्मणांखेरीज इतरांना आपल्या गुलामगिरीत ठेवण्यासाठी या धर्मग्रंथांची रचना आहे, हे त्यांच्या लक्षात आल्यावर शुद्र व अतिशूद्रांत शिक्षणप्रसार व ब्राह्मणासह सर्वात सामाजिक सुधारणा यासाठी म. फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली. व सनातनी कर्मठ ब्राह्मण पुरोहितवर्गाच्या ब्राह्मण्याविरुद्ध लढ्याचे रणशिंग फुंकले आणि अर्वाचीन काळातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादास सुरुवात झाली. ७) बहुजनसमाजातील भेदाभेद, शिवाशिव अमंगळ आहे हे दाखवून त्यांच्यात एको घडविण्याचा म. फुल्यांनी प्रयत्न केला. ब्राह्मयांतील केशवपन चाल, भ्रूणहत्या याविरुद्ध बंड करून ब्राह्मणांकडूनच स्वत:च्या स्त्रियांवर होणार्या अत्याचाराची जाणीव त्यांना करून दिली. शिक्षणासह विविधांगी सामाजिक सुधारणांचा पाया घातला. सनातनी पुरोहितवर्गामुळे समाज दुभंगतो म्हणून त्यांच्यावर महात्मा फुल्यांचा विशेष राग होता. ८) सन १८८५ साली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, ती उच्चवर्णीयांच्या अडचणी सोडवून घेण्यासाठी होती. सुशिक्षित उच्चवर्णीय लोकांच्या मोजक्या प्रतिनिधींची ती संघटना होती, असे सी. वाय. चिंतामणीनी (“इंडियन पॉलिटिक्स सिन्स दि म्युटिनी) बंडानंतरचे राजकारण (१९३७) या ग्रंथात (प. ४-५, १७, ४३) म्हटले आहे. तिचा हेतू सनदशीररीत्या इंग्रज शासनात उच्चवर्णीय सुशिक्षितांना स्थान मिळविणे व शेवटी भारतात ब्रिटिश साम्नाज्यांतर्गत वसाहतीचे स्वातंत्र्य मिळविणे हा होता. या सभेस जोडून न्यायमूर्ती रानडे आदींनी सामाजिक परिषद भरविण्यास सुरुवात केली होती. पुढारलेल्या वर्गातच सामाजिक सुधारणा करण्याचा तिचा मर्यादित हेतू होता.
Hits: 95