गीतारहस्य - प्रस्तावना - लोकमान्य टिळक - ५
प्राचीन टीकाकारांनी प्रतिपादिलेले गीतेचें तात्पर्य आणि आमच्या मंताप्रमाणे गीतेचे रहस्य यांत भेद कां पडतो याची कारणे गीतारहस्यांत सविस्तर सांगितली आहेत. परंतु गीता-तात्पर्यासंबंधाने जरी याप्रमाणे मतभेद असला तरी गीतेवर जीं अनेक भाष्ये व टीका आहेत, किंवा पूर्वी अगर अलीकडे गीतेची प्राकृतांत जी भाषांतरे झाली आहेत त्यांचे प्रस्तुत ग्रंथ लिहितांना इतर बाबतीत नेहमीच प्रसंगानुसार थोडेबहुत सहाय्य झालेले असल्यामुळे त्या सर्वांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत, हें येथे सांगणे अवश्य आहे. आणि तसेंच ज्या पाश्चिमात्य पंडितांच्या ग्रंथांतील सिद्धान्तांचा जागोजाग उल्लेख केलेला आहे. त्यांचेहि आभार मानिले पाहिजेत, किंबहुना या सर्वे ग्रंथांच्या मदतीखेरीज प्रस्तुतचा ग्रंथ लिहितां आला असता की नाही याची वानवाच असल्याने या प्रस्तावनेच्या आरंभी संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे हे तुकारामबुवांचें वाक्य आम्ही घातले आहे. सर्व कालीं एकसारखेच लागूं पडणारे म्हणजे त्रिकालाबाधित ज्ञान सांगणाऱ्या गीतेसारख्या ग्रंथाने कालभेदानुरूप नवें नवें स्फुरण मनुष्याला प्राप्त व्हावें यांत कांही नवल नाही; कारण अशा व्यापक ग्रंथाचा हा धर्मच असतो. परंतु तेवढ्यानें प्राचीन पंडितांनी असल्या ग्रंथांवर जे परिश्रम केलेले असतात ते व्यर्थ होत नाहींत.
गीतेची इंग्रजी, जर्मन वगैरे भाषांतून पाश्चात्य पंडितांनी जी भाषान्तरे केली आहेत त्यासहि हाच न्याय लागू पडतो. ही भाषांतरे प्रायः गीतेच्या प्राचीन टीकाकारांस अनुसरून केलेली असतात. तथापि कांहीं पाश्चिमात्य पंडितांनी गीतेचा स्वतंत्ररीत्या अर्थ लावण्याचीहि खटपट सुरू केली आहे. पण खऱ्या (कर्म--) योगाचे तत्त्व अथवा वैदिक धार्मिक संप्रदायाचा इतिहास नीट लक्षांत न आल्यामुळें, अथवा बहिरंग- परीक्षणाकडेच त्यांचा विशेष कल असल्यामुळें, किंवा दुसऱ्या अशाच कारणांनी, पाश्चात्य पंडितांची ही विवेचने पुष्फळ अपुरी व कांहीं काही स्थळी तर नि:संशय भ्रामक व चुकीची आहेत. गीतेवरील पाश्नात्य पंडितांच्या या ग्रंथांचा येथे सविस्तर विचार रिंबा परीक्षा करण्याचें कारण नाही. त्य़ांनी उपस्थित केलेल्या प्रमुख प्रश्नांसंबंधी आमचे काय म्हणणे आहे ते या पंथाच्या परिशिष्ट प्रकरणांत दिले आहे. तथापि अलीकडे आमच्या पहाण्यांत आलेल्या गीतेवरील कांही इंग्रजी लेखांचा उल्लेख येथे केला पाहिजे.
पहिला लेख मि, ब्रुक्स यांचा होय. मि. ब्रुक्स हे थिआसफिस्ट पंथाचे असून भगवद्गीता कर्मयोगपर आहे असे त्यांनी आपल्या गीतेवरील ग्रंथांत निरूपण केलें आहे व आपल्या' व्याख्यानांतूनहि हेच मत ते प्रतिपादन करीत असतात. दुसरा लेख मद्रासचे मि. एस् राधाकृष्णम् यांचा असून तो छोट्याशा निबंधरूपानें अमेरिकेतल्या 'सर्वराष्ट्रीय नीतिशास्त्रावरील त्रैमासिकांत प्रसिद्ध झाला आहे (जुलै १९११). यांत आत्मस्वातंत्र्य ब नीति-धर्म या दोन विषयांसंबंधाने गीता ब कान्ट यांचें साम्य दाखविले आहे. आमच्या मतें हें साम्य याहूनहि अधिक व्यापक असून, ग्रीन यांची नैतिक उंपपत्ति कान्टपेक्षांहि गीतेशीं आधिक जुळती आहे. पण या दोन्ही प्रश्नांचा खुलासा या गीतारहस्य अथवा कर्मयोग ग्रंथांत केलेला असल्यामुळे त्यांची येथें पुनरक्ति करीत नाही. तसेच पंडित सीतानाथ तत्त्वभूषण यांचा 'कृष्ण आणि गीता' या नावाचा एक इंग्रजी ग्रंथहि अलीकडे प्रसिद्ध झाला असून त्यांत सदर पंडितांनीं गीतेवर दिलेलीं बारा व्याख्याने छापली आहेत. पण या अगर मि. ब्रुक्स यांच्या व आमच्या प्रतिपादनांत पुष्कळ अंतर आहे हें सदर ग्रंथ वाचले असतां कोणाच्याहि लक्षात येईल. तथापि वरील लेखांवरून गीतेसंबंधाने आमचे विचार अपूर्व नसून गीतेतील कर्मयोगाकडे लोकांचें अधिक्राधिक लक्ष लागत चालल्याचे हें सुचिन्ह असल्यामुळें आम्ही या सर्व आधुनिक लेखकांचे येथें अभिनंदन करितों,
Hits: 147