गीतारहस्य - प्रस्तावना - लोकमान्य टिळक - ६

Parent Category: मराठी पुस्तके Category: गीतारहस्य Written by सौ. शुभांगी रानडे

हा ग्रंथ मंडालेस लिहून झाला खरा; फ्ण तो शिसपेन्सिलीनें लिहिलेला असून त्यांत बऱ्याच ठिकाणीं खोडाखोड केलेली व शोध घातलेले होते. म्हणून पुढे तो सरकारांत जाऊन परत आल्यावर त्याची छापण्यासाठी शुद्ध नक्कल करणें जरूर होते; आणि हें काम आमच्यावर पडले असते तर ग्रंथ प्रसिद्ध होण्यास आणखी किती महिने लागले असते कोणास ठाऊक! पण रा. रा. वामन गोपाळ जोशी, नारायण कृष्ण गोगटे, रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर, रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर, अप्पाजी विष्णु कुळकर्णी वगैरे गृहस्थांनी या कामी हौसेने मदत करून तें जलदीने पुरं केले याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. तसेंच रा. रा. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनीं, आणि विशेषेकरून वेदशास्त्रसंपन्न दीक्षित काशीनाथशास्त्री लेले यांनी,हे मुद्दाम मुंबईहून येथें येऊन, ग्रंथाची लेखी प्रत वाचण्याची तसदी घेतली आणि बऱ्याच उपयुक्त व मार्मिक सूचना केल्या याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहो.

तथापि ग्रंथांतील मतांबद्दलची जबाबदारी सर्वस्वी आमची आहे हें विसरता कामा नये, ग्रंथ याप्रमाणे छापण्यास तयार झाला. पण लढाईसुळें कागदाची उणीव पडणार होती. ती मुंबईतील स्वदेशी कागदाच्या गिरणीचे मालक मेसर्स डी. पदमजी आणि सन यांनीं वेळेवर आमच्या मताप्रमाणे चांगला कागद पुराविल्यामुळे दूर झाली, व गीतेचा ग्रंथ चांगल्या स्वदेशी कागदावर छापावयास मिळाला. तथापि ग्रंथ छापतांना तो अजमासाबाहेर वाढल्यामुळे पुनः कागदाची उणीव पडली; ब ती पुण्यांतील रे पेपर मिलच्या मालकांनी भरून काढिली नसती तर आणखी कांही महिने ग्रंथ प्रसिद्ध होण्याची वाचकांस वाट पहावी लागली असती. म्हणून वरील दोन्ही गिरण्यांचे मालक यांचे आम्हीच नव्हे तर वाचकांनीहि आभार मानिले पाहिजेत. शेवटीं प्रुके तपासण्याचे काम राहिलें. हे रा. रा. रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर, रा. रा. रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर आणि रा. रा. हरि रघुनाथ भागवत यांनी पत्करिलें, त्यांतहि जागोजाग आलेले इतर ग्रंथांचे उल्लेख बरोबर आहेत की नाहीत हें तपासण्याचे व कोठें काही व्यंग राहिले असल्यास तें दाखविण्याचे काम रा. रा. हरि रघुनाथ भागवत यांनी एकट्यांनीच केलेले आहे. अर्थात् याच्या मदतीखेरीज हा ग्रंथ इतक्या लवकर केवळ आमच्या हातूनच प्रसिद्ध होणें शक्य नव्हते. म्हणून या सर्वांचे मनःपूर्वक येथें आभार मानिले पाहिजेत. सरतेशेवटी चित्रशाळा छापखान्याचे मालक यांनी हें काम काळजीने व शक्य तेवढें लवकर छापून देण्याचें पत्करून त्याप्रमाणें तडीस नेल्याबद्दल त्यांचेहि आभार मानणे जरूर आहे. शेतांत पीक आलें तरी त्याचे अन्न तयार होऊन खाणाराच्या मुखांत पडेपर्यंत अनेक लोकांच्या साहाय्याची जशी अपेक्षा लागत्ये तद्वतच कांही अंशी ग्रंथकाराची---निदानपक्षी आमची तरी---स्थिति आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं. म्हणून वरील प्रकारें आम्हांस साहाय्य करणाऱ्या सवे लोकांचे--त्यांचीं नांवें वर आलेली असोत वा नसोत--आम्ही पुनः एकवार आभार मानून ही प्रस्तावना संपवितों.

प्रस्तावना संपली. आतां ज्या विषयाच्या विचारांत आज पुष्कळ वर्षे घालविली व ज्याच्या नित्य सहवासाने व चिंतनाने मनाचे समाधान होऊन आनंद होत गेला, तो विषय ग्रंथरूपाने हातानिराळा होणार म्हणून वाईट वाटत असले तरी हे विचार--साधल्यास सव्याज, नाहीपेक्षां निदान जसेच्या तसे--पुढील पिढीतील लोकांस देण्यासाठींच आम्हांस प्राप्त झाले असल्यामुळे, वैदिक धर्मातील राजगुह्याचा हा परीस 'उत्तिष्ठत जाग्रत ! प्राप्य वरान्निबोधत ! '--उठा ! जागे व्हा ! आणि (भगवंतांनी दिलेले) हे वर समजून घ्या !--या कठोपनिषदांतील मंत्राने (कठ. ३.१४) प्रेमोदकपूर्वक आम्ही होतकरू वाचकांच्या हवाली करितों. यांतच कर्माकर्माचे सर्व बीज आहे; आणि या धर्मार्चे स्वल्पाचरणहि मोठ्या संकटातून सोडविते, असे खुद्द भगवंताचंच निश्चयपुर्वक आश्वासन आहे.

यापेक्षां आणखी जास्त काय पाहिजे ! ' केल्याविण कांही. होत. नाहो' हा सृष्टीचा नियम लक्षांत आणून तुम्ही मात्र निष्कामबुद्धीने कर्ते व्हा म्हणजे झालें, निव्वळ स्वार्थपरायण बुद्धीनें संसार करून थकल्याभागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ, किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनहि, गीता सांगितलेली नसून संसारच मोक्षदृष्टया कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारांतले खरें कर्तव्य काय याचा तात्विकदृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीताशाख्राची प्रवृत्ति झालेली आहे. म्हणून पूर्व वयांतच गृहस्थाश्रमाचें किंवा संसाराचे हे प्राचीन शास्त्र जितक्या लवकर समजून घेणें शक्य असेल तितक्‍या लवकर प्रत्येकाने समजून येतल्याखेरीज राहूं नये, एवढीच आमची शेवटीं विनंति आहे.

बाळ गंगाचर टिळक,
पुणे, अधिक वै्शाख शके १८३७.

Hits: 154
X

Right Click

No right click