गीतारहस्य - प्रस्तावना - लोकमान्य टिळक - ४
गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शाखविस्तरैः--एकल्या गीतेचे पुरे अध्ययन केले म्हणजे बस्स आहे; बाकीच्या शास्त्रांचा फोलकट पसारा काय करावयाचा असें म्हणतात ते काही खोटें नाही; आणि म्हणूनच हिंदुधर्म व नीतिशास्त्र यांच्या मूल्तत्त्वांची ज्यांस ओळख करून घ्यावयाची असेल त्यांनी या अपूर्व ग्रंथाचे प्रथम अध्ययन करावें असे आमचे त्यांस सविनय पण आग्रहपूर्वक सांगणे आहे. कारण सांख्य, न्याय, मीमांसा, उपनिषदे, वेदान्त वगरे क्षराक्षरसृष्टीचाचा व क्षेत्रक्षेत्रज्ञ ज्ञानाचा विचार करणारी प्राचीन शास्त्रे तत्काली शक्य तेवढ्या पूर्णावस्थेस आल्यावर वैदिक धर्मास ज्ञानमूलक भक्तिप्रधान व कर्मयोगपर असे जें अखेर स्वरूप आलें, व हल्ली प्रचलित असलेल्या वैदिक धर्माचे जें मूल आहे, तेंच गीतेत प्रतिपादिलेले असल्यासुळे, संक्षेपाने पण निःसंदिग्ध रीतीने सांप्रतच्या हिंदुधर्माची तत्त्वे समजावून देणारा गीतेतारखा दुसरा ग्रंथच संस्कृत वाडूमयांत नाही म्हटले तरी चालेल.
गीतारहृस्यांताल विवेचनाचा सामान्य रोख यावरून वाचकाच्या लक्षांत येईल. गीतेवर पहिल्या टीका कर्मयोगपर असाव्या असे ग्रीतेवरीक शांकरभाष्याच्या तिसरे अध्यायाचे आरंभीं या टौकाकारांच्या अभिप्रायांचा जो उल्लेख आहे त्यावरून दिसून येते. या टीका आतां उपलब्ध नाहींत; म्हणून गीतेचे कर्मयोगपर व तुलनात्मक हे पहिलेच विवेचन आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
यांत कांही श्लोकांचे अर्थ हल्लीच्या टीकांतून दिलेल्या अर्थाहून भिन्न असून, मराठीत पूर्वी कोठेच सविस्तर वर्णिले नाहींत असे दुसरे पुष्कळ विषयहि सांगावे लागले आहेत. हे विषय व त्यांचा, उपपत्ति संक्षेपानेंच पण होईल तितक्या स्पष्ट व सुबोध रीतीनें सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे; आणि द्विरुक्ति झाली तरीहि त्याची पर्वा न ठेविता ज्या शब्दांचे अर्थ मराठीत अद्याप रूढ झालेले नाहींत त्यांचे पर्याय-शब्द त्याना जोडूनच पुष्कळ ठिकाणी मुद्दाम दिलेले असून, शिवाय या विषयांतील प्रमुख प्रमुख सिद्धान्त जागोजाग सारांशरूपारने उपपादनापासून निराळे काढून दाखविले आहेत. तथापि शास्त्रीय व गहन विषयांची चर्चा थोडक्या शब्दांनी करणें नेहमीच कठिण असून, य़ा विषयांची मराठी परिभाषाहि अद्याप कायम झालेली नाही; म्हणून भ्रमाने, नजरचुकीने, किंवा अन्य कारणांनी, आमच्या या नवीन तऱ्हेच्या विवेचनांत काठिन्य, दु्र्बोधता, अपुरेपणा किंवा दुसरे दोषहि रहाण्याचा संभव आहे हे आम्ही जाणून आहो.
परंतु भगवद्गीता वाचकांस अपरिचित आहे असे नाही. गीता पुष्कळांच्या नित्यपाठांतली असून तिचे शास्त्रीयदृष्ट्या अध्ययन केलेले व करणारेहि पुष्कळ लोक आहेत. यासाठी अश्या अधिकारी पुरुषांस आमची अशी विनंति आहे को, त्यांच्या हातांत हा ग्रंथ पडून त्यांत वरील प्रंकारचे कांही दोष त्यांचे नजरेस आल्यास त्यांनी ते मेंहेरबानीने आम्हांस कळवावे, म्हणजे त्यांचा विचार करून या ग्रंथाची द्वितीयावृत्ति काढण्याचा प्रसंग आल्यास त्यांत योग्य ती दुरुस्ती करण्यांत येईल. आमचा कांही विशिष्ट संप्रदाय असून तत्सिद्ध्यर्थ आम्ही गीतेचा एक प्रकारचा विशिष्ट अर्थ करतो अशी कित्येकांची समजूत होण्याचा संभव आहे. यासाठी येथें एवढें सांगिदले पाहिजे की, गीतारहस्य हा ग्रंथ कोणत्याहि विशिष्ट व्यक्तीस किंवा संप्रदायास उद्देशून लिहिलेला नाही, आमच्या बुद्धीप्रमाणे गीतेच्या संस्कृत श्लोकाचा जो सरळ अर्थ होतो तो आम्ही दिला आहे. असा सरळ अर्थ केल्यानें,---आणि हल्ली संस्कृताचा बराच प्रसार झाला असल्यामुळे अर्थ सरळ आहे की नाही हे पुष्कळांस सहज कळण्यासारखें आहे,--त्यांत जर कांही सांप्रदायिकपणा येईल तर् तो गीतेचा आहे, आमचा नव्हे.
मला दोनचार मार्ग सांगून घोटाळ्यांत न पाडितां, त्यांपैकी जो श्रेयस्कर असेल तो एकच निश्र्चयेकरून सांगा (गी. ३. २; ५.१) असा अर्जुनाचा भगवंतांस स्पष्ट प्रश्न असल्यामुळें, गीतेत कांही तरी एकच विशिष्ट मत प्रतिपाद्य असलें पाहिजे हें उघड आहे (गी.4. ३१): व ते कोणतें हे मूळ गीतेचाच अर्थ करून निराग्रहबुद्धीने आम्हांस पहावयाचे आहे; प्रथम कांही तरी मत कायम करून, त्याला गीता जुळत नाही म्हणून गीतार्थाची ओढाताण करावयाची नाही. सारांश, गीतेचे खरोखरच जें रहस्य आहे,--मग ते कोणत्याहि संप्रदायाचे अगर पंथाचे असो,-त्याचा गीताभक्तांत प्रसार करून भगवंतांनीच अखेर म्हटल्याप्रमाणे हा ज्ञानयज्ञ करण्यास आम्ही प्रवृत्त झालो आहो; व आम्हास अशी उमेद आहे की, त्याच्या अव्यंगता-सिद्ध्यर्थ वर मागितलेली ज्ञानभिक्षा आमचे देशबंधु व धर्मबंधु आम्हांस मोठ्या आनंदाने घालतील.
Hits: 145