गीतारहस्य - प्रस्तावना - लोकमान्य टिळक - ३
कोहिनूर हिऱ्याची अशी गोष्ट सांगतात की, तो हिंदुस्थानांतून विलायतेंत नेल्यावर तेथें त्याचें पुनः नवे पैलू पाडण्यांत आले; व त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसु लागला. हिऱ्यास लागू पडणारा हा न्याय सत्यरूपी रत्नासहि लागूं पडतो. गीतेतील धर्म सत्य व अभय खरा; पण तो ज्या काली ज्या स्वरूपाने सांगण्यात आला त्या देशकालादि परिस्थितीत पुष्कळ फरक पडल्यामुळे, कित्येकांच्या डोळ्यात त्याचे तेज आतां पूर्वीप्रमाणे भरत नाहीसं झाले आहे. कोणतें कर्म चांगलें ब कोणतें वाईट हे ठरविण्यापूर्वी, कर्म करावे किंवा नाही हा सामान्य प्रश्नच ज्या काळी महत्वाचा समजत असत, «तेव्हा गीता सांगितलेली असल्यामुळे, त्यांतील बराच भाग आतां कित्येकांस अनावश्यक वाटतो; आणि त्यावरच आणखी निवृत्तिमार्गीय टीकाकारांचे सारवण पडल्यामुळे गीतेतील कर्मयोगाचे विचेचनत सध्याचे काळी पुष्कळांस दुर्बोध झाले आहे. शिवाय आधिभौतिक ज्ञानाची अर्वाचीन काळी पाश्चिमात्य देशांत जी वाढ झाली आहे त्यामुळे अध्यात्मशास्त्राला धरून केलेली प्राचीन कर्मयोगाची विवेचने हल्लीच्या कालास पुर्णपणे लागू पडणे शक्य नाही, अशीही कित्येक नव्या विद्वानांची समजूत झालेली असते हे समज खरे नव्हेत, असे दाखविण्यासाठी गीतारहस्यातील विवेचनांतच गीतेच्या सिद्धांताच्या जोडीचे पाश्चात्य़ पंडितांचे सिद्धांत आम्ही जागोजाग संक्षेपाने दिले आहेत.
वास्तविक पाहिले तर गीतेतील धर्माधर्मविवेचनास या तुलनेने अधिक बळकटी येते असे नाही. तथापि अर्वाचीन काली झालेल्या आधिभौतिक शाखाच्या अभूतपूर्व वाढीने ज्यांची दृष्टि दिपून गेली आहे, किंवा सध्यांच्या एकदेशीय शिक्षणपद्धतीमुळे नीतिशास्त्राचा आधिभौतिक म्हणजे बाह्य दृष्टीने विचार करग्यास जे शिकले आहेत, त्यांस या तुलनेवरून एवढें स्पष्ट कळून येईल की, मोक्ष धर्म व नीति हे दोन्ही विषय आधिभौतिक ज्ञानाच्या पलीकडचे असल्यामुळें प्राचीन काळी आमच्या शास्त्रकारांनीं या बाबतीत जे सिद्धान्त केले आहेत त्यांच्या पुढे मानवी ज्ञानाची गति अद्याप गेलेली नाहीं, इतकेंच नव्हे तर पाश्चिमात्य देशांतहि अध्यात्मदृष्टया या प्रश्नांचा ऊहापोह अद्याप चालू असून सदर आध्यात्मिक ग्रंथकारांचे विचार गीताशास्त्रांतील सिद्धान्तांहून फारसे भिन्न नाहीत. गीतारहस्याच्या निरनिराळ्या प्रकरणांतील तुलनात्मक विवेचनावरून ही गोष्ट स्पष्ट होईल.
परंतु हा विषय अत्यंत व्यापक असल्यामुळे पाश्चात्य पंडितांच्या मतांचा जो सारांश ठिकठिकाणी आम्ही दिला आहे, त्याबद्दल येथे एवढें सांगणे जरूर आहे की, गीतार्थ प्रतिपादन करणें हेच आमचें मुख्य काम असल्यामुळें गीतेतील सिद्वान्त प्रमाण धरून मग त्यांशी पाश्चिमात्य नीतिशास्त्रज्ञाचें किंवा पंडितांचे सिद्धान्त कितपत जुळतात हे दाखविण्यापुरताच आम्ही पाश्चिमात्य मतांचा अनुवाद केलेला आहे, व तोहि अशा बेताने केलेला आहे की, सामान्य मराठी वाचकांस त्यांतील मतलब लक्षांत येण्यास कठीण पडूं नये. अर्थात् दोहोंमधील बारीक भेद, आणि हे पुष्कळच आहेत,--किवा या सिद्धान्तांचे पूर्ण उपपादन व विस्तार ज्यास पहाणे असेल त्याने मुळ पाश्चात्य ग्रंथच पाहिले पाहिजेत, हें निर्विवाद आहे. कर्माकर्मविवेक किंवा नीतिशास्त्र यावर पहिला पद्धतशीर ग्रंथ आरिस्टाटल नांवाच्या ग्रीक तत्त्वज्ञानें लिहिला, असे पाश्चिमात्य विद्वानांचे म्हणणें आहे. पण आमच्या मतें आरिस्टाटलच्याहि पूर्वी त्याच्यापेक्षा आधिक व्यापक व तात्विकदृष्ट्या या प्रश्नांचा विचार महाभारतांत व गीतेंत केलेला असून, अध्यात्मदृष्टया गीतेत प्रतिपादन केलेल्या नीतित्वांपेक्षां दुसरे निराळें नीतितत्व अद्याप निघालेले नाहो. संन्याश्याप्रमाणे राहून तत्वज्ञानाच्या विचारांत शान्तपणाने आयुष्य घालाविणे बरें, किवा अनेक प्रकारच्या राजकीय उलाढाली करणें बरे, याचा आरिस्टाटलनें केलेला खुलासा गीतेत असून, मनुष्य जें कांही पाप करितो ते अज्ञानानेंच करितो असें जे साक्रेटीसाचे मत त्याचाहि एक प्रकारें गीतेंत समावेश झालेला आहे.
कारण, ब्रह्मज्ञानाने बुद्धी सम झाल्यावर त्याचे हातून कोणतेच पाप घडणें शक्य नाही असा गीतेचा सिद्धान्त आहे. पूर्णावस्थेस पोंचलेल्या परम ज्ञानी पुरुषाचें जे वर्तन तेंच नीतिदृष्ट्या सर्वास कित्याप्रमाणें प्रमाण होय, हें एपिक्युरिअन व स्टोइक पंथांतील ग्रीक पंडितांचे मतहि गीतेस ग्राह्य असून, या पंथांतील लोकांनी केलेले परम ज्ञानी पुरुषाचे वर्णन व गीतेंतील स्थितप्रज्ञाचें वर्णन ही दोन्ही एकसारखीच आहेत. तसेंच प्रत्येकाने सर्व मानवज्ञातीच्या हितार्थ झटणे हीच काय ती नीतीची पर!काष्ठा किंवा कसोटी असें जे मिल्ल, स्पेन्सर, कॉंट. इत्यादि आधिभौतिकवाद्यांचें म्हणणे, त्याचाहि गीतेत वर्णिलेल्या स्थितप्रज्ञाच्या सर्व भूतहिते रतः या बाह्य लक्षणांत संग्रह झालेला असून कान्ट व ग्रीन यांची नीतिशास्त्राची उपपत्ति व इच्छास्वातंत्र्याबद्दलचे सिद्धान्तहि गीतेत उपनिषदांतील ज्ञानाच्या आधारें दिले आहेत. गीतेत यापेक्षां कांही. जास्त नसले तरीहि गीता सर्वमान्य झाली असती, परंतु एवढ्यावरच न थांबता मोक्ष, भक्ति आणि नीतिधर्म यांमध्ये आधिभौतिक ग्रंथकारांस भासणारा विरोध, किंवा ज्ञान आणि कर्म यांमध्ये संन्यासमार्गीयांचे मतें असणारा विरोधहि खरा नसून ब्रह्मविद्येचे व भक्तीचे जें मूलतत्य तेच नीतीचा व सत्कर्माचाहि पाया आहे असें दाखवून, ज्ञान, संन्यास, कर्म व भक्ति यांच्या योग्य मिलाफाने इहलोकी आयुष्यक्रमणाचा कोणता मार्ग मनुष्याने पत्करावा याचाहि गीतेंत निर्णय केला आहे. गीताग्रंथ याप्रमाणें प्राधान्येकरून कर्मयोगाचा आहे म्हणूनच ब्रह्मविद्यान्तर्गत (कर्म-) योगशास्र या नांवाने सर्व वैदिक ग्रंथांत त्याला अग्रस्थान प्राप्त झाले आहे.
Hits: 137