केशवसुत
केशवसुतांना मराठीतील युगप्रवर्तक कवी मानले जाते. ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक ’ असे त्यांचे वर्णन केले जाते.मराठी काव्याला नवा आशय प्राप्त करुन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.केशवसुत यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे होते .त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्यातील मालगुंड या गावी इ.स.१८६६ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये झाले.
संत ज्ञानेश्वर यांच्यानंतरचे मराठीतील दुसरे महत्वाचे व बंडखोर कवी म्हणून केशवसुतांचा उल्लेख केला जातो .मराठीत सुनीतरचनेचा प्रयोग प्रथम त्यांनीच केला .सामाजिक अन्यायावर आपल्या कवितांमधून घणाघाती प्रहार करताना त्यांच्यातील ‘आगरकरांचा शिष्य ’आपणास ठायी ठायी जाणवतो. आपल्या ‘तुतारी’या कवितेत त्यांनी -
"जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनि किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी टाका
सावध! ऎका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवुनि"
असा संदेश नव्या पिढीला दिला .जुन्या गोष्टीना कवटाळून न बसता काळाचे भान टेवून तरुणांनी नवे विचार आत्मसात करावेत, असे त्यांनी सांगितले .त्यांनी मराठी कवितेला प्राप्त करुन दिलेल्या या नव्या रुपामुळे त्यांना ‘कवींचे कवी’, ‘युगप्रवर्तक कवी’, ‘आधुनिक कवि-कुलगुरु’यांसारख्या संबोधनांनी गौरविले आहे.
काव्यसंग्रह : केशवसुतांच्या कवितांचे ‘झपूर्झा’, ‘हरपलेले श्रेय’, ‘केशवसुतांच्या कविता’हे संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.