कुसुमाग्रज

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

कुसुमाग्रज हे मराठीतील अग्रेसर कवी, नाटककार व कांदबरीकार म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. ‘तात्यासाहेब’ या आदरार्थी नावाने ते सर्वपरिचित आहेत. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव विष्णु वामन शिरवाडकर असे आहे. त्यांचा जन्म इ.स.१९१२ मध्ये पुणे येथे झाला .त्यांचे शिक्षण नासिक येथे झाले. वि.वा.शिरवाडकरांनी ‘कुसुमाग्रज’या नावाने काव्यलेखन केले आहे. आपल्या ‘क्रांतीचा जयजयकार’या कवितेत क्रांतिकारकांचा ध्येयवाद व त्यासंबधीची त्यांची मनोधारणा व्यक्त करताना कुसुमाग्रज म्हणतात-

"पदोपदी पसरुन निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे व कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार."

कुसुमाग्रजांचा ‘जीवनलहरी’ हा पहिला काव्यसंग्रह इ.स. १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांच्या मराठी माती, स्वगत, हिमरेषा या काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. नटसम्राट हे शिरवाडकरांचे अत्यंत गाजलेले व सर्वात यशस्वी नाटक आहे. ‘डकर्‍यांच्या ’एकच प्याला’ नंतरची मराठी रंगभूमीवरील सर्वश्रेष्ठ शोंकांतिका, अशा शब्दात ‘नटसम्राट’चा गौरव केला जातो. वि.वा.शिरवाडकरांनी वैष्णव, जान्हवी व कल्पनेच्या तीरावर या तीन कांदबर्‍या लिहिल्या आहेत.

इ.स.१९६४ मध्ये मडगाव (गोवा) येथे भरलेल्या पंचेचाळिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या एकूण साहित्यक कामगिरीचा गौरव म्हणून १९८७ चा म्हणजे तेविसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांनाच प्रदान केला गेला. इ.स. १९८९ मध्ये मुंबई येथे भरलेली पहिली जागतिक मराठी परिषद त्यांच्याच अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

Hits: 436
X

Right Click

No right click