श्री.कृ.कोल्हटकर

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

श्री.कृ.कोल्हटकर हे मराठीतील ज्येष्ठ विनोदी लेखक, नाटककार व वाड्‌मय समीक्षक म्हणून प्रसिध्द आहेत .श्री.कृ.कोल्हटकर यांचे संपूर्ण नाव श्रीपाद कृष्ण कोल्हटकर असे होते. त्यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा येथे इ.स.१८७१ मध्ये झाला.त्यांचे शिक्षण अकोला, पुणे आणि मुंबई या ठिकाणी झाले. कोल्हटकरांनी इ.स.१८९७ मध्ये ‘विविध ज्ञानविस्तार’या मासिकात ‘विक्रम-शशिकला’या नाटकावर टीकालेख लिहून आपल्या वाड्‍मयसेवेचा प्रारंभ केला.

मराठी साहित्यातील विनोदी लेखनाची परंपरा त्यांच्यापासूनच सुरु होते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांचा पहिला विनोदी लेख ‘साक्षीदार’ हा इ.स.१९०२मध्ये ‘विविध ज्ञानविस्तार’ मध्ये प्रसिध्द झाला. महाराष्ट्रातील एक श्रेष्ट विनोदी लेखक राम गणेश गडकरी हे कोल्हटक्ररांना गुरुस्थानी मानत असत आणि गडकर्‍यांना गुरु माननारे तर अनेकजण होते.

कोल्हटकरांच्या नाटकातून त्यांची कल्पकता व कलात्मक सौंदर्यदृष्टी या गुणाचाही आपणास प्रत्यय येतो. त्यांनी लिहिलेल्या कवितांची संख्या फ़ार मोठी नाही; पंरतु त्यातील काही कविता वाड्‌‍मयीन गुणांच्या दृष्ठीने निश्चितच सरस होत्या.‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’ हे आपणा सर्वाच्या परिचयाचे महाराष्ट्र गीत त्यांनीच लिहलेले आहे. कोल्हटकरांच्या ललित वाड्‍मयात कालिदासाची कल्प्कता आणि भवभूतीचा भावाविष्कार एकटवलेला आहे असे वा. म. जोशी म्हणतात.

ग्रंथसंपदा : ‘सुदाम्याचे पोहे’हा विनोदी लेंखाचा संग्रह; वीरतयन, मूकनायक, श्रमसाफ़ल्य, प्रेमशोधन, मतिविकार, जन्मरहस्य, वधुपरीक्षा, परिवर्तन, श्यामसुंदर, गुप्तमंजषा, सहचारिणी ही नाटके. याशिवाय ‘निवडक कोल्हटकर’हा त्यांच्या निवडक लेखांचा समावेश असलेला ग्रंथ.

Hits: 583
X

Right Click

No right click