रायगड
Image Source : Google |
छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुद्धा याच गडावर! अखेरची सात वर्षे त्यांनी या गडावरूनच स्वराज्याचा कारभार पाहिला. तत्पूर्वीच्या इतिहासकाळात हा गड `रायरी' या नावाने ओळखला जात असे. मराठी दौलतीतील अत्यंत अवघड आणि म्हणूनच सुरक्षित असलेला हा किल्ला होय. संपर्काच्या दृष्टीने व कारभाराच्या दृष्टीने तो शिवरायांना इतर किल्ल्यांपेक्षा अधिक सोयीचा वाटला. रायगड येथे राजधानी असल्याने या किल्ल्यात सर्व सोयीसुविधा होत्या. एक नगरीच तेथे वसवण्यात आली होती. समुद्र सपाटीपासून जवळजवळ ८५५ मीटर उंच असलेल्या रायगडावर जाण्यासाठी पायऱ्या असून त्याशिवाय असलेले अन्य मार्ग अतिशय कठिण आणि अवघड आहेत. |