परळीचा किल्ला' म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला समर्थ रामदास यांच्या वास्तव्यानंतर `सज्जनगड' या नावाने ओळखला जाऊ लागला. शिवाजी महाराजांनी इ.स. १६७३ च्या सुमारास तो विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला. आयुष्याच्या अखेरपावेतो समर्थ रामदास स्वामी याच गडावर निवास करीत. इ.स. १६८२ मध्ये ते या ठिकाणी समाधिस्त झाले. साताऱ्यापासून हा किल्ला अवघ्या १५ कि. मी. अंतरावर आहे. पूर्वी हा किल्ला चढून जावे लागत असे. पण अलिकडे अगदी थेटपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. किल्ल्याला दोन भव्य प्रवेशद्वार आहेत. अंतर्भागात श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिराखाली श्री समर्थांची समाधी आहे. मंदिरानजिकच समर्थांचा मठ आहे. मठात समर्थ ज्या वस्तूंचा दैनंदिन वापर करीत त्या सर्व वस्तू उदा. पलंग, पिण्याच्या पाण्याच्या तांब्या, पिकदान, कुबड्या या वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. शिवाजी महाराजांनी समर्थांना या वस्तू भेटीदाखल दिल्या होत्या. गडाच्या एका टोकाला एक मारूतीचे मंदिरही आहे. मंदिराजवळच एक तलाव आहे. सज्जनगड समुद्रसपाटीपासून सुमारे ९०९ मीटर उंचीवर आहे.
|