पावनखिंड
Image Source : Google |
|
|
|
इकडे शिवराजांनी पन्हाळा सोडण्याचे ठरविले आणि बरोबर ६०० हत्यारबंद पायदळ, बाजीप्रभूंसह महाराज हेरांनी योजलेल्या मार्गाने पन्हाळयावरून निसटले. १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा, गुरूवार, रात्रीचे सुमारे १० ची वेळ. विजा चमकत होत्या पाऊस कोसळत होता आणि एवढ्यात सिद्दीच्या एका पहारेकऱ्याने हे पाहिले आणि तो ओरडला, `दगा दगा!' ही चाहूल लागताच राजांनी दोन पालख्या केल्या. एका पालखीत ते स्वत: तर दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा दिसणारा, त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रति शिवाजी (शिवा काशीद) बसला. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्दी जौहरकडे पोहोचविली. जौहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवा काशीदचा शिरच्छेद करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवराजासाठी शिवा काशीदने समर्पण केले. बाजींनी गनिमीकावा साधला. आपली मोजकी माणसे झाडांवर बसवून मसूदचे हशम येताच त्यांच्यावर दगडांचा मारा सुरू केला. नारळ फुटावा तशी हशमांची डोकी फुटू लागली. खिंडीच्या तोंडाशी अडसरासारखे राहून बाजींनी दिवसभर त्वेषाने खिंड लढविली. अनेक घाव बसले, देह घायाळ झाला, मावळे मरून पडले. बाजींचे लक्ष होते विशाळगडाकडे ! अखेर सायंकाळी सहा वाजता तोफांचे आवाज आले. याचवेळी बाजींच्या वर्मी घाव बसला आणि ते कोसळले. शेवटच्या क्षणी ते म्हणाले, `महाराज माझे काम मी केले, येतो.' विशाळगडावर महाराज वाट पहात होते, जिवंत बाजीची. पण महत्प्रयासाने मावळयांनी बाजींचे प्रेत गडावर नेले. महाराज अत्यंत कष्टी झाले. रायाजी नाईक, बादल यांनी राजांच्या आज्ञेने बाजींच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले. ती समाधी दुर्लक्षित आहे. आजही या खिंडीत पोहोचताच १३ जुलै १६६० च्या रणसंग्रामाची आठवण होते. खिंडीचाही गळा दाटून येतो. रक्ताचा सडा शिंपून स्वामीनिष्ठेपायी, स्वराज्यासाठी बाजीने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी, पुरोगामी व इतिहासभिमानी म्हणवणाऱ्या शासनाने त्यांच्या समाधीची देखरेख ठेवली तरच आपला इतिहासभिमान सार्थ ठरणार आहे. |