सागरा प्राण तळमळला

Parent Category: मराठी साहित्य Category: कविता Written by सौ. शुभांगी रानडे

सागरा प्राण तळमळला
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धुतां । मी नित्य पाहिला होता ॥

मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।
सृष्टिची विविधता पाहूं ॥

तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले ॥

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।
त्वरित या परत आणिन ॥

विश्वसलो या तव वचनीं ।
मी जगदनुभवयोगें बनुनी ॥

मी तव अधिक शक्त उद्धरणीं ।
मी येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला ॥

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।
ही फसगत झाली तैशी ॥

भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।
दशदिशा तमोमय होती ॥

गुणसुमनें मी वेचियली या भावें ।
की तिने सुगंधा घ्यावें ॥

जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा ॥

ती आम्रवृक्षवत्सलता ।
रे नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥
तो बाल गुलाबहि आतां ॥
रे फुलबाग मला, हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥
--विनायक दामोदर सावरकर

Hits: 483
X

Right Click

No right click