काळोखाची लांबलचक सावली ...!!

Parent Category: मराठी साहित्य Category: कविता Written by सौ. शुभांगी रानडे

तो हवालदिल होऊन गेलाय ह्या महानगरात येऊन
काळोखाची लांबलचक सावली पडलीय त्याच्या समोर
तुडवत चाललाय आंधळेपणाने दिशाहीन होऊन
पाठीशी आशीर्वादाचे हात घेऊन तो निघून आलाय आपल्या गावातून
आशीरवाद नाही देऊ शकत त्याला ह्या काळोखात प्रकाश
वशिल्याचा एखादा कागद नाही देऊ शकला कोणी [!!]
प्रामाणिकपणाचा मजकूर लिहिलाय त्याच्या भाळावर
पण तो वाचायला येथे वेळ आहे कुणाला ..? कशाला ...?
तो शोधतोय आधार कुणाचातरी मिटल्या डोळ्यांनी
चाचपडत चाललाय हा दिशाहीन रस्ता ठेचकाळत

झाडे ओळखीची भेटलीत ह्या महानगरात खूप ,
रोगट तरी ती आपली वाटली
पक्षी तेच कावळे चिमण्या घरच्यासारखे त्यांचे वागणे
तेवढीच त्यांच्या आपलेपणाची नितळ धार त्याने ओंजळीत घेतलीय
बाकी येथे कोणीच नाही आपला , परकेपणाची भावनाच सर्वत्र पसरलीय

वास असलेली फुले फार कमी फुलतात बिनवासाची फुले नुसती गच्च फुलतात
जे काम करू शकणार नाहीत ते कसे अगदी आपली वाटतात [!!]
जे काम करू शकतात ती कशी कपट रचतात..?

तो खोदत बसलाय ह्या काळोखात आपल्या पोटासाठी काहीतरी
नशीब गळाला लागावे म्हणून तो करुणेचे आमिष लावून बसलाय
तो प्रार्थना करतोय येईल तशी , जमेल तशी
ह्या काळोख फुटक्या रंगीत झिम्माड प्रकाशात
तो ओंजळ पसरून बसला आहे

Hits: 490
X

Right Click

No right click