नामसाधना

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

नामाची त्या सतत साधना करी मना बा सखया ।
देवचि येईल स्वये पहा मग तुजला घरी भेटाया ॥ . . . ध्रु.

जनीस भेटे धुणे धुता कधी दळण सारवण करिता
नाथाघरी तो कृष्णमुरारी भेटे पाणी भरिता ।
हात जोडिता विनम्रभावे फिटेल सारी माया
देवचि येईल स्वये पहा मग तुजला घरी भेटाया ॥ . . . १

मीरेला तो दिसे कन्हैय्या निजता उठता बसता
सावत्यास त्या दिसे विठाई मळाराखणी करिता ।
नाम फुकाचे मुखात येता नुरवी सुखदुःखा या
देवचि येईल स्वये पहा मग तुजला घरी भेटाया ॥ . . . २

कष्टामध्ये असूनि सखुला दिसे सदा विठुमाता
गो‍‍र्‍या कुंभाराला भेटे मडकीगाडगी करिता ।
कामीधामी रंगुनि जाता दर्शन दे विठुराया
देवचि येईल स्वये पहा मग तुजला घरी भेटाया ॥ . . . ३

Hits: 286
X

Right Click

No right click