पैशाचा खेळ

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

पैसा बोलतो, चालतो
सकला नाचवितो
पैसा बोलतो, चालतो - - - ध्रु.

कुणा फसवितो, रडवितो
कुणा झुलवितो, हसवितो
दूर देशा धाडीतो
पैसा बोलतो, चालतो - - - १

रावरंकालाही खुलवितो
हजार वाटांनी खुणावितो
सकलजना भुलवितो
पैसा बोलतो, चालतो - - - २

राशी सुखाच्या दावितो
डोंगर दुःखाचेही उभारतो
परि नामानिराळा होतो
पैसा बोलतो, चालतो - - - ३

नावारूपाला आणवितो
परि स्वरूप ना दाखवितो
कधि नावही नुरवितो
पैसा बोलतो, चालतो - - - ४

महालमाडीही मांडितो
मांडता मांडता मोडितो
स्वप्ने उधळुनि देतो
पैसा बोलतो, चालतो - - - ५

आशा उद्याची फुलवितो
राक्षसी रूपांनी भिववितो
कधि देवरूप दावितो
पैसा बोलतो, चालतो - - - ६

दान दैवाचे देई तो
सहजी लुटूनिही नेई तो
खेळ कैसा खेळतो
पैसा बोलतो, चालतो - - - ७

पैसा बोलतो, चालतो
सकला नाचवितो
पैसा बोलतो, चालतो - - -

Hits: 256
X

Right Click

No right click