मायेचा गाव
जावे मायेचिया गावा
तेथे आज्जी नि आजोबा
आज्जी नि आजोबा
तेथे आज्जी नि आजो ऽ ऽ बा. . . १
गाव माझा दूर जरी
नाही घोडा गाडी दारी
जा मना बा वारूवरी
वेगे स्वार होई तरी
वेगे स्वार होई तरी . . . २
गंगा वाहे संथ जैशी
तैशी नदी वेशीपाशी
प्राण आणुनी डोळ्यामाजी
वाट पाहे माझी आजी
वाट पाहे माझी आजी . . . ३
आंबाफणस पेरू असली
झाडे असती भोवताली
नारळाच्या झाडाखाली
सावलीत ये हरळी
सावलीत ये हरळी . . . ४
जाईजुई अन् अबोली
कुंद मंद ती चमेली
पारिजातासंगे झाली
धुंद मोगर्याची वेली
धुंद मोगर्याची वेली . . . ५
रानमेव्यासंगे घेई
चौघडी तू भरजरी
आज्जीच्या त्या चौघडीस
ऊब येई फार भारी
ऊब येई फार भारी . . . ६
मोत्यामनी रोज येती
दूधपोळी खाण्यासाठी
आज्जीसंगे संभाषणा
प्रेमे जणू ती करिती
प्रेमे जणू ती करिती . . . ७
आजोबांच्या ठेवीतील
गोष्टी ऎक पोटभरी
गोष्टी ऎकताना होई
सार्या जगताची फेरी
सार्या जगताची फेरी . . . ८
संपुनी ती रात्र जाई
अलगदशी उषा येई
कोंबड्याच्या आरवणी
गोड वाटे ती सनई
गोड वाटे ती सनई . . . ९
भूपाळी ती पक्षी गाती
मंद वात भक्तिगीती
केकावली मोराची ती
ऎकुनीया जाग येई
ऎकुनीया जाग येई . . . १०
गावाची त्या ओढ खरी
लावी मजला वेड भारी
आठवांची ही शिदोरी
पुरवी मना जन्मभरी
पुरवी मना जन्मभरी . . . ११
Hits: 270