प्रकरण १ - जलचक्र

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन Written by सौ. शुभांगी रानडे

या प्रकरणात भूतल व त्याभोवतीचे वातावरण, त्यात निरनिराळ्या भौतिक स्वरूपात विभागले गेलेले पाणी, त्याच्या परिमाणात क्वतुमानानुसार घडून येणारे फेरबदल, जलचक्र व जागतिक भूमिकेवरून पाण्याचा होणारा वापर यांचा विचार केला आहे.

जलचक्रः
पाण्याच्या साठ्याचा विचार केला तर सूर्यमालेतील इतर कोणत्याही ग्रहापेक्षा पृथ्वीवर अधिक मेहेरनजर झालेली दिसते. वजनाने जड वायू व बाष्पयुक्त वातावरण पेलण्यास योग्य असे गुरुत्वाकर्षण बल फक्त पृथ्वीपाशीच असल्याने हे शक्‍य झाले आहे. याशिवाय सूर्यापासून १४९ दशलक्ष कि. मी. इतक्या लांबवर पृथ्वी असल्याने पुढील तीन स्वरूपात पाणी सापडणे शक्‍य बनले. पृथ्वी व आसमंतातील घन-द्रव-वायू या तीन स्वरूपात असलेल्या पाण्याचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर बरीच उद्बोधक माहिती मिळते. समुद्र, बर्फाच्छादन, हिमनद्या, नद्या, तळी, मृत्तिकाकणांवर अधिशोषित झालेले पाणी व हवेतील बाष्प मिळून होणार्‍या एकूण पाण्याच्या परिमाणापैकी ९७.२ प्रतिशत पाणी समुद्रात तर २.१५ प्रतिशत पर्वतराजींवरील बर्फाच्छादन व हिमनद्यात सापडते. उर्ववरित पाण्यापैकी ९७ प्रतिशत सुपरिचित भूजलाच्या स्वरूपात उपलब्ध होते. निरनिराळ्या स्वरूपातील हे पाण्याचे प्रमाण सर्वसाधारणतः जरी तितकेच राहत असले तरी ऋतुमानाप्रमाणे पाण्याच्या स्थितीत सदैव बदल होत असल्याने पाणी बदलते राहते.

सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे समुद्रजल व पृष्टीय जल तप्त होऊन त्याची वाफ बनते व ती वातावरणात मिसळून पृथ्वीपासून उंच उचलली जाते. हवामानातील फरकामुळे वाफेचे ढग 'जलद' बनतात. कालांतराने हे जलद, पजंन्यवृष्टी करून, ग्रीष्माने भाजून निघालेली धरित्री श्रांत करतात. पर्जन्यातील काहीं भाग जमिनीवर पडून प्रवाहाच्या स्वरूपात भूपृष्ठावर दृश्यमान होऊन पृथ्वीला ' सुजला सुफला ' करतो तर थोडासा भाग जमिनीत झिरपून भूजलाच्या रूपाने मानवास उपलब्ध होतो. हे सारे पाणी आपला वाहण्याचा गुणधर्म स्मरून सरतेशेवटी समुद्रार्पण होते. या साऱ्या स्थित्यंतराला ' जलचक्र ' असे संबोधितात. आकृती १-१

हे जलचक्र, पाण्याचे बाष्पीभवन होण्यासाठी सौरशक्‍तीवर, वाफेचे ढग बनण्यासाठी व ढगातून पर्जन्यस्वरूपात पडण्यासाठी वातावरणीय परिसंचरणावर अन्‌ जमिनीत पाणी साठवून ठेवण्यासाठी पृष्ठीय धारणक्षमतेवर अवलंबून असते. वाफेच्या स्वरूपात सापडणारे पाणी कोणत्याही एका क्षणी पृथ्वीच्या सर्व भागावर समप्रमाणात पडले तर पृथ्वीवर २. ५ सें. मी. जाडीचा पाण्याचा थर निर्माण करू शकेल. संपूर्ण वर्षात मिळून वाफेत होणारे पाण्याचे परिमाण ५२०,००० घन कि. मी. इतके आहे. त्यापैकी ४४९,००० घन कि. मी. इतके पाणी समुद्रात आहे. अंदाजे ६१,००० घन कि. मी. पाणी भूजल, तळी, प्रवाह इत्यादीमधून वाफेच्या स्वरूपात वातावरणात फेकले जाते. सारणी १-१ मध्ये पृथ्वी, समुद्र व इतर जलाशय यांच्यात सापडणारे पाण्याचे आकारमान व निरनिराळ्या प्रक्रियांमुळे त्यात होणारी घट, घटीचा वार्षिक दर वगैरे दाखविले आहे.

पाण्याचे अनेकविध उपयोग:
पृथ्वी व आसमंत यात निरनिराळ्या स्वरूपात सापडणारे पाणी अनेकविध प्रकाराने मनुष्यमात्राच्या संबंधात येते. थोडक्यात उल्लेख पुढीलप्रमाणे करता येईल :--

पाणी म्हणजेच,

* जीवसृष्टीची आत्यंतिक गरज---जीवन.
* प्राणिमात्रांच्या पोषणासाठी लागणार्‍या अन्नधान्याचे उत्पादने सुलभ करणारे माध्यम.
* औष्णिक विद्युतृशक्तीसाठी आवश्यक असे महत्त्वपूर्ण साधन.
* शीतक, प्रक्षालक व तनुकारक असे द्रावण.
* नागरी वस्तीतील वाहित मल व अन्य अपशिष्टे वाहून नेणारे साधन.
* नौकानयन शक्‍य करणारे आवश्यक माध्यम.
* सौंदर्यदृष्टीला सुखविणारे व मनोरंजनाला साधनभूत ठरले जाणारे माध्यम.
* संक्रामक रोगांचा प्रसार होण्यास सहाय्यभूत होणारे एक साधन.
* त्रासदायक व उपद्रवकारक अशा जीवकोषिकांना व प्राणिमात्रांना उदार आसरा देणारे एक आश्रयस्थान.

यांपैकी प्रत्येकाचा विचार साकल्याने पुढील प्रकरणांतून केलेला आहे. पुढील परिच्छेदात जागतिक भूमिकेतून पाण्याचे महत्त्व दाखविले आहे.

जागतिक लोकसंख्या व पाण्याची मागणी:

१९७० साली झालेल्या जनगणनेनुसार पृथ्वीची एकूण लोकसंख्या ३०० कोटी इतकी आहे. प्रतिदिनी २ लक्ष अधिक मानवांची त्यात येवून पडणारी 'भर' लक्षात घेतली तर इ. स. २००० मध्ये ही लोकसंख्या बरोबर दुप्पट म्हणजे ६०० कोटी होईल. या भरीमुळे पाण्याची मागणी भरमसाठ वाढेल. मात्र ती मागणी, १९७० साली असलेल्या गरजेच्या दुपटीत न वाढता अनेकपटीत वाढलेली असेल. वापरलेल्या पाण्यापैकी रासायतिक प्रक्रियेत प्रत्यक्ष भाग घेणारे पाणी सोडले तर इतर पाणी म्हणजे स्नानासाठी, पिण्यासाठी, सिंचाईसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी उपयोजिलेले पाणी संपूर्णतः कधीच वापरले जात नाही. अशुद्ध स्वरूपात ते पुन्हा जलचक्राला कोठे ना कोठे तरी जाऊन मिळतेच. काही काळापुरते ते वितरणयोग्य होत नाही इतकेच ! म्हणज पाण्याचा ' एकूण पुरवठा ' (पृथ्वीवरील पाण्याचा एकूण साठा) ही समस्या तेवढी गंभीर नसून त्या पाण्याचे ' योग्य वेळी, योग्य भागात, योग्य तऱ्हेने वितरण होणे ही खरी गंभीर समस्या आहे. सुरुवातीस वसतीसाठी जागेची निवड करताना मुबलक पाणीपुरवठा असलेली जागा निवडली जाते.

Hits: 486
X

Right Click

No right click