प्रकरण १ -पाणी ? नव्हे जीवन
पाणी ? नव्हे जीवन
संपुर्ण जीवमंडलात अधिकतम प्रमाणात असलेला पदार्थ म्हणजे पाणी. अपवाद श्वसनासाठी वापरल्या जाणाऱ्या हवेचाच काय तो. पाणी हे अतिशय जवळचे पण तितकेच
अपरिचित असे असेंद्रिय यौगिक. इतके निकट साहचर्य की, जीवमंडलातील कोणत्याही घटकाचे अस्तित्व याविना अशक्य व्हावे. पाण्याला * जीवन ' म्हणून संबोधिले जाते ते उगाच नाही.
निसर्गाकडून मिळालेली निर्मल, चमकिली, पारदर्शक अन् पापक्षालकासारखी अद्भूत शक्ती लाभलेली दैवी भेट म्हणून अनादी कालापासून मानव पाण्याकडे आदराने पाहत आला आहे. मानवाशी संबंधित असलेल्या बहुतेक सर्व कार्यांत--पूजाअर्चा, संकल्प, धार्मिक-विधी इत्यादी--पाण्याचे महत्त्व केवळ अनन्यसाधारण आहे. इतिहासाचे परिशीलन केले तरी हेच दिसून येईल. भटक्या जमाती, खेडी, शहरे, इतकेच नव्हे तर सुखसमृद्धीत नांदलेल्या व नांदत असलेल्या संस्कृतींचे भवितव्य पाण्याच्या विपुलतेवर वा दुर्मिळतेवर विसंबून राहिलेले दिसते. मराठीतील 'आधी जल, मग स्थल' ही म्हण याचीच साक्ष देते.
जोपर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात 'उदंड जाहले पाणी' अशी परिस्थिती होती आणि मानवाच्या आरोग्यविषयक कल्पना वैयक्तिक आरोग्याचा उंबरठा ओलांडून बाहेर पडलेल्या नव्हत्या तोपर्यंत नदीत वा कोणत्याही जलप्रवाहात अनवधानाने अगर बुद्धीपुरस्सर टाकलेल्या अपायकारक पदार्थाचेही (प्रदूषणकारी घटक वा दूषितके ) नैसर्गिकरीत्या होणारे निराकरण---आत्मशोधन--दैवी वाटणे साहजिक होते. परंतु काळाबरोबर जसजसी लोकसंख्या वाढू लागली व शास्त्रीय ज्ञान प्रगत होऊ लागले तसतशी परिस्थिती पालटू लागली. माणसाच्या आरोग्यविषयक कल्पना जास्त सुस्पष्ट होऊ लागल्या. तो वैयक्तिक आरोग्याबरोबरच सार्वजनिक आरोग्याचाही विचार करू लागला. पाण्याचा वापर पूर्वीच्या तुलनेने किती तरी पट वाढू लागला. एका बाजूला लोकसंख्या व शास्त्रीय ज्ञान यांची झपाट्याने होणारी वाढ तर दुसऱ्या बाजूला वाढत्या गरजांच्या प्रमाणात पुरवठा करण्यास दिवसेंदिवस असमर्थ बनत चाललेले पाण्याचे जुनेच साठे यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या.
पाणी कमी पडू लागले म्हणून शास्त्रीय प्रगती थांबवायची का त्या प्रगतीला तशीच अप्रतिहत ठेवून निसर्गाला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करावयाचा हा प्रश्न मानवासमोर उभा ठाकला. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीला अडसर घालण्याचा हा विचार केवळ दैवावर विसंबून राहणारा कर्मठ माणूसच करू शकेल. शास्त्रीय विषयाच्या अभ्यासकाने तसे करून चालणार नाही. शास्त्रज्ञाचे मत हे केव्हाही प्रगल्भच असावयाला हवे. ज्या बुध्दीच्या बळावर त्याने ' विश्वामित्री प्रतिसृष्टी ' निर्माण करण्यास सुरुवात केली त्याच बुद्धीच्या बळावर निसर्गात होणारे बदलही तो निश्चित थोपवू शकेल. त्यासाठी आवश्यक आहे तो फक्त अभ्यास, निसर्गनियम व नैसगिक वस्तूंच्या गुणधर्मांचा सखोल अभ्यास.
आपल्याभोवती अफाट पसरलेले विश्व ही एक प्रकारची प्रयोगशाळाच आहे. तिच्यात प्रत्यही होत असलेले सूक्ष्म स्वरूपाचे किवा क्वचित् प्रसंगी एकदमच स्थूल स्वरूपात दृश्यमान् होणारे बदल हे विश्वात घडणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया, परस्परांमध्ये घडणारे संघर्ष आणि अजाणता किवा बुध्दिपुरस्सर मानवी समुहांकडून केली जाणारी कृत्ये यांचा समाकलित परिपाक आहे. गेली कित्येक शतके शास्त्रज्ञ आपापल्या कुवतीप्रमाणे त्या बदलांचे अन्वयार्थ लावण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहेत. अजूनही साऱ्या चमत्कारांचा उलगडा झालाच नाही. प्रख्यात नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ आइन्स्टाईन म्हणूनच एकदा म्हणाला की, ' जगात अमर्याद, अनंत अशा दोनच गोष्टी आहेत. एक अफाट विस्तारलेले विश्व नि दुसरे म्हणजे विनाकारणच अहंकारी बनत चाललेल्या मानवाचे अज्ञान '.
मानवाच्या या त्रुटीत सामर्थ्याची ओळख पटल्यामुळे शास्त्रज्ञांनी निसर्गात घडणाऱ्या घटनांचा व अस्तित्वात असलेल्या असंख्य गोष्टींचा साकल्याने विचार करावयाचे सोडून देऊन, एखाद्याच गोष्टीचा वा घटनेचा एका विशिष्ट दृष्टिकोनातून संपूर्ण अभ्यास करण्याची पद्धती शोधून काढली. या पद्धतीमुळे पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यक, जीवशास्त्र इ. अनेक राहुट्या निर्माण झाल्या. य! राहुट्यातून पृथकतेने अभ्यास सुरू झाल्यामुळे एखाद्या विषयाची संपूर्ण ओळख करून घेण्याची इच्छा असूनही अवघड होऊ लागले. पाण्याच्या बाबतीत विचार केला तरी हेच दिसून येते. निरनिराळ्या विद्याशाखेत या विषयावर कितीतरी संशोधन झाले आहे. पण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून बघितले म्हणजे दिसणारे चित्र मन उदास केल्याविना राहत नाही. जीवनापासून अलग करणे अशक्य म्हणूनच ज्याचे नाव 'जीवन' त्या पाण्याविषयीचे मानवाचे ज्ञान कीव करण्यासारखे आहे. याचा अर्थ, पाण्याविषयीचे ज्ञान करून घेण्याची मानवाची इच्छा नाही असा मात्र
मुळीच नाही. उत्सुकता जरूर आहे. फक्त ती शमविली जात नाही हे कटू सत्य आणि याचे कारण म्हणजे हो सर्व माहिती निरनिराळा! ठिकाणी विखरून गेली असल्याने एकतितपणे कोठेही सापडत नाही. आरोग्यशास्त्राचा वा स्वास्थ्य अभियांत्रिकीचा अभ्यासू, जल-उद्यमात काम करणारे कर्मचारी किवा कोणत्याही शास्त्रविषयाचा अभ्यास करणारा विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून त्याची उत्सुकता शमविली जावी ही दृष्टी हे पुस्तक लिहिण्यामागे आहे.
अनेक गोष्टींचा विचार केला जाणाऱ्या नेहमीच्या अभ्यासक्रमात पाण्याच्या बाबतीत 'अतिपरिचयात् अवज्ञा' असे झाले आहे. 'भूतलावर पाणी येते कोठून?' ते आहे ' तरी किती ?' परिमाणात 'शुद्ध पाणी, शुद्ध पाणी म्हणून ज्याच्याविषयी ओरड केली जाते ते निसर्गात सापडते कां?',' त्यात फक्त हैड्रोजन नि ऑक्सिजनचे अणूच असतात की त्याबरोबर आणखी काही खनिजे?', 'मानवाला लागते ते हैड्रोजन व ऑक्सीजनचे केवळ अणू असलेले पाणी की त्यांच्याबरोबर इतर खनिजे असलेले पाणी?', ' खनिजे कांही प्रमाणातच हवीत का ?, कितीही प्रमाणात असली तरी चालतील?' एक ना दोन, असंख्य प्रश्न ! या प्रश्नांना उत्तरे आणि तीही समाधानकारक रीतीने देण्याचा प्रयत्न कोणत्याही अभ्यासक्रमात केला जात नाही. अर्थातच त्यामुळे त्या दृष्टीने लिहिलेली - पुस्तकेही दुर्मिळ. पर्यावरणीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याना शिकवत असताना भासमान झालेल्या अडचणीतून या पुस्तकाचा जन्म होत आहे. वास्तविक ही माहिती सर्वांनाच अगत्याची आहे. ह्या माहितीकडे अधिक लक्ष देण्याची जरूरी असून तसे ते दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मोठ्या खेदाची हो गोष्ट आहे. या व यासारख्या प्रश्नांना सर्वसाधारणपणे दिली जाणारी उत्तरे मासलेवाईक आहेत. ' नेमेची येतो मग पावसाळा, ' हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ' हेच ते उत्तर. पण प्रत्यक्षात अलिकडे तो 'नेमेची ' येतही नाही ! इतर प्रश्नांची उत्तरेही कांही वेगळी नाहीत. या उत्तरातून व्यक्त होणारा दृष्टिकोन स्थायी स्वरूपाचा आहे. आपल्या अभ्यासक्रमातील तुटी दूर व्हावी व सर्वसामान्य मानवाची पाण्याबद्दलची उत्सुकता शमविली जावी या भावनेतून लिहिलेल्या या पुस्तकांचा स्वीकार होईल अशी आशा वाटते. मराठीत तरी असे पुस्तक अजून उपलब्ध नाही.
Hits: 136