प्रकरण १ -पाणी ? नव्हे जीवन

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन
Written by सौ. शुभांगी रानडे

पाणी ? नव्हे जीवन
संपुर्ण जीवमंडलात अधिकतम प्रमाणात असलेला पदार्थ म्हणजे पाणी. अपवाद श्‍वसनासाठी वापरल्या जाणाऱ्या हवेचाच काय तो. पाणी हे अतिशय जवळचे पण तितकेच अपरिचित असे असेंद्रिय यौगिक. इतके निकट साहचर्य की, जीवमंडलातील कोणत्याही घटकाचे अस्तित्व याविना अशक्य व्हावे. पाण्याला * जीवन ' म्हणून संबोधिले जाते ते उगाच नाही.

निसर्गाकडून मिळालेली निर्मल, चमकिली, पारदर्शक अन्‌ पापक्षालकासारखी अद्भूत शक्‍ती लाभलेली दैवी भेट म्हणून अनादी कालापासून मानव पाण्याकडे आदराने पाहत आला आहे. मानवाशी संबंधित असलेल्या बहुतेक सर्व कार्यांत--पूजाअर्चा, संकल्प, धार्मिक-विधी इत्यादी--पाण्याचे महत्त्व केवळ अनन्यसाधारण आहे. इतिहासाचे परिशीलन केले तरी हेच दिसून येईल. भटक्या जमाती, खेडी, शहरे, इतकेच नव्हे तर सुखसमृद्धीत नांदलेल्या व नांदत असलेल्या संस्कृतींचे भवितव्य पाण्याच्या विपुलतेवर वा दुर्मिळतेवर विसंबून राहिलेले दिसते. मराठीतील 'आधी जल, मग स्थल' ही म्हण याचीच साक्ष देते.

जोपर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात 'उदंड जाहले पाणी' अशी परिस्थिती होती आणि मानवाच्या आरोग्यविषयक कल्पना वैयक्तिक आरोग्याचा उंबरठा ओलांडून बाहेर पडलेल्या नव्हत्या तोपर्यंत नदीत वा कोणत्याही जलप्रवाहात अनवधानाने अगर बुद्धीपुरस्सर टाकलेल्या अपायकारक पदार्थाचेही (प्रदूषणकारी घटक वा दूषितके ) नैसर्गिकरीत्या होणारे निराकरण---आत्मशोधन--दैवी वाटणे साहजिक होते. परंतु काळाबरोबर जसजसी लोकसंख्या वाढू लागली व शास्त्रीय ज्ञान प्रगत होऊ लागले तसतशी परिस्थिती पालटू लागली. माणसाच्या आरोग्यविषयक कल्पना जास्त सुस्पष्ट होऊ लागल्या. तो वैयक्तिक आरोग्याबरोबरच सार्वजनिक आरोग्याचाही विचार करू लागला. पाण्याचा वापर पूर्वीच्या तुलनेने किती तरी पट वाढू लागला. एका बाजूला लोकसंख्या व शास्त्रीय ज्ञान यांची झपाट्याने होणारी वाढ तर दुसऱ्या बाजूला वाढत्या गरजांच्या प्रमाणात पुरवठा करण्यास दिवसेंदिवस असमर्थ बनत चाललेले पाण्याचे जुनेच साठे यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या.

पाणी कमी पडू लागले म्हणून शास्त्रीय प्रगती थांबवायची का त्या प्रगतीला तशीच अप्रतिहत ठेवून निसर्गाला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करावयाचा हा प्रश्‍न मानवासमोर उभा ठाकला. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीला अडसर घालण्याचा हा विचार केवळ दैवावर विसंबून राहणारा कर्मठ माणूसच करू शकेल. शास्त्रीय विषयाच्या अभ्यासकाने तसे करून चालणार नाही. शास्त्रज्ञाचे मत हे केव्हाही प्रगल्भच असावयाला हवे. ज्या बुध्दीच्या बळावर त्याने ' विश्‍वामित्री प्रतिसृष्टी ' निर्माण करण्यास सुरुवात केली त्याच बुद्धीच्या बळावर निसर्गात होणारे बदलही तो निश्‍चित थोपवू शकेल. त्यासाठी आवश्यक आहे तो फक्त अभ्यास, निसर्गनियम व नैसगिक वस्तूंच्या गुणधर्मांचा सखोल अभ्यास.

आपल्याभोवती अफाट पसरलेले विश्व ही एक प्रकारची प्रयोगशाळाच आहे. तिच्यात प्रत्यही होत असलेले सूक्ष्म स्वरूपाचे किवा क्वचित्‌ प्रसंगी एकदमच स्थूल स्वरूपात दृश्यमान्‌ होणारे बदल हे विश्‍वात घडणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया, परस्परांमध्ये घडणारे संघर्ष आणि अजाणता किवा बुध्दिपुरस्सर मानवी समुहांकडून केली जाणारी कृत्ये यांचा समाकलित परिपाक आहे. गेली कित्येक शतके शास्त्रज्ञ आपापल्या कुवतीप्रमाणे त्या बदलांचे अन्वयार्थ लावण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहेत. अजूनही साऱ्या चमत्कारांचा उलगडा झालाच नाही. प्रख्यात नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ आइन्स्टाईन म्हणूनच एकदा म्हणाला की, ' जगात अमर्याद, अनंत अशा दोनच गोष्टी आहेत. एक अफाट विस्तारलेले विश्‍व नि दुसरे म्हणजे विनाकारणच अहंकारी बनत चाललेल्या मानवाचे अज्ञान '.

मानवाच्या या त्रुटीत सामर्थ्याची ओळख पटल्यामुळे शास्त्रज्ञांनी निसर्गात घडणाऱ्या घटनांचा व अस्तित्वात असलेल्या असंख्य गोष्टींचा साकल्याने विचार करावयाचे सोडून देऊन, एखाद्याच गोष्टीचा वा घटनेचा एका विशिष्ट दृष्टिकोनातून संपूर्ण अभ्यास करण्याची पद्धती शोधून काढली. या पद्धतीमुळे पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यक, जीवशास्त्र इ. अनेक राहुट्या निर्माण झाल्या. य! राहुट्यातून पृथकतेने अभ्यास सुरू झाल्यामुळे एखाद्या विषयाची संपूर्ण ओळख करून घेण्याची इच्छा असूनही अवघड होऊ लागले. पाण्याच्या बाबतीत विचार केला तरी हेच दिसून येते. निरनिराळ्या विद्याशाखेत या विषयावर कितीतरी संशोधन झाले आहे. पण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून बघितले म्हणजे दिसणारे चित्र मन उदास केल्याविना राहत नाही. जीवनापासून अलग करणे अशक्य म्हणूनच ज्याचे नाव 'जीवन' त्या पाण्याविषयीचे मानवाचे ज्ञान कीव करण्यासारखे आहे. याचा अर्थ, पाण्याविषयीचे ज्ञान करून घेण्याची मानवाची इच्छा नाही असा मात्र मुळीच नाही. उत्सुकता जरूर आहे. फक्‍त ती शमविली जात नाही हे कटू सत्य आणि याचे कारण म्हणजे हो सर्व माहिती निरनिराळा! ठिकाणी विखरून गेली असल्याने एकतितपणे कोठेही सापडत नाही. आरोग्यशास्त्राचा वा स्वास्थ्य अभियांत्रिकीचा अभ्यासू, जल-उद्यमात काम करणारे कर्मचारी किवा कोणत्याही शास्त्रविषयाचा अभ्यास करणारा विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून त्याची उत्सुकता शमविली जावी ही दृष्टी हे पुस्तक लिहिण्यामागे आहे.

अनेक गोष्टींचा विचार केला जाणाऱ्या नेहमीच्या अभ्यासक्रमात पाण्याच्या बाबतीत 'अतिपरिचयात्‌ अवज्ञा' असे झाले आहे. 'भूतलावर पाणी येते कोठून?' ते आहे ' तरी किती ?' परिमाणात 'शुद्ध पाणी, शुद्ध पाणी म्हणून ज्याच्याविषयी ओरड केली जाते ते निसर्गात सापडते कां?',' त्यात फक्त हैड्रोजन नि ऑक्सिजनचे अणूच असतात की त्याबरोबर आणखी काही खनिजे?', 'मानवाला लागते ते हैड्रोजन व ऑक्सीजनचे केवळ अणू असलेले पाणी की त्यांच्याबरोबर इतर खनिजे असलेले पाणी?', ' खनिजे कांही प्रमाणातच हवीत का ?, कितीही प्रमाणात असली तरी चालतील?' एक ना दोन, असंख्य प्रश्‍न ! या प्रश्‍नांना उत्तरे आणि तीही समाधानकारक रीतीने देण्याचा प्रयत्न कोणत्याही अभ्यासक्रमात केला जात नाही. अर्थातच त्यामुळे त्या दृष्टीने लिहिलेली - पुस्तकेही दुर्मिळ. पर्यावरणीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याना शिकवत असताना भासमान झालेल्या अडचणीतून या पुस्तकाचा जन्म होत आहे. वास्तविक ही माहिती सर्वांनाच अगत्याची आहे. ह्या माहितीकडे अधिक लक्ष देण्याची जरूरी असून तसे ते दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मोठ्या खेदाची हो गोष्ट आहे. या व यासारख्या प्रश्‍नांना सर्वसाधारणपणे दिली जाणारी उत्तरे मासलेवाईक आहेत. ' नेमेची येतो मग पावसाळा, ' हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ' हेच ते उत्तर. पण प्रत्यक्षात अलिकडे तो 'नेमेची ' येतही नाही ! इतर प्रश्‍नांची उत्तरेही कांही वेगळी नाहीत. या उत्तरातून व्यक्‍त होणारा दृष्टिकोन स्थायी स्वरूपाचा आहे. आपल्या अभ्यासक्रमातील तुटी दूर व्हावी व सर्वसामान्य मानवाची पाण्याबद्दलची उत्सुकता शमविली जावी या भावनेतून लिहिलेल्या या पुस्तकांचा स्वीकार होईल अशी आशा वाटते. मराठीत तरी असे पुस्तक अजून उपलब्ध नाही.

पाणी-जीवन अनुक्रमणिका

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन
Written by सौ. शुभांगी रानडे

प्रकरण १

पाणी ? नव्हे जीवन !
जलचक्र- पाण्याचे अनेकविध उपयोग-जागतिक लोकसंख्या व पाण्याची मागणी-ग्रामीण विभाग-नागरी विभाग--भारतामधील पाणीपुरवठा-
नागरी विभाग-ग्रामीण विभाग-महाराष्ट्रातील पाणीपुरवठा-भौगोलिक रचना, पाण्याचे असमान वाटप व त्यामुळे उत्पादनावर होणारा परिणाम- पाणी व आरोग्य--प्रति माणशी पाणीपुरवठा.

प्रकरण २
जीवसृष्टी अन्‌ पाणी यांचे अन्योन्य संबंध, वनस्पतिसृष्टी-प्राणिसृष्टी-जीवरासायनिक क्रिया व त्यामधील पाण्याचा वाटा,

प्रकरण ३
अलौकिक गुणांचे पाणी,
पाण्याचा रेणू-हैडोजन बंध-पाण्याच्या तीन अवस्था आणि त्यांचे उष्णतेबरोबरील अन्योन्य संबंघ-द्विध्रुवी घूर्णन व उच्च विद्य्‌त्‌ अपार्यता स्थिरांक-
संवेव्यांपी विलायंक अभिक्रिया-पृष्ठ तणाव.

प्रकरण ४
शुद्ध पाण्याच्या शोधात,
रासायनिकदृष्ट्या शुद्ध पाणी-स्वास्थ्याचे दृष्टिकोनातून शुद्ध पाणी.

प्रकरण ५
जलशुद्धता पारखण्यासाठी निर्धारित मानके, जलविश्लेषणासाठी नमुना' गोळा करण्याच्या पद्धती-रासायनिक विश्लेषण पद्धती-जीवाणूशास्त्रीय विश्लेषण पद्धती-जीवाणूविषयक मानके- अनुपचारित पाणी, उपचारित पाणी, पाणी नमुने-रासायनिक व भौतिक गुणवत्तेबाबत ठरविलेली मानके.

प्रकरण ६
पाण्यातील जीवसृष्टी -
'जीवो जीवस्य जीवनम्‌'-बुरशी-शेवाळे-जीवाणू-स्वच्छ पाण्यातील जीवाणू, मृत्तिकानिवासी जीवाणू, मलजलनिवासी व विष्ठीय जीवाणू-विषाणू-
कृमी-जंत, अंकुश कृमी, नारू-इतर अपृष्ठवंशी जीव --रोगकारी प्रोटोझून, एण्टामोबा हिस्टोलिटिका, जिआडिया लाम्बिया-गंध व चव निर्माणक प्राणो-अविभाजित शरीराच्या अळया-निस्पंदक व प्रणाल तुंबविणार्‍्या अळया व इतर प्राणी.

प्रकरण ७
पाण्यातील अपद्रव्ये - विलीन अवस्थेतील वायू--ऑक्सिजन-कार्बन डायऑक्साइड-नायट्रोजन-- एकूण घनद्रव्मे-तित्पंदनशील किवा विलीन घनद्रव्ये-अनिस्यंदनशील' |
किंवा निलंबित घनद्रव्ये-बाष्पशील व स्थिर घनद्रव्ये-गढूळता-रंग- पाण्यातील रासायनिक घटक-द्रव्यें आणि त्यांचे संभाव्य परिणाम-
अल्कता-अम्लता--9प मूल्य--दुष्फेनता--क्लोराइड--फ्लोराइडे--आयोडींन--लोह आणि मंगल---सल्केटे--नायड्रेटे--फॉस्फेटे.

प्रकरण ८
जलप्रदूषण
जीवाणू व विषाणू, कृमी यामुळे होणारे प्रदूषण-पोष्णिक द्रव्यांमुळे होणारे प्रदूषण--औद्योगिक अवक्लिष्टांमुळे होमारे प्रदूषण. -

प्रकरण ९
जल-उपचारण -
निर्धोक पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी करावे लागणारे जलोपचारण-कलील गढूळपणा-किलाटक व किलाटक सहाय्यक-किलाटन- निस्यंदन-
क्‍लोरिनीकरण-पाण्याचे सुफेनीकरण-फ्लोराइड निष्कासन-औद्योगिक व अपशिष्ठे अगर म॑लजल पाण्यात नि:स्सारित झाल्यामुळे होणार्‍या प्रदूषणकारक घटकांचे निष्कासन-लहान प्रमाणातील लोकसंख्येसाठी पाणी-पुरवठा-एकघट पद्धती-द्विघट पद्धती-पाण्याची कमतरता नष्ट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संकीर्णं उपचारण पद्धती व काही अभिनव प्रकल्प-भूगर्भंतर्गत पाण्याचा/भूजलाचा शोध--अपक्षारीकरण, आयन विनिमय पद्धती, सौरजल, बंद-चक्र उपागम.

इमा आप: शिवतमाः

परिशिष्ट

पारिमाषिक शब्दसंग्रह

पाणी-जीवन निवेदन

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन
Written by सौ. शुभांगी रानडे

पाणी-जीवन
लेखक
डॉ. विजय मोरेश्‍वर देशपांडे
प्राध्यापक (जनस्वास्थ्य अभियांत्रिकी)
विश्वेश्वरय्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर.
नागपूर: शासकीय मुद्रणालय
१९८२
----

निवेदन

मराठी भाबेला आणि साहित्याला आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या व सांस्कृतिक मूल्यांच्या आविष्कारांचे सामर्थ्य प्राप्त व्हावे, आधुनिक शास्त्रे, ज्ञान-विज्ञाने, तंत्र आणि अभियांत्रिकी त्याचप्रमाणे भारतीय प्राचीन संस्कृती, इतिहास, कला इत्यादी विषयांत मराठी भाषा सर्वच स्तरांवर ज्ञानदान करण्यास समर्थ व्हावी आणि मराठी भाषेला जगात उच्च स्थान मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाने बहुविध वाड्मयीन व सांस्कृतिक कार्यक्रम आखला आहे. तो व्यवस्थितपणे कार्यवाहीत आणण्याकरिता वाडमय, ललितकला, समाजविज्ञान, विज्ञान, इतिहास इत्यादी विषयांवरील प्रकल्प साकार करण्यासाठी तसेच, मराठी वाङ्मयकोश व॒ शब्दकोश इत्यादी योजनांचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी मंडळाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत.

याच दृष्टीने सर्वसामान्य माणसाला उपयुक्त होतील अशी विज्ञानविषयक पुस्तके प्रकशित करणेहो आवश्यक आहे असे मंडळाला वाटते. मंडळाच्या या धोरणानुसार मंडळाच्या विज्ञान समितीने सर्वसामान्य लोकांसाठी विज्ञानविषयक पुस्तके लिहून घेण्याची योजना आखली आहे. यामुळे सामान्य जनांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होऊन त्यांच्या देनंदिन जीवनात येणार्‍या वैज्ञानिक गोष्टींची त्यांना केवळ ओळखच होणार नाहो तर आजचे विज्ञान रंजक व वाचनीय पद्धतोने त्यांना उपलब्ध
पण होईल. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही पुस्तके पोहोचली पाहिजेत, अशी या मंडळाचो धारणा आहे. यासाठी मंडळाने प्राणीसृष्टीतील नवल, अनुवंशिकी, शेतकर्‍यांचे जीवन उजळून टाकणारा गोबर गॅस, आपला सूर्य, अणुशक्ती आणि अण्वस्त्रे यांचा परस्पर संबंध, जीवरक्षके (Antibiotics), निसर्ग आणि वनस्पती, कापडावरील विविध प्रक्रिया, वैनंदिन व्यवहारातील विज्ञान इत्यादी विविध विषयांवर पुस्तके प्रकाशित करण्याचे योजिले आहे.

मानवी जीवनातच नव्हे तर प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टीतही पाण्याचे महत्त्व केवळ अनन्यसाधारण आहे. निरनिराळ्या विद्याशाखेत या विषयावर कितीतरी संशोधन झाले आहे. परंतु, शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास सर्वसामान्य माणसास “ पाणी ” या विषयासंबंधी अत्यंत त्रोटक ज्ञान असते. डॉ. विजय देशपांडे यांच्या “ पाणी-जीवन ” या पुस्तकामुळे ही त्रुटी भरून निघेल असे आम्हांस वाटते.

डॉ. देशपांडे यांनी हे पुस्तक सर्वांना पोषक होईल अशा दृष्टीकोनातूनच लिहिले आहे. पुस्तकामध्ये पाण्याविषयीची सांगोपांग माहिती आली आहे. रेखाचित्रे, तौलनिक तक्ते इत्यादींचा समावेश पुस्तकात असल्याने विषयाचे आकलन वाचकांना सहज| सुलभ होण्यास खूपच मदत होईल. जिज्ञासूंप्रमाणेच सर्वसामान्य वाचकासही या ग्रंथामुळे “ पाणी ” या महत्त्वाच्या विषयावरील जरूर ती माहिती मिळू शकेल असे मंडळास वाटते. डॉ. वि. मो. देशपांडे लिखित “ पाणी-जीवन ” हे पुस्तक जनतेला सादर करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
डॉ. सुरेन्द्र बार्रालगे,
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ.
मुंबई:
विजयादशमी,
आश्‍विन १६, शके १९०३
गुरुवार, दिनांक ८ ऑक्टोबर १९८१.

पाणी - जीवन .. दोन शब्द

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन
Written by सौ. शुभांगी रानडे

गाईची तृषा हूरूं व्याघ्रा विष होऊनी मारू ।
ऐसे नेणेचि कां करू । तोय जैसे ॥

......
आघविया जगा एक । सेव्य जैसे उदक ।
-- ज्ञानेश्‍वर
(ज्ञानेश्वरी)


असं हे सर्वांशी सारखंच असलेले ' पाणी-जीवन' अपंण करताना मी तरी आपपर भाव कशाला दाखवू?

-सर्वांनाच -
दोन शब्द

' पाणी-जीवन' हें पुस्तक या स्वरूपात प्रसिद्ध होण्यामागे कितीतरी जणांचे प्रत्यक्षा-प्रत्यक्ष सहाय्य, प्रोत्साहन कारणीभूत आहे. त्यांच्या सदिच्छा, त्यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना माझ्या पाठीशी नसत्या तर हे काम माझ्या हातून कदाचित्‌ झालंही नसतं. त्या सर्वांचं ऋण बाळगण्यात मला आनंदच आहे.

पुस्तक लिहिण्यामागची माझी भूमिका, मला वाटतं, बर्‍याचशा प्रमाणात पहिल्या प्रकरणात मी स्पष्ट केली आहे. या पुस्तकाची कल्पना मनात आल्यानंतर तिला मू्र्त स्वरूप. यावं यासाठी प्रथमतः मी कांही लेख लिहिले. ते त्यावेळी नागपूरांत प्रा. वसन्त सहस्त्रबुद्धे यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होत असलेल्या ' महाराष्ट्रीय वैज्ञानिक ' या मासिकांत प्रसिद्ध झाले. थोडक्यात, ' महाराष्ट्रीय वैज्ञानिक ' हे मासिक नि त्याचे संपादक प्रा. सहस्त्रबुद्धे यांना श्रेयाचा फार मोठा वाटा जातो. पुस्तक स्वरूपात छापायचं म्हणजे मूळच्या लेखांत फेरफार करणं ओघानंच आलं. तसे संस्कार, क्वचित प्रसंगी काटछाट, जोड देणं हे सारं करणं भाग पडलं. प्रत्यक्ष लेखनकाळांत ज्यांच्याशी केलेली चर्चा उपयुक्त ठरली ते माझे सहकारी प्राध्यापक डॉ. आनंद भोळे व डॉ. सुधाकर धबडगांवकर यांचा नामनिर्देश न करून कसं चालेल ?

अभियांत्रिकी शाखेशी संबंधित असलेल्या जुन्या भारतीय ग्रंथांचा व संदर्भाचा अनमोल संग्रह करण्यात नि बाळगण्यात कमालीचा अभिमान बाळगणारे नागपूरचे संशोधक व सेवानिवृत्त अभियंते श्री. जोशी यांचाही मी ऋणी आहे. जुने संदर्भ देण्यात त्यांचं झालेलं सहाय्य शब्दातीत आहे. तसंच मुंबईच्या महानगरपालिकेत उपमुख्य अभियंत्याची जागा भूषविणारे माझे ज्येष्ठ मित्र श्री. य. वि. दामले यांच्यामुळे कांहीं महत्त्वाची माहिती मला मिळूं शकली. त्यांचेही ऋण फेडलेच पाहिजे.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाच्या सहाय्याविना हे पुस्तक प्रकाशित होणे कठीणच होते. साहित्य संस्कृति मंडळांचा मी सदैव ऋणी आहे.

पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ काढून पुस्तकाची आकर्षकता वाढविल्याबद्दल माझे स्नेही प्रा. अनन्त देव यांचे आभार मानणे आवश्‍यकच आहे. तसेच, वॉटर हायसिंथने भरलेल्या जलाशयाचे छायाचित्र काढून दिल्याबद्दल श्री. जयंत गाडगीळ यांचाही अगत्याने उल्लेख करायला हवा. मैत्री अत्यंत जवळीकीची असल्याने आभाराचं व्यावहारिक प्रद्षण त्यांना आवडणार नाही.

पुस्तक सजविण्यात माझे मित्र श्री. द. गो. देशपांडे व श्री. धारसकर यांचे झालेले सहाय्य फार मोठे आहे. त्यांचेही आभार !

महाराष्ट्र राज्य शासकीय मुद्रण व लेखनसामग्री विभागाचे संचालक, श्री. आर. बी. अल्वा यांनी या ग्रंथाच्या मुद्रणाविषयी विशेष आस्था दाखविली अन्‌ विविध प्रकारे सहाय्य केले म्हणून त्यांचे व शासकीय मुद्रणाल्याचे व्यवस्थापक, श्री. व. रा. जोशी व त्यांचे सहकारी यांनी सुबक रीतीने हें पुस्तक छापल्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक आभार.

- डॉ. विजय देशपांडे.

पाणी-जीवन -डॉ. विजय देशपांडे

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन
Written by सौ. शुभांगी रानडे


X

Right Click

No right click