पाणी - जीवन .. दोन शब्द

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन Written by सौ. शुभांगी रानडे

गाईची तृषा हूरूं व्याघ्रा विष होऊनी मारू ।
ऐसे नेणेचि कां करू । तोय जैसे ॥

......
आघविया जगा एक । सेव्य जैसे उदक ।
-- ज्ञानेश्‍वर
(ज्ञानेश्वरी)


असं हे सर्वांशी सारखंच असलेले ' पाणी-जीवन' अपंण करताना मी तरी आपपर भाव कशाला दाखवू?

-सर्वांनाच -
दोन शब्द

' पाणी-जीवन' हें पुस्तक या स्वरूपात प्रसिद्ध होण्यामागे कितीतरी जणांचे प्रत्यक्षा-प्रत्यक्ष सहाय्य, प्रोत्साहन कारणीभूत आहे. त्यांच्या सदिच्छा, त्यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना माझ्या पाठीशी नसत्या तर हे काम माझ्या हातून कदाचित्‌ झालंही नसतं. त्या सर्वांचं ऋण बाळगण्यात मला आनंदच आहे.

पुस्तक लिहिण्यामागची माझी भूमिका, मला वाटतं, बर्‍याचशा प्रमाणात पहिल्या प्रकरणात मी स्पष्ट केली आहे. या पुस्तकाची कल्पना मनात आल्यानंतर तिला मू्र्त स्वरूप. यावं यासाठी प्रथमतः मी कांही लेख लिहिले. ते त्यावेळी नागपूरांत प्रा. वसन्त सहस्त्रबुद्धे यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होत असलेल्या ' महाराष्ट्रीय वैज्ञानिक ' या मासिकांत प्रसिद्ध झाले. थोडक्यात, ' महाराष्ट्रीय वैज्ञानिक ' हे मासिक नि त्याचे संपादक प्रा. सहस्त्रबुद्धे यांना श्रेयाचा फार मोठा वाटा जातो. पुस्तक स्वरूपात छापायचं म्हणजे मूळच्या लेखांत फेरफार करणं ओघानंच आलं. तसे संस्कार, क्वचित प्रसंगी काटछाट, जोड देणं हे सारं करणं भाग पडलं. प्रत्यक्ष लेखनकाळांत ज्यांच्याशी केलेली चर्चा उपयुक्त ठरली ते माझे सहकारी प्राध्यापक डॉ. आनंद भोळे व डॉ. सुधाकर धबडगांवकर यांचा नामनिर्देश न करून कसं चालेल ?

अभियांत्रिकी शाखेशी संबंधित असलेल्या जुन्या भारतीय ग्रंथांचा व संदर्भाचा अनमोल संग्रह करण्यात नि बाळगण्यात कमालीचा अभिमान बाळगणारे नागपूरचे संशोधक व सेवानिवृत्त अभियंते श्री. जोशी यांचाही मी ऋणी आहे. जुने संदर्भ देण्यात त्यांचं झालेलं सहाय्य शब्दातीत आहे. तसंच मुंबईच्या महानगरपालिकेत उपमुख्य अभियंत्याची जागा भूषविणारे माझे ज्येष्ठ मित्र श्री. य. वि. दामले यांच्यामुळे कांहीं महत्त्वाची माहिती मला मिळूं शकली. त्यांचेही ऋण फेडलेच पाहिजे.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाच्या सहाय्याविना हे पुस्तक प्रकाशित होणे कठीणच होते. साहित्य संस्कृति मंडळांचा मी सदैव ऋणी आहे.

पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ काढून पुस्तकाची आकर्षकता वाढविल्याबद्दल माझे स्नेही प्रा. अनन्त देव यांचे आभार मानणे आवश्‍यकच आहे. तसेच, वॉटर हायसिंथने भरलेल्या जलाशयाचे छायाचित्र काढून दिल्याबद्दल श्री. जयंत गाडगीळ यांचाही अगत्याने उल्लेख करायला हवा. मैत्री अत्यंत जवळीकीची असल्याने आभाराचं व्यावहारिक प्रद्षण त्यांना आवडणार नाही.

पुस्तक सजविण्यात माझे मित्र श्री. द. गो. देशपांडे व श्री. धारसकर यांचे झालेले सहाय्य फार मोठे आहे. त्यांचेही आभार !

महाराष्ट्र राज्य शासकीय मुद्रण व लेखनसामग्री विभागाचे संचालक, श्री. आर. बी. अल्वा यांनी या ग्रंथाच्या मुद्रणाविषयी विशेष आस्था दाखविली अन्‌ विविध प्रकारे सहाय्य केले म्हणून त्यांचे व शासकीय मुद्रणाल्याचे व्यवस्थापक, श्री. व. रा. जोशी व त्यांचे सहकारी यांनी सुबक रीतीने हें पुस्तक छापल्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक आभार.

- डॉ. विजय देशपांडे.

Hits: 113
X

Right Click

No right click